तमिळ राजकारणाची दुसरी बाजू

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

तमिळ राजकारणाची दुसरी बाजू

कोणताही  काळ आपापल्या भूमिकांवर चिकटून रहाण्याचा नसतो.  कोणत्याही प्रकारे आपल्या शत्रुशीही प्रसंगी तडजोड करून आपले इप्सित साध्य करून घेण्याचा असतो.  राजकारणातील हा मूलमंत्र खरेतर पूर्वीपासून चालत आला आहे. याचेच प्रत्यंतर सध्या तमिळनाडूचे मुख्यमंत्रि आणि द्रमुकचे मुख्यमंत्रि एम के स्टॅलिन यांनी घ़डवले आहे. स्टॅलिन यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांची केंद्राविरूद्ध भूमिका बरीचशी सौम्य झाल्याचे दिसत आहे. स्टॅलिन हे स्वबळावर मुख्यमंत्रि झालेले आहेत. त्यांना कुणाचीही हांजीहांजी करण्याची गरज नाहि. परंतु केंद्राशी वैर पत्करले तर केंद्राच्या हातात तपास यंत्रणा आहेत. त्या कोणत्या नं कोणत्या प्रकारे आपल्याला अडचणीत आणू शकतात, हे त्यांना चांगले माहित आहे. याच कारणामुळे नव्हे तर बाकीही अनेक कारणे आहेत,  ज्यामुळे स्टॅलिन यांनी भाजपशी जमवून घ्यायचे ठरवलेले दिसते. अनेक केंद्राच्या योजना राज्यांना राबवाव्या लागतात आणि त्यात केंद्राचे सहकार्य खूप महत्वाचे ठरते. आणि राज्यांनी कितीही आरडाओरड केली तरीही केंद्राच्या तुलनेत राज्यांना मर्यादित सत्ता असते, हे तर मान्य करावेच लागेल. स्टॅलिन यांनी मोदी यांची भेट घेतल्यानंतर आपला सुर मवाळ केला, यामुळे खुद्द द्रमुकमध्ये अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपचा मित्र पक्ष असलेल्या अण्णाद्रमुकवर भाजपची बी टीम असल्याचा आरोप करत स्टॅलिन यांनी सत्ता मिळवली. आणि आता तेच स्टॅलिन भाजपशी जुळवून घेत आहेत, यामुळे द्रमुकमधील अनेकांना पक्षाची जनतेतील प्रतिमा मलिन होईल, खरा अस्वस्थ झाला आहे तो अण्णा द्रमुक पक्ष. आणि त्या पक्षाने अस्वस्थ होण्याचे कारण केवळ स्टॅलिन यांची भूमिका नरम झाली, हेच नाहि. भाजपनेही आपला सूर मवाळ करत द्रमुकच्या गैरब्राम्हण व्यक्तिंना मंदिरांत पुजारी नेमण्याच्या निर्णयास पाठिंबा जाहिर केला आहे. याचा अर्थ, भाजपनेही आता द्रमुगशी जुळवून घ्यायचे ठरवले आहे. या दोन्ही पक्षांनी अचानक युद्धबंदी जाहिर केल्याने अण्णाद्रमुक अस्वस्थ आहे. भाजप आणि द्रमुक अशी समीकरणे पुढे जुळून आली तर अण्णाद्रमुकचे मोठे नुकसान होईल. सध्या द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन्ही द्राविड राजकारण करणार्या पक्षांकडे आपापल्या संस्थापकांची पुण्याई यापलिकडे काहीही भांडवल नाहि. त्यातल्या त्यात द्रमुककडे राज्यातील सत्ता तरी आहे. त्यामुळे त्यांना सत्तेच्या जोरावर काही तरी करता येईल. परंतु अण्णाद्रमुककडे काहीच उरलेले नाहि. अर्थात त्यांनाही जनतेने चांगल्या जागा दिल्या आहेत. अगदीच त्यांना लाथाडलेले नाहि. त्यामुळे भविष्यात कदाचित अण्णाद्रमुकवर एकट्याने लढण्याची वेळ आली तरीही ते सहानुभूतिचा फायदा मिळवून सत्तेतही परतू शकतात.  