स्वबळाचे नारे सर्वांचेच

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

स्वबळाचे नारे सर्वांचेच

मुख्यमंत्रि उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा देत शिवसैनिकांना निवडणुकांसाठी तयार रहाण्यास सांगितले आहे. त्यांनी शिवसैनिकांना जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्याबाबतही चर्चा केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून त्यांची ही वक्तव्ये आहेत. त्यामुळे त्यांनी स्वबळावर जिंकण्याचा नारा दिला म्हणून इतरांनी संताप व्यक्त करण्याचे काहीच कारण नाहि. परंतु शिवसेनाप्रमुख जेव्हा आपल्या कार्यकर्त्यांना स्वबळाची तयारी करण्यास सांगतात तेव्हा इतरांनी तसेच केले तर त्यांनी स्वतःचा जळफळाट होऊ देऊ नये. काँग्रेसचे नाना पटोले हे कायम स्वबळाचा आग्रह धरत आहेत. मात्र काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याचे वक्तव्य केले की शिवसेना नेते संजय राऊत आम्ही राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढवू वगैरे सांगून थयथयाट करतात, ते कशासाठी, हा प्रश्न आहे. तुम्ही स्वबळावर निवडणूक लढवू शकता तर काँग्रेसने तसे केले तर त्यामुळे संताप होण्याचे काहीच कारण नाहि. एकीकडे म्हणायचे की, प्रत्येक पक्षाला आपापला विस्तार करण्याचा अधिकार आहे आणि इतरांची स्वबळाची उबळ दाबून टाकण्याचे प्रयत्न करायचे, याला ढोंगीपणा म्हणतात. माध्यमपंडितही काँग्रेसने स्वबळावर नारा दिला की काँग्रेसला आपली ताकद पहा, वगैरे सल्ला देतात. शिवसेना  आणि काँग्रेस यांच्या ताकदीमध्ये फार तर दहा पंधरा जागांचा फरक आहे. शिवसेनेला आपली ताकद पहाण्याचे सल्ले का दिले जात नाहित, हा प्रश्न आहे. काँग्रेस असो की राष्ट्रवादी किंवा शिवसेना, हे सारे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या उर्मीतून एकत्र आले आहेत. तरीही आपापल्या पक्षांचा त्याना विस्तार करायचा आहे. यात काही वावगे आहे असे नाहि. पण जे धोरण आपण राबवतो तेच मित्रपक्षांनी राबवले तर त्यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे, याचे उत्तर राऊतांना विचारायला हवे. आता खरेतर सत्ताधारी महाविकास आघाडीसमोर ओबीसी आरक्षण नसताना निवडणुका घेण्याचे मोठे आव्हान आहे. कारण मोठ्या प्रमाणावर शिवसैनिकांमध्ये ओबीसी आहेत. ओबीसी समाज मोठ्या संख्येने शिवसेनेच्या पाठिशी होता. आता तो संतप्त आहे आणि त्याला सध्या तरी शिवसेनेशी किंवा कोणत्याच पक्षाशी काहीही घेणेदेणे नाहि. त्याला आरक्षण हवे आहे. राज्यातील सामाजिक परिस्थिती कधी नव्हे ते प्रचंड कडवट झाली आहे. धनगर आरक्षण मिळाले नाहि म्हणून संतप्त आहेत. न्यायालयात आरक्षण गेले म्हणून मराठा समाज अस्वस्थ आहे. ओबीसी तर राजकीय दृष्ट्या हादरून गेले आहेत. सर्व जाती जमाती एकमेकांविरोधात उठल्या आहेत. या परिस्थितीत निवडणुका होणे हे खरेतर धोकादायकच आहे. अशावेळी मुख्यमंत्र्यांनी पक्षप्रमुख म्हणून बोलताना शिवसैनिकांना केलेले आवाहन अगदी उदात्त आहे. परंतु हे अरण्यरूदन ठरणार आहे आणि त्यांनाही ते माहित आहे. आजचा शिवसैनिक आणि लोकांच्या मनात प्रतिमा  असलेला शिवसैनिक यात जमिन अस्मानाचे अंतर आहे. आजचा कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता हा कधीच गरिब  नसतो. काँग्रेसचे कार्यकर्ते पूर्वी सभेला जात तेव्हा आपल्या घरच्या भाकर्या बांधून आणत आणि कुठेतरी झाडाखाली बसून खात. आज कोणताही कार्यकर्ता किमान वॅगनर तरी बाळगून असतो. सभेला जायचे तर आपापल्या गाड्यांच्या ताफ्यातून झेंडे लावून जायचे आणि येताना मौजमजा करत यायचे, अशी त्यांची आजची कल्पना आहे. हातात पाची बोटात अंगठ्या आणि परदेशी बनावटीचा मोबाईल, गळ्यात जाडजूड सोन्याच्या चेन असे आजचे कार्यकर्त्याचे स्वरूप आहे. आणि याला कोणत्याही पक्षाचा अपवाद नाहि. मात्र सारेच कार्यकर्ते असेच असतात, असेही नाहि. काही आजही जुन्या निष्ठा आणि विचाराधारेनुसार काम करणारे आहेत. परंतु ते खूप थोडे आहेत. शिवसैनिकांकडून ठाकरे जी अपेक्षा करत आहेत त्यावर त्यांचा तरी विश्वास आहे का. मुळात आता कोणताही पक्ष आता जनतेसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारा नाहि. जी आंदोलने दिसतात ती केवळ पक्ष जिवंत आहे, एवढे दाखवण्यासाठीच असतात. केवळ डावे कार्यकर्ते अपवाद आहेत. ते अजूनही साधी  रहाणी आणि केवळ जनतेसाठी काम करत रहाणे एवढेच करत रहातात. पण त्यांच्या कालबाह्य तत्वज्ञानामुळे त्यांचा पक्ष नष्ट होण्याच्या बेतात आले आहेत. तात्पर्य काय की, स्वबळाचे नारे सारेच पक्ष  महाराष्ट्रात देत असले तरीही त्यामुळे फरक काहीच पडणार नाहि. शेवटी कोण निवडणुकीत कसे काम करतो आणि कोणत्या पक्षावर लोक नाराज किंवा समाधानी आहेत, यावरच निकाल ठरणार आहे. मतदारराजा सारे काही ठरवणार आहे. स्वबळ किंवा युती यावर काहीच ठरत नाहि. तेव्हा ठाकरे यांचे आवाहन शिवसैनिकांनी मनावर घेऊन काम करायचे ठरवले तरीही शिवसेनेबद्दल किंवा कोणत्याही पक्षाबद्दल लोकभावना ही निकाल ठरवणार आहे. केवळ स्वबळाचे नारे दिल्याने कार्यकर्त्यांचे मनोबल वाढते आणि पक्षाच्या जास्तीत जास्त लोकांना निवडणुकीत संधी मिळते, हे दोनच फायदे मिळतात. पक्षाचे काम आणि त्याची जनमानसातील प्रतिमा हेच दोन घटक सारे काह ठरवत असतात.