भारत वि. श्रीलंका वन डे : शिखर धवनची दमदार कामगिरी, दिग्गजांचे रेकाॅर्ड मोडीत

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

भारत वि. श्रीलंका वन डे : शिखर धवनची दमदार कामगिरी, दिग्गजांचे रेकाॅर्ड मोडीत

 भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताने दमदार कामगिरी केली आहे. कर्णधार शिखर धवनने नाबाद ८६ धावांचा पल्ला गाठत एक दिवसीय क्रिकेटमधील ६००० धावांचा टप्पा पूर्ण केला आणि या धावांनी त्याने माजी कर्णधार सौरव गांगुलीचा विक्रमही मोडीत काढला. याशिवाय त्याने इतर अनेक आजी-माजी दिग्गज क्रिकेटपटूंचे रेकाॅर्ड या निमित्ताने मोडले आहेत.

सहा हजार धावा करणारा १३ वा भारतीय खेळाडू
धवनने सहा चौकार आणि एक षटकार लगावत ८६ धावा काढल्या. धवन सहा हजार धावा करणारा १३ वा भारतीय खेळाडू ठरला आहे. या यादीत सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, विरेंद्र सहवाग, गौतम गंभीर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, युवराज सिंह, सुरेश रैना, मोहम्मद अझरुद्दीन या भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश आहे. केवळ गांगुलीचाच नव्हे तर शिखरने वेस्ट इंडिजचे सर विवियन रिचर्ड आणि इंग्लंडचा कर्णधार जो रुट यांनाही पिछाडीवर टाकले आहे.

विराटनंतर सर्वांत वेगवान धावा करणारा शिखर दुसरा भारतीय फलंदाज
धवनने १४० इनिंग्समध्ये सहा हजार धावा केल्या. याआधी गांगुलीने १४७ इनिंग्स, विराट कोहलीने १३६ इनिंग्समध्ये सहा हजार धावांचा रेकाॅर्ड केला होता. विराटनंतर सर्वांत वेगवान सहा हजार धावा करणारा शिखर धवन दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. या आधी सर्वांत जलद सहा हजार धावा पूर्ण करण्याचे रेकॉर्ड दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम अमलाच्या नावावर आहे. अमलाने केवळ १२३ सामन्यांतच हा विक्रम केला होता. अमलानंतर दुसऱ्या क्रमांकावर भारताचा कर्णधार विराट कोहली (१३६ सामने) आणि तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन (१३९ सामने) आहे.

सर्वांत वयस्कर भारतीय कर्णधार, ३७ वर्षांचा रेकाॅर्ड मोडला
शिखर धवन सर्वांत वयस्कर भारतीय कर्णधार ठरला आहे. धवनचे वय आता ३५ वर्षे आहे. या आधी मोहिंदर अमरनाथ वयाच्या ३४ व्या वर्षी कर्णधार बनले होते. कर्णधारपद भूषवून शिखरने ३७ वर्षे जुना रेकॉर्ड मोडला आहे.