सामान्य माणसाचे असामान्य नेतृत्व हरपले - देवेंद्र फडणवीस

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

सामान्य माणसाचे असामान्य नेतृत्व हरपले - देवेंद्र फडणवीस

मुंबई,: ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाने सामान्य माणसाचे असामान्य नेतृत्व हरपले आहे. विधानसभेने एक अतिशय चांगला मार्गदर्शक गमावला आहे. माझे त्यांच्याशी अतिशय जवळचे संबंध होते. त्यामुळे त्यांचे जाणे ही माझी वैयक्तिक हानी आहे, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शोकभावना व्यक्त केल्या.  ते पुढे म्हणाले की, त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात सामान्य माणसासाठी लढाई केली. गरीब, शेतकरी, शेतमजुरांसाठी संघर्ष केला. दुष्काळी भागासाठी कायम संघर्ष केला. ज्यांची भाषणे ऐकून आम्हाला महाराष्ट्र समजला ते गणपतराव देशमुख होते.
इतकी वर्षे राज्य विधानसभेत काम करताना त्यांनी कधीही आपल्या विचारांशी प्रतारणा केली नाही. कधी कोणती तडजोड केली नाही. गणपतराव देशमुख यांच्या भाषणांचा एक वेगळा प्रभाव असायचा. संपूर्ण सभागृह त्यांचे भाषण तन्मयतेने ऐकायचे. ते भाषण म्हणजे एक शिकवण असायची. त्यांनी संघर्ष केलेल्या दुष्काळी भागात आम्ही पाणी पोहोचविले तेव्हा आम्हाला आशीर्वाद देताना त्यांनी मागे-पुढे पाहिले नाही. त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केले. दुसरे गणपतराव देशमुख आता होणे नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे आप्तस्वकीय आणि असंख्य चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे, असेही फडणवीस म्हणाले.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न जेव्हा जेव्हा विधिमंडळात चर्चेला गेला तेव्हा पहिला आवाज गणपतराव देशमुखांचा होता. महाराष्ट्राच्या स्थापनेला ज्या पिढीने समाजवादी राज्याचं स्वप्न पाहिलं त्या स्वप्न युगाची ही अखेर आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली!