अनिश्चित काळासाठी बंद ठेवणार का ? भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांचा राज्य सरकारला सवाल

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

अनिश्चित काळासाठी बंद ठेवणार का ?  भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांचा राज्य सरकारला सवाल

मुंबई : कोरोनाच्या भीतीमुळे अनिश्चित काळासाठी समाज बंद करून ठेवणार का, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला केला. लसीचे दोन डोस घेतलेल्यांना योग्य काळजी घेऊन व्यवहार करण्याची परवानगी सरकारने दिली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लसीचे दोन डोस घेतलेल्यांना निर्बंधांतून सवलत द्यावी, असे सांगितल्याचे एका पत्रकाराने निदर्शनाला आणून प्रतिक्रिया विचारली असता पाटील म्हणाले की, अजित पवार आणि राजेश टोपे यांच्याप्रमाणेच आपले मत आहे.आपण ते आधीपासूनच व्यक्त केले आहे.लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, फिजिकल डिस्टन्सिंग, गर्दी टाळणे असे नियम पाळून काम सुरू केले पाहिजे. ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले त्यांच्यासाठी व्यवहार खुले करावेत. जनजीवन बंद ठेऊन चालणार नाही, परिस्थितीला सामोरे जावे लागेलच. अनिश्चित काळासाठी समाज बंद करून ठेवणार का ?
राजकारणातील परखड माणूस अशा शब्दात गौरव करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही  पाटील यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.नेत्यांच्या वाढदिवसाला बेकायदा होर्डिंग्ज लाऊन नेत्यांना अडचणीत आणू नका आणि आचारसंहिता पाळा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. बेकायदेशीर होर्डिंग्ज लावणाऱ्या कार्यकर्त्यांवरील कारवाईचे त्यांनी समर्थन केले.रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण येथे ढगफुटी होऊन गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. तेथे तातडीने मदत पाठवून जीवितहानी होणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी त्यांनी केली. राज्याच्या अन्य काही भागातील पूरस्थितीबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली.सर्वोच्च न्यायालयाने सहकाराविषयी जो निकाल दिला आहे तो तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग आणि कृषीमंत्री शरद पवार यांच्या केंद्र सरकारने केलेल्या घटनादुरुस्तीबाबत आहे. या निकालामुळे मोदी सरकारला धक्का बसला असे म्हणणे चुकीचे आहे. मोदी सरकारने निर्माण केलेल्या नव्या सहकार मंत्रालयाचा आणि या घटनादुरुस्तीचा काही संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्याशी आपली ओबीसींना राजकीय आरक्षण कसे मिळेल याविषयी चर्चा झाली. तसेच पक्षाच्या बूथ रचना अभियानाविषयी विचारविनिमय झाला, अशी माहिती त्यांनी दिली.