डाव्यांचे अपयश चिंताजनक

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

डाव्यांचे अपयश चिंताजनक

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे कल स्पष्ट होत आहेत तसे ममता बॅनर्जी सत्ता टिकवतील, असे दिसत आहे. अर्थात आसाम, पुद्दुचेरी, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांचे कलही जाहिर होत आहेत. आसामात भाजप पूर्ण बहुमताकडे वाटचाल करत असल्याचे दिसत होते तर पुद्दुचेरीमध्येही अण्णाद्रमुक आणि भाजपला यश मिळताना दिसते आहे. तमिळनाडूत अण्णाद्रमुक आणि भाजप आघाडीवर द्रमुकने मात केली असली तरीही द्रमुकला जे प्रचंड यश मतदानोत्तर चाचण्यांत दिसत होते, तसे काही दिसत नाहि. मात्र सत्ता द्रमुक मिळवेल. प. बंगालमध्ये भाजपने तीन अंकी जागा गाठल्या तर तेत्याचे जबरदस्त यश आहे. कारण भाजपला दोन हजार सोळाच्या निवडणुकीत अवघ्या तीन जागा होत्या. त्यामुळे ज्या जागा मिळतील त्या त्या पक्षासाठी बोनसच आहेत.  तीन जागांवरून पुढच्याच निवडणुकीत तीन अंकी जागांवर झेप घेणे हे मामुली यश नाहि. भाजपने हे पूर्वीही करून दाखवले आहे. एकोणीसशे चौर्यांशीच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने चारशेच्या वर जागा मिळवल्या होत्या आणि भाजपचे अवघे दोन खासदार निवडून आले होते. अर्थात त्यावेळी इंदिराजींच्या हत्येमुळे आलेली सहानुभूतीची लाट होती. आता प. बंगालमध्ये भाजपने जर तीन जागांवरून शतकी मजल मारली तर ते त्याचे जबर यश आहे. परंतु भाजप नेत्यांच्या अतिशयोक्त वक्तव्यांमुळे भाजपचा हा पराभव वाटत आहे, इतकेच. पण त्याहीपेक्षा जास्त चिंताजनक आहे ते डाव्या पक्षांचे प्रचंड अपयश.ज्योति बसूंनी अठ्ठावीस वर्षे एकहाती डाव्यांची सत्ता टिकवून ठेवली होती. ममता बॅनर्जी यांनी ती उध्वस्त केली आणि आज ममतांच्या सत्तेला भाजपच्या रूपाने जबर आव्हान उभे राहिले आहे. पण त्याहीपेक्षा डाव्यांना सार्या जागांचे कल हाती आल्यावर असे दिसते आहे की प्रथमच बंगालमध्ये खातेही उघडता आलेले नाहि. डावे पक्ष राजकीय क्षितिजावरून संपल्यात जमा आहेत. केरळमध्येच काय ते डावे आता सत्ता राखू शकतील. परंतु तेथेही डाव्यांची सत्ता एलडीएफ या  आघाडीच्या माध्यमातून आहे. कम्युनिस्ट पक्षांना निर्भेळ असे यश केरळमध्येही नाहिच. एकेकाळी वंगभूमी ही डाव्यांचा बालेकिल्ला मानला जायचा. अनेक दिग्गज नेते डाव्या पक्षांनी देशाला दिले. एकोणीसशे शहाण्णवमध्ये तर ज्योति बसूंना पंतप्रधानपद देण्यासाठी यूपीए तयार झाली होती. परंतु सीपीएमच्या पॉलिटब्युरो या सर्वोच्च संस्थेने बसू यांनी पंतप्रधानपद स्विकारण्याच्या प्रस्तावाला नकार दिला. हरशरणसिंग सुरजीत यांनी नंतर ही कम्युनिस्ट पक्षाची ऐतिहासिक चूक होती, याची जाहिर कबुली दिली होती. कम्युनिस्ट पक्षाची बंगालमध्ये आज एकही जागा न येणे हा काळाचा महिमा आहे. डाव्यांची अशी अवस्था का झाली याची दोन