गणेशोत्सवानिमित्त मुंबईतून २,१०९ एसटी आरक्षित

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

गणेशोत्सवानिमित्त मुंबईतून २,१०९ एसटी आरक्षित

रत्नागिरी : गणेशोत्सवानिमित्त कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी आतापर्यंत २ हजार १०९ एसटी गाड्या आरक्षित झाल्या आहेत. त्यात गट आरक्षणाच्या गाड्यांचाही समावेश आहे. मुंबई, ठाणे, पालघर तसेच पुण्यातून या गाड्या कोकणाकडे येणार असून त्यापैकी आज ४ सप्टेंबरला ४९ गाड्या निघाल्या आहेत.
उद्या, ५ सप्टेंबरला ६६ गाड्या सुटतील. ७ सप्टेंबरला ४०१ आणि ८ सप्टेंबरला सर्वाधिक १ हजार २२९ एसटी कोकणाच्या दिशेने येणार आहेत. याशिवाय २१७ हून अधिक विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत.  कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी करोनाविषयक चाचणीची अट मात्र कायम आहे. प्रवासाच्या ७२ तासांआधीचा 'आरटीपीसीआर' निगेटिव्ह अहवाल किंवा दोन लसमात्रा घेऊन १४ दिवस झाल्याचे प्रमाणपत्र असल्यास कोकणात प्रवेश मिळेल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या दोन्हींपैकी काहीही नसल्यास गणेशभक्तांना चाचणीला सामोरे जावे लागेल. एकच मात्रा घेतलेल्या प्रवाशांनीही आरक्षण केले आहे. त्यांच्यासाठी एसटी स्थानक, आगार आणि रेल्वे स्थानकाबाहेर करोना चाचणी केंद्र उभारण्यात येणार आहे. तेथे चाचणी करण्याची सुविधा असेल. या चाचणीची सर्व माहिती प्रशासनाकडे असेल. कोकणात येताच प्रत्येक रेल्वे, एसटीतून येणाऱ्या प्रवाशाचे नाव, मोबाइल क्रमांकासह सर्व यादी चालक, वाहक आणि रेल्वेडून तेथे उपस्थित संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात येईल. त्यामुळे कोकणात आलेल्या प्रवाशांनी चाचणी केली नसल्यास त्याची माहिती त्वरित उपलब्ध होईल आणि त्या व्यक्तीची गावात जाऊन ग्रामकृती दलाकडून चाचणीही होणार आहे.