१ जूनपासून मासेमारी बंद

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

१ जूनपासून मासेमारी बंद

मुंबई : महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ नुसार जून ते ३१ जुलै दरम्यान मासेमारी बंद ठेवण्याचे आदेश मत्स्य व्यवसाय विभागाने गेल्याच आठवडय़ात दिले आहेत. परंतु यंदा माशांचा अभाव आणि तौक्ते चक्रीवादळाचा फटका यामुळे मच्छीमारांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून जूनऐवजी १५ जूनपासून मासेमारी बंदी लागू करावी, अशी मागणी मच्छीमारांनी केली आहे.

जून-जुलै महिन्यात येणारे वादळी वारे, सोसाटय़ाचा पाऊस यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी दोन महिने मासेमारी बंद ठेवण्याचे आदेश सरकारकडून दिले जातात. शिवाय हा माशांचा प्रजनन काळ असल्याने मासेमारी करणे योग्य नसल्याचे मच्छीमार सांगतात. परंतु करोनामुळे कठीण काळ आल्याने नियमापेक्षा अधिक दिवस मासेमारी करण्यास परवानगी द्यावी, असे मत मच्छीमारांकडून व्यक्त होऊ लागले आहे.

मासेच उपलब्ध नसल्याने वर्षभर मच्छीमारांनी तोटा सहन केला. शिवाय वादळापूर्वी आणि वादळानंतर काही दिवस मासेमारी बंदच होती. यात जवळपास दहा दिवस गेले. आताही मासेमारी करताना पुरेसे मासे हाताला लागत नाहीत. त्यामुळे किमान १५ जूनपर्यंत मासेमारी करता आली तर आम्हाला दिलासा मिळेल,’ असे मढ येथील मच्छीमार संतोष कोळी यांनी सांगितले. त्या संदर्भात सरकारला निवेदनही देण्यात आले आहे.

मच्छीमार कृती समितीने मात्र या मागणीला विरोध के ला आहे. ‘आधीच तौक्ते चक्रीवादळात मच्छीमारांना नुकसान झाले आहे. त्यात जूनमध्ये मासेमारी सुरू ठेवली आणि त्यावेळी नैसर्गिक आपत्ती ओढवली तर मच्छीमारांच्या जीवाला धोका होऊ शकतो. शिवाय तसे झाल्यास जबाबदारी कुणाची असाही प्रश्न येतो. त्यामुळे मच्छीमारांनी पुढचा विचार करून या मागणीचा पुनर्विचार करावा, अशी विनंती अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी के ली आहे.

तीन महिने मासेमारी बंद असावी

या वर्षी राज्यातील सर्वच किनाऱ्यांवर माशांचा आभाव जाणवला. पर्ससिन नौकांचे संकट समोर असल्याने लहान मासेही मारले जात आहेत. परिणामी पारंपरिक मासेमारी करणारा वर्ग आज हलाखीचे जीवन जगत आहे. या सगळ्याचा विचार करताना माशांचे प्रजनन आणि वाढ याला वेळ देणे गरजेचे आहे. त्याला पुरेसा वेळ मिळाला तर पुढे आपल्यालाच मुबलक मासे मिळतील. म्हणून मासेमारी बंदचा कालावधी १५ मे ते १५ ऑगस्ट असा तीन महिन्यांचा असावा, अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केली आहे.

बंदीच्या काळातही मासे उपलब्ध

मासेमारी बंद असतानाही मासळी बाजारात तुलनेने कमी मासे विक्रीसाठी आलेले दिसतात. मासेमारी बंद होणार असल्याने त्याची पूर्वतयारी मोठय़ा व्यापाऱ्यांकडून एक महिना आधीपासून केली जाते. मे महिन्यात अधिकची मासेमारी करून दोन महिने पुरेल इतका मत्स्यसाठा ते बर्फात गोठवतात गरजेनुसार त्याची विक्री केली जाते. तर काही ठिकाणी या काळातही ताजे मासे मिळतात. कारण, दोन महिन्यांची बंदी केवळ यांत्रिकी बोटींना लागू आहे. किनाऱ्यालागत साध्या होडय़ा घेऊन मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर बंदी नसल्याने ते मासेमारी करतात.