आता ती शक्यता खूप दूरची आहे. पण स्टॅलिन यांनी केंद्राशी सतत विरोधाची भूमिका घेऊन आपली कामे होत नाहि, हे  ओळखून तह केला आहे. हा त्यांचा भविष्यातील मास्टरस्ट्रोक ठरू शकतो किंवा अगदीच अंगलट येऊ शकतो. कारण द्रमुकचे मतदार आणि इतर नेते हे भाजपचे अत्यंत कडवे विरोधक आहेत. ते स्टॅलिन यांच्याच विरोधात जाऊ शकतात. तसेही स्टॅलिन आणि त्यांचे मोठे बंधु उदयनिधी यांच्यात मुळीच पटत नाहि. ते या स्थितीचा लाभ घेऊ शकतात. स्टॅलिन यांनी भाजपशी म्हणजे केंद्राशी जमवून घेण्याची अनेक मजबूत कारणे आहेत. एकतर तमिळनाडू आर्थिक पेचप्रसंगाशी लढा देत आहे. त्यावर मात करण्यासाठी त्यांना केंद्राची मदत हवी आहे. दुसरे, एनईईटीमधून त्यांना सवलत हवी आहे आणि कावेरी नदीवर धरण बांधण्याची कर्नाटकची योजना हाणून पाडण्यासाठी त्यांना केंद्राचा आशिर्वाद हवाच आहे. कारण कर्नाटकमध्ये भाजपचेच सरकार आहे. यामुळे स्टॅलिन सध्या तारेवरची कसरत करत आहेत. नोटबंदी आणि जीएसटीमुळे राज्यांच्या करसंकलनावर चांगल्याच मर्यादा आल्या आहेत तर केंद्रिय करांमधील तमिळनाडूचा वाटा प्रत्येक वित्त आयोगाने कमी कमी करत आणला आहे. नीट परिक्षेत सतरा वर्षाच्या मुलीने आत्महत्या केल्यापासून हा मुद्दा तमिळनाडूत खूप भावनात्मक बनला आहे आणि नीट परिक्षा रद्द करण्याचे आश्वासन देतच स्टॅलिन सत्तेत आले आहेत. मात्र अशी परिक्षा रद्द करायची तर त्यांना केंद्राची संमती आवश्यक आहे. मेकेडाटू धरण बांधण्याची कर्नाटकची योजना पूर्णत्वास गेली तर कावेरी खोर्यात द्रमुकची मते जाणार आहेत. कारण हा भाग द्रमुकचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे हे धरण होणे स्टॅलिन यांच्यासाठी राजकीय आत्महत्या ठरणार आहे. हे धरण झाले तर अण्णाद्रमुकला आयताच मुद्दा द्रमुकविरोधात मिळेल. त्यामुळे स्टॅलिन काय वाट्टेल ते करून धरण होऊ देणार नाहित. त्यासाठी त्यांन केंद्राशी पुन्हा जुळवून घ्यावेच  लागेल. असे अनेक कंगोरे स्टॅलिन यांच्या बदललेल्या भूमिकेचे आहेत. त्याचवेळी भाजपने गैरब्राम्हण व्यक्तिंना मंदिराचे पुजारी नेमण्याच्या निर्णयास पाठिंबा दिला आहे, त्यामुळे भाजप जो ब्राम्हणांचा पक्ष समजला जातो, त्यालाही ब्राम्हणेतर जातींत आपला विस्तार करण्यासाठी आधार मिळाला आहे. भाजपला याचा भविष्यात फायदा होणार आहे. मात्र भाजपविरोधी सौम्य पवित्रा घेतल्यामुळे द्रमुकच्या मतदारांमधून जोरदार विरोध होऊ शकतो. तसेच द्रमुकचे इतर मित्रपक्षही आक्रमक भूमिका घेऊ शकतात. कारण ते प्रखर भाजपविरोधी आहेत. परंतु द्रमुककडे इतक्या जागा आहेत, की त्याने फारसा फरक पडणार नाहि. मात्र द्रमुकचे मतदार भाजपविरोधी व्यासपीठ म्हणून द्रमुककडे आले आहेत. ते द्रमुकपासून दूर जाऊ शकतात. मात्र नवीन राजकारण काय वळण घेते, हे काळच ठरवणार आहे.