मीराबाई प्रकाशाचा किरण

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मीराबाई प्रकाशाचा किरण

मीराबाई चानु या मणिपूरच्या एका गरिब परिवारातील मुलीने शनिवारी भारताला अंधकारात प्रकाशाचा किरण दाखवला. तिने टोकियो ऑलिंपिकमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये ४९ किलो वजनी गटात भारताला रौप्य पदक मिळवून दिले. तिची ही कामगिरी जरी फारशी जबरदस्त नव्हती तरीही तिने भारतासाठी पदकांचे उद्घाटन केले आणि त्याचवेळेस इतर भारतीय खेळाडुंनी निराशा केली असताना मीराबाईची कामगिरी झळाळून उठली. मीराबाईच्या कामगिरीचे महत्व यासाठी आहे की ती अत्यंत गरिब परिस्थितीतून आली आहे. मणिपूरमध्ये एका लहानशा गावात जन्मलेली ही मुलगी आपल्या भावाबरोबर स्वयंपाकासाठी लाकडे गोळा करण्यासाठी रानात जात असे. वजनदार लाकडे गोळा करून आणताना तिचे वेटलिफ्टिंगचे कौशल्य वाढले. २०१६ च्या ऑलिंपिकमध्येही ती गेली होती परंतु तेथे तिने निराशा केली. त्यासाठी तिच्या आईने स्वतःचे सोने विकून तिला केलेल्या लकी इअरिंगही कामाला आल्या नाहित. यंदा मात्र त्या इअरिंगचा प्रताप दिसला असावा. मीराबाई चानूचे यश एकमेव प्रकाशाचा किरण यासाठी म्हटले की शनिवारीच इतर भारतीय खेळाडूंनी मात्र घोर निराशा केली. भारतच्या आशास्थान म्हणून पाहिला गेलेला सौरभ चौधरी १० मीटर एअर पिस्तुल नेमबाजीत अंतिम फेरीत तर पोहचला, पण तेथे अगदीच खराब कामगिरी करत सातव्या स्थानावर राहिला. त्याने केलेली निराशा ही खरोखरच चिंताजनक आहे. त्याला आता मनु भाकरबरोबर आणखी एक मिश्र स्पर्धेत संधी मिळेल. जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या अभिषेक वर्मानेही निराशा केली. या सर्व पार्श्वभूमीवर मीराबाईची कामगिरी उठून दिसली. खरेतर  भारताच्या सार्या आशा या नेमबाजीवर होत्या. परंतु त्यांनीच नेमकी निराशा केल्यानंतर मीराबाईच्या पदकाचे यश जास्तच खुलून दिसते. मुळात भारतात इतर खेळांना फारच कमी ग्लॅमर आहे. क्रिकेट गावागावात पोहचले आहे. तसे इतर खेळ देशी असूनही तसे झालेले नाहि. इतर देशी खेळांमध्ये पैसा नाहि आणि ग्लॅमरही नाहि. क्रिकेटपटुंना जशा जाहिराती मिळतात तशा इतर खेळाडुंना क्वचितच मिळत  असतील. अर्थात गेल्या काही वर्षांत भारतीय समाजाची विशेषतः तरूणांची मानसिकता बदलत आहे. आता इतर खेळांनाही चांगली प्रसिद्धी आणि ग्लॅमर मिळत आहे. क्रिकेट एके क्रिकेट असे राहिलेले नाहि. इतर खेळाडू हे भारताच्या अगदी ग्रामीण आणि गरिब परिस्थितीतून येतात. अर्थात क्रिकेटमध्येही आता शहरांची मक्तेदारी राहिलेली नाहि. अनेक क्रिकेटपटु आता लहान शहरांमधूनही आलेले आहेत. ग्रामीण भागात क्रिडा संस्कृती रूजली आहे. ईशान्येकडील राज्यांबाबत उर्वरित भारताला खूपच माहिती आहे आणि ईशान्येतही भारताबाबत फारशी आस्था नाहि. अशा परिस्थितीत मणिपुरी मुलगी ऑलिंपिकमध्ये पहिल्याच दिवशी रौप्य पदक मिळवून आपल्या देशाला पदक अर्पण करते, हे खूपच विशेष आहे. मीराबाईने मिळवलेले यश सहजसाध्य नाहि. कोणतेही यश तसे नसतेच. त्यासाठी अफाट परिश्रम आणि त्याग तर करावाच लागतो. भारताचा ऑलिंपिक स्पर्धेचा इतिहास असा आहे की, पथकाकडून आशा तर खूपच असतात,पण त्यात फारच थोड्या साकार होतात. संपूर्ण स्पर्धा पदकासाठी  प्रतिक्षा करण्यात कित्येक स्पर्धा संपल्या आहेत. परंत पदक हाती आले नाहि. आता मीराबाईने पहिल्याच दिवशी पदक मिळवून खाते उघडले, हे विशेष आहे. नेमबाजांनी निराशा केली नसती तर शनिवारचा दिवस भारतासाठी ऐतिहासिक ठरला असता. ईशान्येत आता खूपच परिस्थिती बदलली आहे. विशाल क्रिडासंकुले तेथे उभारण्यात आली आहेत. त्यातून चांगले प्रतिभाशाली दर्जेदार खेळाडू तयार होत आहेत. मीराबाई चानु ही या संस्कृतीचीच देणगी आहे. २००० मध्ये कर्नाम मल्लेश्वरीने भारतासाठी कांस्य पदक मिळवले  होते. त्यानंतर रौप्य पदक जिंकण्यासाठी तब्बल २१ वर्षे वाट पहावी लागली. त्यात एक वर्ष महामारीचे गेले. परंतु आता पदक मिळाल्याने त्या प्रतिक्षेचे काही तरी समाधान झाले. मीराबाईसाठी ही कामगिरी वैयक्तिक समाधानाची असेल. कारण २०१६ चे वर्ष तिच्यासाठी फारच निराशाजनक गेले होते. त्यानंतर आता चार वर्षांनी तिने रौप्य पदक मिळवून त्या निराशेवर काही अंशी मात केली आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे महिलांनीच भारताला पदक प्राप्त करून दिली आहेत, यावर पुन्हा शिक्कामोर्तब झाले आहे. रिओ ऑलिंपिकमध्येही भारताला पहिली पदके   पी व्ही सिंधु आणि साक्षी मलिक  या महिलांनीच मिळवून दिली होती.  आता मीराबाई चानू, त्यापूर्वी मेरी कोम अशा महिलांनीच भारताला पदकांनी श्रीमंत केले आहे. तरीही मीराबाईच्या यशाचे महत्व यासाठी आहे की पूर्वी भारतीय पथक जात असे आणि एकही खळबळ न उडवता परत येत असे. आता तसे राहिलेले नाहि. मीराबाईनंतर आता इतर खेळाडुंनी पाच सहा तरी पदके आणली तर मीराबाईच्या कामगिरीचे चीज होईल, असे वाटते. इतर खेळाडू निराशा करत असताना मीराबाईने प्रकाशाचा किरण दाखवला आहे. त्या प्रकाशात इतरांनी वाटचाल करावी, हीच अपेक्षा आहे.