१४ कोटी मुलं गभमनपासून वंचित

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

१४ कोटी मुलं गभमनपासून वंचित

कोविडचे दुष्परिणाम हळूहळू प्रकाशात येऊ लागले आहेत. कोविडचा सर्वात मोठा दुष्परिणाम जर कोणत्या एका क्षेत्रावर झाला असेल तर तो शिक्षणावर. ऑनलाईन शिक्षण हे खऱे शिक्षण नाहि, हे सार्यांच्याच लक्षात आले आहे. आणि त्यातून मुलांना खरे ज्ञान मिळतच नाहि, हेही आता समजू लागले आहे. तरीही सध्या लाटांचा अंदाज नसल्याने अनिश्चिततेच्या समुद्रात शिक्षणाचे जहाज अजूनही हेलकावेच खात आहे. त्याला एक ठोस दिशाच नाहि.  भारतच नव्हे तर जगभरातील शिक्षणाची अशीच दुरवस्था आहे. एका आकडेवारीनुसार, जगभरातील १४ कोटी मुलांना अजूनही कोविडमुळे शाळेचा स्पर्श झालेला नाहि. नुसते ते शाळेपासूनच वंचित राहिले आहेत, असे नाहि तर त्यांना शिक्षणाचे ए फॉर अपल, बी फॉर बॅट किंवा गभमन अशी लिपीची ओळखही झालेली नाहि. घरात एक मुलगा किंवा मुलगी अशिक्षित असेल तर घराचा अनर्थ होण्यास वेळ लागत नाहि. विचार करा, १४ कोटी मुलं जर अक्षरओळखही नसलेली अशी असतील तर जगाला त्याची किती भारी किमत चुकवावी लागेल. शाळेत आपले पहिले पाऊलही अद्याप टाकू न शकलेली ही १४ कोटी मुलं मोठी होतील तेव्हा त्यांना जगण्यासाठी किती मोठा संघर्ष करावा लागेल, हा विचारही अंगावर काटा येणारा आहे. अशिक्षितपणाचा दुसरा परिणाम अर्थातच गुन्हेगारी वाढण्यात असतो. आपण न शिकलेल्या अवस्थेकडून शिकलेल्या अवस्थेत आलो आणि आता पुन्हा जुन्याच अवस्थेकडे चाललो आहोत. हा कोविडचा दुष्परिणाम तर आहेच. परंतु राज्यकर्त्यांच्या मूर्खपणाचा यात भरपूर हातभार आहे. कोविडचे संक्रमण कमी झाल्यानंतर योग्य ती दक्षता घेऊन शाळा सुरू करता आल्या असत्या. पण अतिबोटचेपेपणाचे धोरण राहिल्याने लाखो मुलांना आज शाळा म्हणजे काय ते माहित नाहि. भारतात मार्च २०२० पासून कोविड प्रणित टाळेबंदीचा परिणाम दिसण्यास सुरूवात झाली. परंतु अनेक युरोपीय देशांमध्ये २०२०च्या सुरूवातीपासूनच टाळेबंदीला सुरूवात झाली होती. यामुळे मुले घरांतच कैद झाली. यातून थोडी सुटका मिळण्याची आशा दिसली आणि शाळा सुरू करण्याची तयारी सुरू झाली. तर दुसरी लाट त्यापेक्षाही जोरात आली आणि सारे मनोरथ वाया गेले. मुले पुन्हा आपापल्या घरांमध्ये कैद झाली. आणि आता खरेतर कोरोनाचे प्रमाण कमी आहे आणि शाळांनी योग्य ती दक्षता घेऊन शिक्षण सुरू करण्याची तयारी केली आहे. परंतु पुन्हा पालकांच्या मनात भीती आहे. ते मुलांना शाळेत पाठवण्यास तयार नाहित. त्यांची भीती रास्तही आहे कारण मुले एकत्र आली की एकमेकांच्या गळ्यात गळे टाकणारच. त्यांना कुणीच रोखू शकत नाहि. त्यामुळे कोविड संसर्गाची मोठी भीती पालकांच्या मनात आहे. परंतु तशीही मुले एरवी फिरत असतातच. मग