नैसर्गिक आपत्तीमधील हानी टाळण्यासाठी विविध उपाययोजना जाहीर

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

नैसर्गिक आपत्तीमधील हानी टाळण्यासाठी  विविध उपाययोजना जाहीर

रत्नागिरी : कोकणातील जिल्ह्यांना चक्रीवादळासह नैसर्गिक आपत्तीचा वारंवार सामना करावा लागतो. या नैसर्गिक आपत्तीत कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यात जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी आवश्यक ठिकाणी बहुउद्देशीय निवारा केंद्रे, भूमिगत वीज वाहिन्या, धूपप्रतिबंधक बंधारे, लाइटनिंग अॅरेस्टर उभारण्यात येणार आहेत. यासाठी कोकण किनारपट्टीवरील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे परिपूर्ण प्रस्ताव तातडीने सादर करावेत, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले

 

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोकण किनाऱ्यावर आदळणाऱ्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने कायमस्वरुपी उपाययोजना करण्याबाबतची बैठक आज झाली. त्याबाबतची माहिती रत्नागिरी जिल्हा माहिती कार्यालयाने दिली आहे. बैठकीला मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (व्हीसीद्वारे), राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्तीमदत आणि पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांच्यासह कोकण विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

चक्रीवादळाच्यावेळी निर्माण होणाऱ्या समुद्राच्या मोठ्या लाटांनी जमिनीची धूप होऊ नये, यासाठी धूपप्रतिबंधक बंधारे बांधण्यात यावेत. चक्रीवादळासह इतर नैसर्गिक आपत्तीच्यावेळी वीज कोसळून जीवित आणि वित्त हानी टाळण्यासाठी आवश्यक अंतरावर लाइटनिंग अॅअरेस्टर उभारण्यात यावेत. ही सर्व कामे दर्जेदार, मजबूत, गुणवत्तापूर्ण असली पाहिजेत, यासाठी कोकण विभागातील जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले