दिल्लीतील भाजप नेत्यांच्या दबावामुळे एनसीबीने मोहीत कंभोजच्या मेहुण्यासह दोघांना सोडले

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

दिल्लीतील भाजप नेत्यांच्या दबावामुळे एनसीबीने मोहीत कंभोजच्या मेहुण्यासह दोघांना सोडले

मुंबई : क्रुझवरील ड्रग्ज पार्टीतील एकूण १३०० लोकांमधून ११ लोकांना एनसीबीने ताब्यात घेतले होते मात्र त्यातील तीन जणांना त्यांनी का सोडले असा सवाल करतानाच रिषभ सचदेवा हा भाजपचे नेते मोहित कंभोज यांचा मेहुणा असल्याने सोडण्यात आल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत करुन पुन्हा एकदा भाजप आणि एनसीबी कनेक्शन उघड केले आहे.

दोनच दिवसांपूर्वी नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन एनसाबी आणि भाजपचे कनेक्शन उघड केले होते आणि आज नवाब मलिक यांनी भाजप युवा मोर्चाचे मोहित कंभोज यांच्या मेहुण्याला ताब्यात घेऊनही सोडल्याचा व्हिडीओ माध्यमांसमोर मांडून खळबळ उडवून दिली आहे.रिषभ सचदेवा, प्रतिक गाभा,अमीर फर्निचरवाला या तिघांना ताब्यात घेताना आणि त्यांच्या नातेवाईकांसोबत एनसीबी च्या कार्यालयातून बाहेर पडतानाचा व्हिडीओही मलिक यांनी माध्यमांसमोर आणला. क्रुझवर धाड टाकण्यात आली त्यावेळी ती १२ तास सुरू होती.त्यातील ११ लोकांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर अकरा जणांना एनसीबीच्या कार्यालयात आणण्यात आले.परंतु त्यापैकी तीन लोकांना सोडण्याचा आदेश दिल्लीवरून नेत्यांनी केल्याचा खळबळजनक दावा मलिक यांनी यावेळी केला. क्रुझवरील ही धाड ठरवून केलेला दिखावा होता. सेलिब्रिटींना बोलावून त्यांना अडचणीत आणण्याचा हा प्रकार होता. त्यामुळे एनसीबीचे विभागिय अधिकारी समीर वानखेडे यांनी 'त्या' तिघांना का सोडले आणि कुणाच्या सांगण्यावरून सोडले याचा खुलासा करावा अशी मागणीही मलिक यांनी केली.

रिषभ सचदेवा याला बाहेर सोडताना त्यांचे वडील आणि काका सोबत होते.या तीन व्यक्तींचे नातेवाईक एनसीबीच्या कार्यालयात आले कसे.त्यामुळे रिषभ सचदेवाचे वडील आणि काका विभागिय अधिकारी समीर वानखेडे यांचे मुंबई पोलिसांनी कॉल डिटेल्स चेक केले तर संपूर्ण सत्य बाहेर येईल असेही मलिक म्हणाले.केंद्रातील भाजप नेत्यांच्या दबावाखाली तिघांना सोडण्यात आले आहे. एमसीहीच्या कारवाईत सुरुवातीपासून भाजपचे कनेक्शन होते हे सिद्ध झाले आहे.हे सगळं न्यायालयात सिद्ध होईलच परंतु जनतेच्या न्यायालयातही आले पाहिजे म्हणून हे प्रकरण मांडल्याचे मलिक यांनी सांगितले.एनसीबीने पत्रकार परिषद घेऊन आम्ही केलेले आरोप फेटाळून लावले आणि माझ्या जावयाला अटक केल्यामुळे त्यांनी हे केल्याचा आरोप केला.मात्र मी सुरुवातीपासून न्यायालयावर विश्वास ठेवून आहे.न्यायालयात जावई आपले निर्दोषत्व सिध्द करेल.मी पहिल्या पत्रकार परिषदेत सवाल उपस्थित केला त्यावेळी न्यायालयात जाऊन दाद मागा असे सांगण्यात आले. आताही काही सवाल उपस्थित केले आहेत. जे लोकसेवक म्हणवून घेत आहेत त्यांनी या सवालांचे उत्तर दिले पाहिजे असेही मलिक म्हणाले.दरम्यान हे प्रकरण गंभीर असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यामध्ये लक्ष द्यावे अशी मागणीही मलिक यांनी यावेळी केली.