शाळेत जाऊनच त्यांना कोरोना संसर्ग होणार आहे, असे नाहि. परंतु इतका विचार करण्याच्या मनात पालक नसतील तर त्यांना दोष देण्यात काही अर्थ नाहि. सरकार पालकांच्या मनातील भीती काढून टाकण्यास असमर्थ ठरले आहे, ही खरी चिंता आहे. युनिसेफच्या एका ताज्या अहवालात, प्रथमच शाळेत प्रवेश घेणार्यांच्या शाळेतील पहिले पाऊल टाकण्याची प्रतिक्षा आता दिर्घच नव्हे तर चिंताजनक अवस्थेपर्यत पोहचली आहे. तिसर्या लाटेमुळे मुलांना जास्त धोका असल्याचा अहवाल असल्याने पालकांचेही आता मुलांना शाळेत पाठवण्याचे धाडस होत नाहि. आपल्याकडे काही राज्यांत सहावी आणि काही ठिकाणी दहावीच्या शाळा उघडण्यास सुरूवात झाली आहे. परंतु सर्व शाळा व्यवस्थित सुरू होतील, आणि सारे वर्ग भरतील, हे केवळ दिवास्वप्न रहाणार आहे. ऑनलाईन शिक्षणाचा ढिंढोरा पिटला जात असला तरीही त्याच्या दर्जाबाबत प्रचंड शंका आहेत. शिक्षक आणि मुलांमध्ये थेट शिकताना जे एक नाते तयार होते, त्याचा यात अभाव असतो. तसेच मुले मोकळेपणी शंका विचारू शकत नाहित, कारण शिक्षक समोरच नसतात. त्यांना व्हिडीओद्वारे किंवा व्हॉट्सअपवर संदेश पाठवून शंका विचाराव्या लागतात आणि त्यातूनच उत्तर दिले जाते. यात मोठ्यांनाही धड समजत नाहि तर लहान मुलांना कितपत समजत असेल, याचा विचारच करायला नको. तसेच यातील तांत्रिक मर्यादांचा तर विचारच केलेला नाहि. अनेक गावांमध्ये नेटवर्कच नसते. सर्व मुलांकडे अँड्रॉईड फोन असतीलच, असेही नाहि. काही पालकांची ऐपतही नसते.  शिक्षणाच्या निमित्ताने मुलांकडे असे मोबाईल आले तर त्यांचे अधिकच दुष्परिणाम समोर येत आहेत. मुलांना नको त्या वेबसाईट पहाण्यापासून कुणीही रोखू शकत नाहि. शिवाय डोळे बिघडत आहेत ते वेगळेच. हा विषय वेगळा आहे. पण कोरोनाचा परिणाम अजून काही वर्षे तरी कमी होणार नाहि. कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाले असले तरीही त्याचा तितकासा प्रभाव कोविड आटोक्यात आणण्यात झालेला नाहि, हेही लक्षात घेणे आवश्यक आहे. अमेरिकेत मास्क वापरण्यापासून शिथिलता देण्यात आली आणि त्याचे दुष्परिणाम लगेच दिसून आले आहेत. कोरोनामुळे निर्बंध आणि त्यांचे गांभिर्य कायम रहाणार आहे. परंतु सर्वात गंभीर विषय हा आहे की ज्या मुलांनी अद्याप शाळेत पाऊलही टाकले नाहि, त्यांची पहिली दोन वर्षे वाया गेली आहेत. स्पर्धेच्या युगात मुलांची पहिलीच दोन वर्षे शिक्षणाशिवाय जाणे ही किती गंभीर गोष्ट असेल, हे त्या मुलांच्या किंवा त्यांच्या आईवडलांच्या जागी असल्याशिवाय समजणार नाहि. आजकालच्या स्पर्धेच्या तीव्र युगात मुलाने एक वर्ष उशिरा शिक्षण सुरू केले तरीही काय फरक पडतो, असे म्हटले तरी ते केवळ म्हणणे सोपे आहे. प्रत्यक्षात त्याचा फार मोठा झटका विद्यार्थ्यांना बसणार आहे.