प्रकारची कारणे आहेत. एक म्हणजे तात्विक कारणे आहेत आणि दुसरी प्रत्यक्षातील कारणे आहेत. वैचारिक कारणे म्हणजे डावे पक्ष बदलत्या काळाला ओळखत नाहित. पोथीनिष्ठ धोरणांना ते चिकटून रहातात जी जगातून कधीच नष्ट झाली आहेत. आज रशिया आणि चिनही ती धोरणे राबवत नाहित. भांडवलदारांना शिव्या घालून मते मिळवण्याचे दिवस कधीचेच इतिहासजमा झाले. दारिद्र्याचेच वाटप करण्याचे धोरण व्यक्तिसाठी घातक आहे, हे लोकांच्या केव्हाच लक्षात आले. पण ड़ाव्या नेत्यांच्या ते लक्षात येत नाहि.त्यामुळे डावे आज नेस्तनाबूत झाले आहेत  आणि प. बंगालच्या निवडणुकीनी त्यावर शिक्कामोर्तब  केले आहे. एक प्रकारे डाव्या पक्षाला आज बंगालच्या भूमीतच मूठमाती मिळाली आहे.  एकेकाळी मुंबईतही डाव्यांचा जोर प्रचंड होता. अगदी मराठी भाबड्या लेखकांनी आपला नायक नेहमी भांडवलदाराना शिव्या देणारा आणि गरिबीला कवटाळणारा रंगवून त्याला महानायक केले होते. हा काळ एकूणच साम्यवादाबद्दल विचित्र अशा रोमँटिसिझमचा होता. अखेर काँग्रेसने डाव्यांच्या शक्तिला सुरूंग लावला. त्यासाठी मदत घेतली शिवसेनेची आणि शिवसेनेच्या स्थापनेला वसंतराव नाईक यांनी मदत केली. पण कॉम्रेड कृष्णा देसाई यांच्या खुनानंतर डावी चळवळ मुंबईतून तरी संपली. पुढे ती देशातूनच हद्दपार झाली. याला कारण काँग्रेसने डाव्यांना आवडणारी विचारसरणी अमलात आणली.त्यामुळे डाव्यांना स्वतःची विचारसरणी काँग्रेसने हायजॅक केलेली पहावी लागली. त्यात काँग्रेस जिंकत राहिली आणि डावे हळूहळू संपत गेले. कसेबसे डाव्यांनी बंगालमधील आपले बलस्थान टिकवले होते. तेही गेले. डाव्यांची इतकी भीषण परिस्थिती होण्याचे प्रत्यक्षातील कारण म्हणजे इतर पक्ष जसे की ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस वगैरेही डाव्यांच्याच दादागिरीच्या युक्त्या वापरू लागले. प्रतिस्पर्धी पक्षाच्या लोकांना धमकावणे, त्यांची घरेदारे जाळणे, कार्यकर्त्यांना ठार मारणे वगैरे प्रकार डावे सर्रास करत असत. तेच इतरही पक्ष करू लागले. यात डाव्या कार्यकर्त्यांचेही जबर नुकसान झाले. दादागिरीला दादागिरीनेच उत्तर दिले जाऊ शकते,हे स्पष्ट झाल्याने सारेच पक्ष यात उतरले. त्यात डावे संपले. त्याबरोबर काँग्रेसही संपून गेली. काँग्रेसची एकेकाळी बंगालमध्ये सत्ता होती असे म्हटले तर आश्चर्य वाटेल. इंदिरा गांधी यांना आणिबाणी लागू करण्याचा सल्ला देणारे सिद्धार्थ शंकर रे हे मुख्यमंत्रि होते. परंतु डाव्यांच्या झंझावातात काँग्रेस रसातळाला गेली. आता तर डाव्यांबरोबर काँग्रेसचेही अस्तित्व बंगालमधून संपले आहे. डाव्यांचे अपयश हे समजण्यासारखे असले तरीही चिंताजनक आहे. गरिबांचे खरेखुरे प्रतिनिधित्व करणारे नेते आता रहाणार नाहित. डावे तसे होते. सत्ता मिळाली तरीही साधेपणाने रहाणारे डावे नेते होते. अनेक डावे खासदार सायकलवरून संसदेत यायचे. आता ते दृष्य कधीही दिसणार नाहि.