ऐतिहासिक! चार दशकांनंतर भारतीय हॉकी संघाची ऑलिम्पिक पदक कमाई

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

ऐतिहासिक! चार दशकांनंतर भारतीय हॉकी संघाची ऑलिम्पिक पदक कमाई

टोक्यो : सुमारे चार दशकांनंतर (४१ वर्षांनी) भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई केली आहे. हा एक ऐतिहासिक क्षण आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आज झालेल्या चुरशीच्या सामन्यात भारताने जर्मनीवर ५-४ मात करत कांस्य पदकावर शिक्कामोर्तब केले. हॉकीपटू गुरजंत सिंह यांच्या कुटुंबीयांनी कांस्य पदक मिळाल्यानंतर जल्लोष केला.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच जर्मनी आक्रमक खेळी करत होती. सामना सुरू झाल्यावर अवघ्या काही मिनिटांतच पहिला गोल डागत जर्मनीने आघाडी घेतली होती. पण, भारताने आपल्या संयमी खेळीच्या जोरावर जर्मनीचे आव्हान संपुष्टात आणले आणि पुढे विजयश्री खेचून आणली. भारताचा गोलकिपर श्रीजेशने उत्तम खेळी करत जर्मनीचे अनेक गोल परतवून लावले. श्रीजेशच्या अभेद्य भिंतीमुळेच भारताचा विजयाचा मार्ग सुकर झाला.

अशी झाली चुरशीची लढत
भारतीय संघाने सुरुवातीपासून जर्मनीवर वर्चस्व पाहायला मिळाले. भारताने ५-३ अशी आघाडी घेतली होती. भारताने तिसऱ्या क्वार्टरमध्ये दोन गोल केले. तर ३१ व्या मिनिटाला चौथा गोल केला. पुन्हा एकदा संधी मिळाली तेव्हा रुपिंदरने पेनल्टी स्ट्रोकचे गोलमध्ये रुपांतर केले.
दुसरीकडे, चौथ्या क्वार्टरची जर्मनीने शानदार सुरुवात केली होती. ४८ व्या मिनिटाला जर्मनीने चौथा गोल केला. या गोलमुळे भारताची आघाडी कमी झाली होती. मात्र अखेर जर्मनी संघाला ५-४ ने हरवत भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्यपदकाची कमाई केली.
भारतासाठी सिमरनजीत सिंहने दोन, हरमनप्रीत सिंह, रुपिंदर पाल सिंह आणि हार्दिक सिंहने प्रत्येक एक-एक गोल डागत सामन्यात जर्मनीवर मात करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावली.

१९८० मध्ये मॉक्सो ऑलिम्पिकमध्ये केली होती सुवर्ण पदक कमाई
या आधी भारताच्या वासुदेवन भास्करनच्या नेतृत्त्वात १९८० मध्ये मॉक्सो ऑलिम्पिकमध्ये भारताने सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले होते. आजच्या पदकासोबतच ऑलिम्पिकमध्ये हॉकीत भारताच्या पदकांची संख्या १२ झाली आहे. यापैकी आठ सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्य पदकांचा समावेश आहे. असा विक्रम करणारा भारतीय हॉकी संघ जगभरातील एकमेव संघ आहे.