जम्मू-काश्मीरच्या विभागणीमुळे दहशतवादी कारवाया कमी झाल्या – केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

जम्मू-काश्मीरच्या विभागणीमुळे दहशतवादी कारवाया कमी झाल्या – केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधल्या सर्वपक्षीय नेत्यांसोबतच नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली. या बैठकीनंतर जवळपास सर्वच नेत्यांनी समाधानकारक चर्चा झाल्याची प्रतिक्रिया दिली. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका घेण्याचं आश्वासन देखील पंतप्रधानांनी दिल्यानंतर आता केंद्रीय संक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या मुद्द्यावरून महत्त्वपूर्ण भूमिका मांडणारं ट्वीट केलं आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरचं विभाजन आणि पुन्हा पूर्ण राज्याचा दर्जा मिळण्याची शक्यता, याविषयी नवी चर्चा सुरू झाली आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला आणि पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी आधीच केंद्र सरकारवर टीका केली असताना या ट्वीटनंतर सकारात्मक सुरुवात झालेली चर्चा आता कोणत्या दिशेने जाणार, याविषयी राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चेला सुरुवात झाली आहे.

विभागणी राष्ट्रीय सुरक्षेसाठी हितकारक

आपल्या ट्वीटमध्ये राजनाथ सिंह यांनी जम्मू-काश्मीरची विभागणी केल्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा वाढण्यात हातभार लागल्याचं नमूद केलं आहे. “जम्मू-काश्मीर आणि लडाख अशा दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागणी करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे राष्ट्रीय सुरक्षेला मोठा हातभार लागला आहे. यानंतर मोठ्या प्रमाणावर दहशतवादी कारवाया कमी झाल्या आहेत. त्यासोबतच, दोन्ही प्रदेशांमधील लोकांसाठी या विभागणीनंतर सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या विकास करण्याच्या अनेक संधी खुल्या झाल्या आहेत”, असं राजनाथ सिंह यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.