संकुचित राजकारणी

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

संकुचित राजकारणी

भारतीय राजकारणी हे अत्यंत संकुचित विचारसरणीचे आहेत, हे नेहमीच दिसले आहे. याला कोणताही पक्ष अपवाद नाहि. आणि जग जसे आधुनिक बनत आहे, तसे संकुचितपणा कमी होत जाण्याऐवजी वाढत चालला आहे. याच राजकारण्यांचा आदर्ष नवीन पिढी घेत असल्यामुळे सर्वत्रच संकुचितपणा आणि प्रादेशिक अस्मितेने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. भारतातील कुणीही कोणत्याही क्षेत्रात यश मिळवले की, आपल्याकडे तो अगोदर कोणत्या राज्याचा आहे, हे पाहिले जाते. मग त्या राज्यातील राजकारणी त्याचे हा आमचा म्हणून गौरवाने उल्लेख करतात. नंतर त्याचे शहरवासी आपली मान ताठ करून चालतात. नंतर अगदी त्याच्या गल्लीमोहल्ल्यापर्यंत हे अस्मितेचे लोण पसरत जाते. यशस्वी झालेला किंवा झालेली प्रथम भारतीय आहे, असा कुणीच विचार करत नाहि. आता असे वाक्य टाकले तर ते भाबड्या आदर्षवादाचे ठरेल. पण एवढी विशाल वृत्ती आपल्याकडे आता जवळपास दिसेनाशी झाली आहे, हे मात्र खरे. विशेष करून खेळाडूंच्या बाबतीत तर हे जास्तच होत आहे. सामान्य लोकांनी सचिन तेंडूलकर आमचा मराठमोळा म्हणून सातत्याने स्वतःची पाठ थोपटून घेतली तर ते चालून जाते. कारण बोलून चालून ते सामान्य लोकच असतात. पण राजकारणी जेव्हा एखाद्या खेळाडूला प्रादेशिक अस्मिता चिकटवतात तेव्हा ती गंभीर गोष्ट ठरते. याचे कारण खेळाडू हे एखाद्या राज्यासाठी खेळत नसतात. तर ते देशासाठी खेळत असतात. काही लोकांचे यावरही मतभेद आहेत. पण क्रिकेटचा अपवाद सोडला तर बाकीचे सारे खेळाडू देशासाठीच खेळतात, हे निरपवाद आहे. कारण इतर खेळाडूंवर अद्याप कुणी पैशासाठी खेळतात, असा आरोप आजवर केलेला नाहि. क्रिकेटपटुंवर असे आरोप अनेक झाले आहेत. पण ते असो. सध्या पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यांमध्ये ऑलिंपिकमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केलेल्या भारतीय हॉकी पुरूष आणि महिला संघावरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. यातून या दोन राज्यांतील राजकारणी नेत्यांची संकुचित वृत्ती दिसून आली आहे. पुरूषांच्या हॉकीमध्ये तब्बल ४९ वर्षांनंतर भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहचला आहे. त्यामुळे  हॉकी क्षेत्रात आनंदीआनंद पसरला आहे. साहजिकच आहे ते. त्याबद्दल उलट अभिमानच वाटायला हवा. परंतु पंजाबचे मुख्यमंत्रि अमरिंदर सिंग यांनी एका ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, ज्या सामन्यातील विजयामुळे भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहचला, त्यातील सर्व म्हणजे तिन्ही गोल पंजाबच्या खेळाडूंनी केले आहेत. अमरिंदर यांनी दिलप्रित सिंग, गुर्जंत सिंग आणि हार्दिक सिंग यांची नावे घेऊन कौतुक केले आहे. या संघाची आणि या खेळाडूंची कामगिरी खरोखरच कौतुकास्पद आहेच. त्यामुळे कौतुक करण्यात गैर काहीच नाहि. पण त्यात पंजाबी अस्मिता अमरिंदर यांना आठवली. हरियाणाचे मुख्यमंत्रि मनोहरलाल खट्टर हे एक पाऊल त्यांच्याही पुढे गेले.  त्यांनी तर उपांत्य फेरीत पोहचलेल्या भारतीय महिला हॉकी संघातील तब्बल नऊ खेळाडू हे हरियाणाचे असल्याचे गर्वाने सांगितले.  संघाची कर्णधार राणी रामपाल ही ही हरियाणाची असल्याचे त्यांनी सांगितले. खट्टर यांना याचा गर्व असल्यास ते चांगले आहे. परंतु या महिला भारतासाठी खेळल्या  आहेत. हरियाणासाठी नव्हे. तसेच पुरूष हॉकी संघातील ज्या खेळाडूंनी गोल केले, ते भारतासाठी केले होते. पंजाबसाठी नव्हे. अर्थात अमरिंदर असो की खट्टर , त्यांच्या अस्मितेतही राजकीय विचार आहेच. पंजाबात पुढील वर्षी निवडणुका होत आहेत. त्यात अस्मितेचे कार्ड खेळण्यासाठी अमरिंदर यांना या  भूमिकेचा उपयोग होणार आहे. सारी निवडणूक हल्ली अस्मितेच्या प्रश्नांवर होत असते, त्यामुळे राजकीय पक्ष या निमित्ताने आपापली कार्ड खेळून निवडणुकीतील डावपेच वापरणार, हे ओघानेच आले. पण खरी गोष्ट ही आहे की हॉकीला चांगले प्रशिक्षक आणि चांगल्या दर्जाच्या साहित्यासाठी प्रायोजक हवेत. ओडिशा सध्या हॉकी संघाचा प्रायोजक आहे आणि मुख्यमंत्रि नवीन पटनाईक यांनी खाण महामंडळाकडून भरपूर पैसा हॉकी संघासाठी ओतला आहे.  बाकी अमरिंदर आणि खट्टर यांची केवळ शब्दसेवा आहे. त्यांनी हॉकीसाठी किंवा या खेळाडूंसाठी भरीव असे काहीही केले नाहि. आता फक्त ते मोठेपणा घेत आहेत. अमरिंदर किंवा खट्टर यांना खरेच हॉकीची कळकळ असेल तर त्यांनी राज्यात अद्ययावत अकादमी उभारून खेळाडूंना प्रायोजित करावे. मग हॉकीला पुन्हा सुवर्ण दिन येतील. त्यासाठी केवळ श्रेय न घेता पैसा ओतला पाहिजे.  ते करण्याची तयारी या दोन्ही शब्दसेवा करणार्या मुख्यमंत्र्यांनी दाखवावी. आपले राजकारणी कोणत्याही विषयावर आपली पोळी भाजून घ्यायला कसे तयार असतात, याचे हे उदाहरण आहे. प्रत्यक्षात खेळाडूंसाठी कुणीही काहीही करत नाहि. कित्येक मराठी खेळाडू आज सरकारच्या मदतीची वाट पहात आहेत. त्यांच्याकडे बुद्धिमत्ता आहे, प्रतिभा आहे. पण परिस्थिती नाहि. त्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकार पुढे येत नाहि. हे चित्र बदलले पाहिजे.