तिसर्या आघाडीचा फुसका बार

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

तिसर्या आघाडीचा फुसका बार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भाजपला पर्याय म्हणून तिसर्या आघाडीचा पर्याय चाचपून पहाण्यासाठी एक बैठक पार पडली. मात्र बैठकीपूर्वीच ही बैठक तिसर्या आघाडीसाठी नसून केवळ काही राजकीय नेते प्रचलित मुद्यांवर चर्चा करण्यासाठी असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मुळात काँग्रेसशिवाय अशी बैठक होऊ शकत नाहि, हे सर्वांना माहित आहे. शिवाय राज्यातील सत्तेत काँग्रेस महाविकास आघाडीत वाटेकरी आहे. मोदींना पर्याय द्यायचा तर काँग्रेसशिवाय बैठकच काय, पण आघाडीही होऊ शकत नाहि. आजही काँग्रेस मुख्य विरोधी पक्ष आहे. पवार यांच्या हे लक्षात आले  असणार. काँग्रेस अगोदरच राज्यातील सरकारवर नाराज आहे. त्यांना सत्तेत पुरेसे महत्व मिळत नाहि, अशी तक्रार आहे. त्यात जर आता काँग्रेसने संतापून पाठिंबा काढून घेतला तर सरकारचे काही खरे नाहि, हे पवारांना माहित आहे. शिवसेनेची रोज एकेक नवी खरी खोटी प्रकरणे बाहेर येत असल्याने त्या पक्षाबाबत पवाराना आता भरोसा राहिलेला नाहि. तसेच शिवसेना आमदाराने भाजपशी जुळवून घेण्याबाबत शिवसेना पक्षप्रमुखांना पत्र लिहून एकप्रकारे शिवसेनेकडे दुसरे पर्याय आहेत, असा जणू इषाराच दिला आहे. त्या पार्ष्वभूमीवर काँग्रेसला नाराज करून चालणार नाहि, हे चाणाक्ष पवारांनी ओळखून मुळात तिसर्या आघाडीच्या पर्यायाचा विचार करण्यासाठी आयोजित बैठकीला नंतर साधे स्वरूप दिले. ही बैठक राष्ट्रमंचचे संस्थापक आणि माजी केंद्रिय मंत्रि यशवंत सिन्हा यांनी आयोजित केली असली तरीही सिन्हा यांना राष्ट्रीय राजकारणात कुणीच विचारत नाहि. त्यामुळे पवारांच्या निवासस्थानी बैठक होत आहे, इतक्यासाठीच या बैठकीला महत्व होते. याच बैठकीत निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर हेही उपस्थित होते. त्यामुळे बैठकीला वृत्तमूल्य निश्चितच होते. परंतु अखेर साराच फुसका बार ठरला. प्रचलित मुद्यांवर चर्चा करायची तर त्यासाठी दिल्लीला कशाला भेटायला हवे, झूम मीटिंगवरूनही चर्चा करता आली असती. याचा अर्थ, बैठक ही अगोदर तिसर्या आघाडीवरच चर्चा करण्यासाठी ठरली होती. परंतु या बैठकीला पवारांचे लाडके माध्यम मित्र वगळता कुणीच महत्व दिले नाहि. पंतप्रधान मोदींनी तर दखलही घेतली नसणार. कारण बैठकीला जे काही महाभाग उपस्थित होते, त्यांना जनतेने कधीच नाकारले आहे. खुद्द पवारांना राष्ट्रीय स्तरावर नेते मानले जात असले तरीही त्यांना राज्यात कधीही स्वबळावर सरकार बनवता आले नाहि. त्यामुळे हा प्रयोग फसला. काँग्रेसला या बैठकीचे आमंत्रण नव्हते. अजूनही पवारांसारख्या काही नेत्यांना काँग्रेस आणि भाजप सोडून तिसरी  आघाडी बनवण्याची शक्यता वाटते. परंतु ते हे वास्तव विसरतात, तिसरी आघाडी किंवा चौथी आघाडी झाली तरीही तिला लोकांचा प्रतिसाद मिळणार नाहि. कारण या