दिल्लीत आजपासून तिसऱ्या टप्प्यातल्या लसीकरणाला सुरुवात

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

दिल्लीत आजपासून तिसऱ्या टप्प्यातल्या लसीकरणाला सुरुवात

दिल्ली : करोना प्रतिबंधक लसीकरणाच्या तिसऱ्या आणि सर्वात मोठ्या टप्प्याला 1 मे पासून सुरुवात झाली आहे. या टप्प्यात 18 ते 45 वर्षे वयोगटातल्या सर्वांचं लसीकरण होणार आहे. मात्र, काही राज्यांमध्ये लसींच्या तुटवड्यामुळे हे लसीकरण काही दिवस उशीरा सुरु होणार आहे. दिल्लीत आज सकाळपासून 18 ते 45 वयोगटातल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे.

दिल्लीमध्ये या टप्प्यात साधारण 90 लाख नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत. यासाठी 77 शाळांमध्ये प्रत्येकी 5 लसीकरण केंद्रांची व्यवस्था करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांकडून कळत आहे. जास्तीत जास्त लाभार्थ्यांच्या सोयीसाठी शाळांमध्ये लसीकरण केंद्रे उभारण्यात आली आहे.

आत्तापर्यंत दिल्लीतल्या 500 च्या आसपास लसीकरण केंद्रांमधून 45 वर्षे आणि त्यावरील नागरिकांना लस दिली जात होती. मात्र, 18 ते 45 वयोगटातल्या सर्व नागरिकांना लसीकरणासाठी आधी नोंदणी करणं अनिवार्य असणार आहे. शनिवारपासून दिल्लीतल्या अपोलो, फोर्टीस आणि मॅक्स या खासगी रुग्णालयांमधून 18 ते 45 वर्षे वयोगटातील लोकांचं लसीकरण सुरु करण्यात आलं आहे. हे लसीकरण काही मर्यादित केंद्रांवर सुरु आहे. 

दिल्ली सरकारने 1.34 कोटी लसींचे डोस मागवले असून पुढच्या तीन महिन्यात हे डोस सरकारपर्यंत पोहोचतील. पुढच्या तीन महिन्यात दिल्लीतल्या सर्व नागरिकांचं लसीकरण पूर्ण करण्याचं नियोजन असल्याचं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं.