अध्यापकांच्या तासिका तत्त्वावरील धोरणात सुधारणा करण्यासाठी समिती

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

अध्यापकांच्या तासिका तत्त्वावरील धोरणात सुधारणा करण्यासाठी समिती

मुंबई : पदवी महाविद्यालये आणि विद्यापीठात अध्यापकांना तासिका तत्त्वावर नेमण्याच्या धोरणात सुधारणा करण्यासाठी उच्चशिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे.

प्रचलित तासिका तत्त्वावर नियुक्ती करावयाच्या धोरणाचा आढावा ही समिती घेईल. त्यात काही त्रुटी आढळून आल्यास अन्य पर्यायी धोरण ठरविण्याची जबाबदारी समितीवर असेल. तसेच तासिका तत्त्वावर नियुक्ती देण्यासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, पात्रता, अनुभव व अटीशर्ती या विद्यापीठ अनुदान आयोगाप्रमाणे व राज्य सरकारने वेळोवेळी केलेल्या नियमांनुसार आहेत की नाही, याची तपासणी समिती करेल. अध्यापकांच्या नियुक्तीसाठी येणाऱ्या अडचणींचा आढावा घेऊन त्यांचे कशा पद्धतीने निराकरण करता येईल, याबाबत शिफारसी करेल. समितीला दोन महिन्यात आपला अहवाल सादर करायचा आहे.

‘नेट-सेट, पीएचडीधारक संघर्ष समिती’च्या विविध मागण्यांबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. त्यावेळी ही समिती नेमण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले होते.

त्यानुसार शिक्षण संचालक धनराज माने यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या माजी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य उल्हास उढाण, नेट-सेट, पीएचडीधारक संघटनेचे प्रतिनिधी यांची सदस्य म्हणून तर शिक्षण संचालनालयातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी डॉ. अजिता शिंदे सदस्य सचिव म्हणून समावेश करण्यात आला आहे.