तिसर्या आघाडीला दोन वेळा सत्ता देऊन जनतेने पाहिले आहे. प्रचंड अहंगंड असलेल्या नेत्यांनी केवळ आपला अहं जपण्याच्या नादात सरकार म्हणून कसा सत्यानाश केला, हेही जनतेने पाहिले आहे. तिसरी आघाडी स्थापन झाली तरीही अजूनही नेतृत्व कुणी करायचे, हा सनातन प्रश्न शिल्लक राहिलच. त्यात आता समोर वाजपेयी किंवा अडवानी यांच्यासारखे मवाळ नेते नाहित. मोदी आणि शहा यांच्यासारखे जहाल नेते आहेत. त्यामुळे तिसर्या आघाडीचा प्रयोग भविष्यातही यशस्वी होऊ शकणार नाहि. याचे सर्वात मोठे कारण हे वय आहे. तिसर्या आघाडीत सामील होऊ पहाणार्या सर्वच नेत्यांचे वय सरासरी ऐंशीच्या आसपास आहे. तरूणांना या आघाडीकडे देण्यासारखे काहीच नाहि. तरूणांना आकर्षित करून घेण्यासारखेही काही नाहि. तरूण वर्ग आजही मोदींच्या पाठिशी इतक्या प्रचंड संख्येने आहे, त्याचे कारण त्यांचे तुलनेने कमी वय आहे. राहुल गांधी नुकतेच एक्कावन्न वर्षाचे झाले. तरीही ते काँग्रेसचे युवराज किंवा युवा नेते म्हणवले जातात. त्यांना काय म्हणावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु त्यांच्याकडेही तरूण वर्ग आकर्षित होत नाहि, हे तर सत्यच आहे. या प्रयोगामागे विरोधी पक्षांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न असला तरीही त्याचा काही उपयोग नाहि. यापूर्वी उत्तरप्रदेशात सारे विरोधी पक्ष एकत्र आले होते. तेव्हा तर त्यात काँग्रेसही होती. परंतु त्या आघाडीचा सफाया झाला. मोदींनी कितीही वाईट कामगिरी केली तरीही त्यांच्याबद्दल जोपर्यंत लोकांना ते परिस्थिती बदलवतील, असा विश्वास आहे, तोपर्यंत त्यांना हरवले जाऊ शकत नाहि. वास्तविक मोदींच्या विरोधात आज कितीतरी गोष्टी आहेत. पेट्रोलचे दर शंभरच्या वर गेले आहेत आणि लोकांचे कंबरडे महागाईने मोडून गेले आहे. कोरोनाचा प्रश्न मोदींनी कसा हाताळला, याबद्दल तीव्र मतभेद आहेत. तरीही आत्यंतिक संतापाची भावना लोकांच्या मनात नाहि. मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे, ही भावना लोकांच्या मनात आहे, तोपर्यंत विरोधी पक्ष काहीही करू शकत नाहित. ही भावना बळकट होण्यासाठी काँग्रेसचे दिग्विजय यांच्यासारखे नादान नेते काँग्रेस सत्तेवर आली तर कलम तीनशे सत्तर पुन्हा लागू करण्याची आचरट भाषा करतात. यामुळे लोक आणखी मोदींच्या बाजूने जातात. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला यश मिळाले त्यात कोणत्याही आघाडीचा काहीही वाटा नाहि. एकतर अल्पसंख्यांकांनी ममता दीदींच्या बाजूने एकगठ्ठा मतदान केले, हे कारण आहे. तसे एकगठ्ठा मतदान पूर्वी काँग्रेसच्या बाजूने व्हायचे आणि नंतर डाव्यांच्या बाजूने मते दिली जायची. अल्पसंख्यांकांनी काँग्रेसला नाकारले, हे कारण आहे. यामुळे पश्चिम बंगालमधील विजयाने जर तिसर्या आघाडीची स्वप्ने प़डू लागली असतील तर ते स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता नाहि. तिसर्या आघाडीचा पर्यायाचा बार फुसका ठरला आहे.