जन आशीर्वाद यात्रेमुळे करोना वाढण्याची भीती – अजित पवार

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

जन आशीर्वाद यात्रेमुळे करोना वाढण्याची भीती – अजित पवार

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या नवनियुक्त केंद्रीय मंत्र्यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे सांगण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी या यात्रेच्या आयोजकांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या यात्रेच्या निमित्ताने करोनाचे नियम शासकीय अधिकारी आणि पोलिसांच्या उपस्थितीत पायदळी तुडवले जात असल्याचे चित्र आहे. करोनाचे नियम धाब्यावर बसवत मुखपट्टीविना अनेक जण वावरताना दिसत आहेत. यावर आता राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.

“केरळमध्ये उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आल्यानंतर त्याचा फटका बसला आहे. देशपातळीवर सर्वात जास्त पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या केरळमध्ये आहे. महाराष्ट्राने महाराष्ट्राचं काम केलं पाहिजे. पण एकीकडे केंद्र सरकार करोनाबाबत लक्ष द्या असे सांगते आणि नवीन चार मंत्री झाले त्यांना यात्रा काढायला सांगत आहेत. जिथे जिथे यात्रा निघाल्या जिथे गर्दी झाली त्याचा फटका निश्चितपणे तिथे काही दिवसातचं आपल्याला दिसेल. तिथे करोना रुग्णसंख्या वाढू नये या मताचे आम्ही आहोतचं पण रुग्णसंख्या वाढली तर त्याला कोण जबाबदार याचाही विचार केंद्राने केला पाहिजे,” असे अजित पवार म्हणाले.

केंद्रात नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या केंद्रीय मंत्र्यांना आपापल्या जिल्ह्य़ात जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने जनमानसात जाण्याचे आदेश देण्यात आले होते.

याआधी संजय राऊत यांनी देखील केंद्रीय मंत्र्यांकडून काढण्यात येणारी ‘जन आशीर्वाद यात्रा’ ही करोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण आहे असे म्हटले होते. “जन आशीर्वाद यात्रा ही करोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण आहे हे सगळ्यांना माहिती आहे. सध्या ज्या प्रकारच्या गर्दीचं तुम्ही शक्तीप्रदर्शन करताय हे एक प्रकारे करोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचा इशारा दिला आहे. राज्याला अडचणीत आणण्यासाठी आपण हे मुद्दाम करताय. ठीक आहे पण किमान तुम्ही संयम पाळा,” असे संजय राऊत यांनी म्हटले होते.