लोकल प्रवासासंदर्भात टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

लोकल प्रवासासंदर्भात टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती

मुंबई : करोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्यानंतर राज्य सरकारनं काही जिल्ह्यातील निर्बंध शिथिल केले आहेत. तर ११ जिल्ह्यांत मात्र, तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम ठेवले आहेत. मुंबईत बरीच मोकळीक देण्यात आली आहे. मात्र, असं असलं तरी मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमधून सर्वसामान्यांना प्रवास करण्यास बंदी कायम ठेवण्यात आली. यामुळे गेल्या काही दिवसांपासून सरकारच्या निर्णयाकडे लक्ष ठेवून असलेल्या मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांची निराशा झाली आहे. दरम्यान, लोकलमधून प्रवास करण्यास तूर्तास परवानगी का देण्यात आली नाही, याचं स्पष्टीकरण देत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांना लोकल प्रवासवरील बंदी कायम ठेवल्यावरून प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना राजेश टोपे म्हणाले,”लोकल रेल्वे प्रवासाला मुभा देण्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी नाही म्हटलेलं नाही. त्यांनी हा निर्णय तूर्तास स्थगित केलेला आहे. दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करण्यास परवानगी द्यावी किंवा इतर वेगवेगळ्या पद्धतीनं मागणी होत आहे. मागण्या होत आहेत, पण होणारे परिणामही मुख्यमंत्र्यांनाच बघावे लागतात”, असंही टोपे म्हणाले.

 “दोन डोस घेतलेल्यांचं प्रमाणपत्र तपासून प्रवेश देणं. मोठ्या संख्येनं लोक लोकल रेल्वेतून प्रवास करतात, मग हे शक्य होईल का? ते कशापद्धतीने तपासता येईल? या सगळ्या बाबी आहेत. यात घाईगडबड करणं शक्य नसतं. घाईत असं केलं गेलं, तर करोनाच्या दृष्टिकोनातून याचे दुष्परिणाम खूप मोठे होऊ शकतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नाही म्हटलेलं नाही. निर्णय स्थगित केलेला आहे. संबंधित सर्व लोकांशी चर्चा करून मुख्यमंत्री निर्णय घेतीलच”, असं टोपे यांनी सांगितलं. “मंदिर खुलं करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. जे निर्बंध होते, ते निर्बंध कायम आहेत. थोडी प्रतीक्षा करूया. या संदर्भातील निर्णयही मुख्यमंत्री घेतील”, असं राजेश टोपे म्हणाले.