तिवरे धरणग्रस्तांसाठीच्या 24 घरांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, उर्वरीत घरांसाठी 7 कोटींचा निधी देणार

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

तिवरे धरणग्रस्तांसाठीच्या 24 घरांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, उर्वरीत घरांसाठी 7 कोटींचा निधी देणार

मुंबई : धरणग्रस्तांसाठी सिद्धीविनायक न्यासाने दिलेल्या ५ कोटी रुपयांच्या निधीतून बांधलेल्या २४ घरांचे आज तिवरे लोकार्पण होत आहे, त्यांना हक्काचा निवारा मिळत आहे याचे समाधान आहे, यातील उर्वरित धरणग्रस्तांनाही एक वर्षाच्या आत घरे देण्यासाठी लागणाऱ्या ७ कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव व आराखडा तातडीने पाठवावा, हा निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली.

रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण दुर्घटनाग्रस्तांसाठी चिपळुण तालुक्यातील अलोरे येथे सिद्धी विनायक न्यासाच्या निधीतून घरे बांधण्यात आली आहेत त्याचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री पुढे म्हणाले की आज आपल्या मनात संमिश्र भावना आहेत. एकीकडे दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या दुर्देवी लोकांच्या कुटुंबियांविषयी मनात सहवेदना आहे तर दुसरीकडे बाधितांना त्यांच्या हक्काचा निवारा आपण आज देत आहोत. या आपत्तीच्या प्रसंगात अनेकांनी मदतीचे हात पुढे केले त्यात सिद्धीविनायक मंदिर न्यासाचाही सहभाग होता. त्यांनी बाधितांच्या पुनर्वसनासाठी जी मदत केली त्या मदतीमुळे भाविकांनी मंदिरात केलेले दान सत्पात्री लागले आहे असे म्हणता येईल. मी हे दान करणाऱ्या भाविकांना आणि मंदिर न्यासाला त्यांच्या या मदतीसाठी धन्यवाद देतो असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. त्यांनी कोविड काळात राज्यातील अनेक देवस्थानांनी पुढाकार घेऊन राज्य शासनाला आणि थेट नागरिकांना केलेल्या मदतीचाही यावेळी आवर्जुन उल्लेख केला.

तिवरे धरणग्रस्तांना नवीन घरे देतांना आजुबाजूच्या परिसरात पुन्हा अशा घटना घडण्याची शक्यता नाही याची काळजी घेण्याच्या सुचना देऊन मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, निसर्गाची ताकत मोठी आहे. निसर्ग लहरी होत आहे. अनियंत्रित अनियमित पावसामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता असते हे लक्षात घेऊन राज्यभरात अशाप्रकारे घटना घडू नयेत यासाठी सावधगिरी बाळगण्याच्या सुचना आपण दिल्या आहेत. वित्त हानी भरून काढता येते परंतू मनुष्य हानी ही न भरून येणारी असते. त्यामुळे एकही जीव जाऊ न देणे हे आपले पहिले प्राधान्य असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

मंत्री उदय सामंत यांनी यावेळी तिवरे धरणग्रस्तांचे पुनर्वसन करतांना उर्वरित घरांच्या बांधकामासाठी ७ कोटी रुपये लागणार असून हा निधी लवकरात लवकर मिळाल्यास उर्वरित बाधित कुटुंबांनाही हक्काचा निवारा लवकर मिळू शकेल अशी मागणी केली.