सुवर्णक्षण

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

सुवर्णक्षण

नीरज चोप्राचे नावही आजपर्यंत कुणी ऐकले नव्हते. अथलेटिक्स विश्वाशी संबंधित लोक सोडले तर नीरज चोप्रा कोण हे कुणीच सांगू शकले नसते. पण एका क्षणाने सारे चित्र बदलून गेले आहे. आज नीरज चोप्रा हे नाव घराघरात पोहचले आहे. त्याला कारणही तसेच आहे. नीरज चोप्रा या भारतीय अथलिटने भारताला प्रथमच भालाफेक या अथलेटिक्सच्या  या प्रकारात ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकून दिले आहे. अंतिम फेरीत जर्मनी, पाकिस्तान आदी १२ देशांच्या स्पर्धकांवर प्रथमपासून आघाडी घेऊन असलेल्या नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकले आणि भारताला तब्बल १२२ वर्षांनी भालाफेकच नव्हे तर कोणत्याही अथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकून दिले आहे. यंदाची टोक्यो ऑलिंपिक भारतासाठी खूप छान गेली आहे, हे तर झालेच. भारताने सर्वाधिक सात पदकांची कमाई यावेळी केली आहे आणि त्यात सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशी सारी पदके आहेत. भारताची पदकांची आकडेवारी समृद्ध करण्याचे श्रेय याच सात खेळाडूंना जाते. पण नीरजचे विशेष कौतुक करावे लागेल. कारण त्याने १२२ वर्षांनंतर भारताला अथलेटिक्समध्ये सुवर्णक्षण आणून दिला आहे. १९०० मध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताच्या नॉर्मन प्रिचर्ड याने दोन सुवर्णपदक जिंकली होती. परंतु तो ब्रिटिश इंडियाकडून खेळला आणि तो स्वतःच ब्रिटिश होता. त्यामुळे ते यश भारताचे नव्हतेच. नीरज चोप्रा याच्यावर बक्षिसांची लयलूट होत आहे, हे स्वाभाविक आहे. आणि त्याने कामगिरीच अशी केली आहे की त्याच्यामुळे देशाचा नावलौकिक वाढला आहे. असे भाग्यवान फार थोडे असतात की ज्यांच्यामुळे देशाची मान उंचावते. यात आता नीरज चोप्रा जाऊन बसला आहे. देशात त्याच्या या अभूतपूर्व यशामुळे आनंदाची लाट उसळली असल्यास नवल नाहि. राष्ट्रपतींपासून ते पंतप्रधानांपर्यंत सर्वांनी नीरजचे अभिनंदन केले. नीरजच्या या उत्तुंग यशामुळे भारतीय क्रिडाविश्वातील चित्र बदलून जाणार आहे. क्रिकेट हा धर्म आणि त्यातील खेळाडुंना भगवान मानणार्या देशाने सुवर्णपदक जिंकणारे अथलिटही दिले आहेत, हे चित्र आश्वासक आणि आनंददायक आहे. अनेक अर्थांनी नीरज आणि इतर मीराबाई, रवी दाहिया वगैरे खेळाडू आणि भारतीय हॉकी पुरूष आणि महिला संघांच्या यशामुळे भारतात आता या खेळांना ग्लॅमर प्राप्त होईल. त्यांना प्रतिष्ठा मिळेल आणि त्यांना प्रायोजकही मिळतील. क्रिकेट सोडले तर बाकीच्या खेळांची अवस्था फारच दयनीय आहे. त्या खेळांमध्ये पैसा तर नाहिच, परंतु खेळाडुंची अवस्थाही दयनीय आहे. अनेक खेळाडूंकडे किटही नसते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून हे खेळाडू वर आले आहेत. अनेक खेळाडूंना प्रायोजक मिळत नसल्याने सराव करता येत नाहि. सरकारकडेही त्यांना मदत करण्यासाठी फारसे काही नसते. नीरज चोप्रा हा पानिपत या हरियाणाच्या जिल्ह्यातील एक लहान गावात जन्मला आहे. आज ऑलिंपिकमध्ये सुवर्ण पदक जिंकल्याने तो अवघ्या देशाच्या गळ्यातील ताईत झाला असला तरीही जागतिक भालाफेक स्पर्धेत त्याने अनेक वेळा सुवर्णपदक जिंकले आहे.  त्याला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले असले तरीही त्याला अर्जुन पुरस्कार हा अत्यंत महत्वाचा पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर नीरजला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारही देण्यात आला आहे. पण ही तांत्रिक माहिती देण्यापेक्षा नीरजच्या सुवर्णपदकाचे महत्व कशानेही करता येणार नाहि. कोरोनाविरोधातील लढाईत अवघा देश गुंतला असतानाही या खेळाडूंनी उत्तुंग भरारी मारली आहे. याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करावे लागेल. येथून पुढे अथलेटिक्स क्रिडाप्रकाराकडे आदराने पाहिले जाईल. इतकेच नव्हे तर जास्तीत जास्त मुले मुली या खेळाकडे वळतील. आपल्याकडे चिन किंवा रशिया, हंगेरी, पोलंड या देशांसारखे करायची सोय नाहि. त्या देशांमध्ये मुलगा किंवा मुलगी लहान वयातच असताना त्यांना अथलेटिक्सकडे वळवले जाते. त्यांना दुसरे काही करावे लागत नाहि. केवळ शारिरिक सराव करणे हेच त्यांचे काम असते. त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय सरकार करते. असे करण्याची सोय नसतानाही आपल्या खेळाडूंनी मिळवलेले यश हे शब्दांनी मोल करण्यासारखे नाहि. जास्तीत जास्त मुले मुली आता जर अथलेटिक्सकडे वळाले, तर नीरजचे यश कामी आले असे म्हणता येईल. नीरजने अवघ्या  देशाला प्रेरणा तर दिली आहेच. पण कमालीच्या निराशाजनक वातावरणात एक आशेचा किरण खूप दिवसांनी दाखवला आहे. नागरिकांना रोजची दुःखे विसरायला लावण्याची ताकद नीरजच्या सुवर्णपदकात आहे. सरकारने आता वेळ न दवडता जास्तीत जास्त अथलेटिक्स किंवा इतर खेळांना सर्वंकष मदत करण्याचा निर्णय घेतला तर असे आणखी दहा तरी नीरज तयार होतील, असा विश्वास वाटतो. नीरजचे अभिनंदन.