इंग्लंड बोर्डानंही सांगितलं तरी मायकेल वॉन ऐकेना..!

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

इंग्लंड बोर्डानंही सांगितलं तरी मायकेल वॉन ऐकेना..!

भारत आणि इंग्लंड संघातील कसोटी मालिकेचा पाचवा सामना रद्द करण्यात आला. भारतीय शिबिरात करोनाच्या प्रवेशामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ही कसोटी रद्द करण्यात आली. पुढच्या सात दिवसांत आयपीएलचा दुसरा टप्पा सुरू होत असल्यामुळे ही कसोटी आयपीएलसाठी रद्द करण्यात आली, असे ब्रिटीश मीडियासह अनेकांनी म्हटले. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या (ईसीबी) प्रमुखांनीही मँचेस्टर कसोटी रद्द होण्याशी आयपीएलचा काहीही संबंध नसल्याचे म्हटले, पण माजी कर्णधार मायकेल वॉनने वेगळे मत दिले आहे.

वॉनने सोशल मीडियावर आपले मत व्यक्त केले आहे. ट्वीटमध्ये वॉन म्हणाला, ”आयपीएल संघांच्या खेळाडूंसाठी चार्टर्ड प्लेन…यूएईमध्ये सहा दिवसांचा क्वारंटाइऩ कालावधी .. स्पर्धा सुरू होण्यासाठी फक्त सात दिवस शिल्लक… आता मला सांगू नका की मँचेस्टर कसोटी आयपीएलपेक्षा इतर काही कारणांमुळे रद्द झाली.” दुसरीकडे, आयपीएलमध्ये खेळणाऱ्या इंग्लंडच्या काही खेळाडूंनी दुसऱ्या टप्प्यातून माघार घेतली आहे. इंग्लंडचे तीन खेळाडू डेव्हिड मलान, जॉनी बेअरस्टो आणि ख्रिस वोक्स यांनी माघार घेतली आहे. मँचेस्टर कसोटी रद्द झाल्यामुळे या तिघांनी माघार घेतल्याची चर्चा आहे. या खेळाडूंनी टी-२० वर्ल्डकप आणि अॅशेस मालिकेच्या तयारीचा हवाला देत आयपीएलमधून माघार घेतली आहे. पंजाब किंग्सने मलानऐवजी मार्करामला संघात समाविष्ट करण्याची घोषणा केली आहे.

आयपीएलच्या १४व्या हंगामातील उर्वरित ३१ सामने १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये होणार आहेत. करोना विषाणूच्या साथीच्या वाढत्या प्रकरणांमुळे भारतात सुरू झालेली आयपीएल -२०२१ मे महिन्यात स्थगित करण्यात आली. आता १९ सप्टेंबपासून ही स्पर्धा यूएईत रंगणार असून मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्याने स्पर्धेला सुरुवात होणार आहे.