राजस्थान रॉयल्सला ‘मोठा’ धक्का

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

राजस्थान रॉयल्सला ‘मोठा’ धक्का

आयपीएल संघ राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का बसला आहे. टीमचा प्रमुख खेळाडू आणि इंग्लंडचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर पुढच्या महिन्यात यूएईमध्ये सुरू होणाऱ्या २०२१ हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये खेळणार नाही. बटलरने आपले नाव मागे घेतले आहे. तो आता दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. त्यामुळे आता त्याला कुटुंबासोबत अधिक वेळ घालवायचा आहे.

राजस्थान रॉयल्सच्या टीमने ट्वीट करून ही माहिती दिली आहे. रॉयल्सने त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले, ”जोस बटलर आयपीएल २०२१मध्ये संघाचा भाग नसेल. जोस आणि लुसी बटलर लवकरच दुसऱ्यांदा पालक होणार आहेत. आम्ही त्यांना शुभेच्छा देतो.”

 

राजस्थान रॉयल्सनेही बटलरच्या बदलीची घोषणा केली आहे. बटलरच्या जागी न्यूझीलंडचा यष्टीरक्षक फलंदाज ग्लेन फिलिप्सचा संघात समावेश करण्यात आला आहे. ग्लेन कॅरेबियन प्रीमियर लीगमधील बार्बाडोस रॉयल्स संघाचा भाग आहे. ग्लेन फिलिप्सने आतापर्यंत २५ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने १४९.७०च्या स्ट्राईक रेटने ५०६ धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत १३४ टी-२० सामने खेळले आहेत, ज्यात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश आहे. यामध्ये त्याने १४२.२८च्या स्ट्राईक रेटने ३७४४ धावा केल्या आहेत. यात चार शतके आणि २३ अर्धशतकांचा समावेश आहे.