थाळीफेकपटू कमलप्रीतची सहाव्या क्रमांकाची कामगिरी

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

थाळीफेकपटू कमलप्रीतची सहाव्या क्रमांकाची कामगिरी

टोक्यो : थाळीफेकपटू कमलप्रीत कौरने कारकीर्दीतील पहिल्या ऑलिम्पिकमध्ये सहाव्या क्रमांकाची कामगिरी केली. सोमवारी झालेल्या अंतिम फेरीत स्पर्धकांच्या कामगिरीवर पावसाचा फटका बसला. परंतु कमलप्रीतने ६३.७० मीटर अशी सर्वोत्तम कामगिरी केली.

२५ वर्षीय कमलप्रीतने शनिवारी झालेल्या पात्रता स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी करीत अंतिम फेरी गाठली. पण पावसामुळे जवळपास एका तासाचे नुकसान झालेल्या अंतिम फेरीत पदकासाठी दावेदारी करू शकणारी कामगिरी तिच्याकडून झाली नाही. तिने तिसऱ्या प्रयत्नात सर्वोत्तम ६३.७० मीटर अंतरावर थाळी फेकली. याचप्रमाणे राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या कृष्णा पुनियाने २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये केलेल्या कामगिरीची तिने बरोबरी साधली.

पंजाबच्या खाबरवाला गावातील शेतकऱ्याची कन्या असलेल्या कमलप्रीतने भारताच्या पदकांच्या आशा उंचावल्या होत्या. संपूर्ण स्पर्धेत कमलप्रीत आपल्या वैयक्तिक प्रशिक्षकाशिवाय खेळली. त्यामुळे आत्मविश्वासाचा अभाव तिच्यात जाणवत होता. २०१७मध्ये जागतिक विद्यापीठ या एकमेव आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ती सहभागी झाली होती.

अमेरिकेच्या व्हॅलारी ऑलमनने पहिल्याच प्रयत्नात ६८.९८ मीटर अंतरावर थाळी फेकून सुवर्णपदक जिंकले. जर्मनीच्या क्रिस्टिन पुडेन्झला (६६.८६ मी.) रौप्य आणि क्युबाच्या विश्वविजेत्या यॅयमी पेरेझला (६५.७२ मी.) कांस्यपदक मिळाले.