सौम्य मुख्यमंत्र्यांना जागा नाहि

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

सौम्य मुख्यमंत्र्यांना जागा नाहि

जसजसे राजकारण अधिकाधिक स्पर्धेचे होत चालले आहे, तसे राजकारणाचे रंगही बदलत चालले आहेत. पूर्वी म्हणजे वीस पंचवीस वर्षांपूर्वी सौम्य नेता अशी प्रतिमा असलेल्या नेत्यांचा बोलबाला असे. आक्रमक भाषाही जर राजकारणात वापरली तर जनमानसातून त्या नेत्याचे स्थान उतरत असे. इतकेच नव्हे तर पक्षातील वरिष्ठही अशा नेत्याला तंबी देत किंवा सरळ पदावरून काढून टाकत. पण आज नेमके उलट चालले आहे. परिस्थितीच इतकी स्पर्धात्मक आहे की प्रतिपक्षाचा प्रत्येक हल्ला जोरदार परतवून लावणारा आणि प्रतिपक्षाच्या प्रत्येक चाली तितक्याच जोरदारपणे हाणून पाडणारा नेताच आता पक्षाला हवा असतो. याला कोणताही पक्ष अपवाद नाहि. परंतु भाजप याहीबाबतीत जास्तच आघाडीवर आहे. गुजरातचे मुख्यमंत्रि विजय रूपानी यांना अचानक राजिनामा द्यावा लागला आहे. त्यांनी शनिवारी राजिनामा दिला आणि देशभरात एकच चर्चा सुरू झाली आहे. रूपानी यांच्या राजिनाम्याने खुद्द गुजरात भाजपमध्येही अनेकांना धक्का बसला. पण ज्यांना अंदर की बात माहित होती त्यांना याचे मुळीच आश्चर्य वाटले नाहि. कारण रूपानी यांची प्रतिमा सौम्य अशी आहे. ते मृदु स्वभावाचे आहेत आणि याचाच फटका त्यांना बसला आहे. त्यांच्या मृदु स्वभावामुळे ते एक कमजोर मुख्यमंत्रि आहेत, अशी त्यांची प्रतिमा झाल्याचे पक्षश्रेष्ठींना वाटले आणि त्यांना राजिनामा देण्याचा आदेश आला. गुजरातेत पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत आहेत. गुजरात हे तर साक्षात पंतप्रधान मोदींचे राज्य. त्यामुळे तेथील प्रत्येक घटनेला कमालीचे महत्व असतेच. गुजरात जर रूपानी यांच्या सौम्य प्रतिमेमुळे गमवावे लागले तर मोदींच्या प्रतिमेस खूप मोठा तडा गेला जाईल. रूपानी यांचा सौम्य प्रतिमा हाच एकमेव दोष नाहि. त्यांनी कोविड काळात गुजरातचे प्रशासन नीट चालवले नाहि आणि कोविड प्रश्नही अत्यंत ढिसाळपणे हाताळला, हेही एक कारण तज्ञ सांगतात. अर्थात हेच एक कारण असते तर दिल्ली, केरळ, पंजाब आणि महाराष्ट्रासह अनेक मुख्यमंत्र्यांनी राजिनामा देऊन पाच वर्षे तरी घरी बसले पाहिजे. पण भाजपला सध्या तरी रूपानी यांना पदावर ठेवणे परवडणारे नाहि. गुजरात मिळवायचे तर तेथे एक मजबूत आणि काँग्रेसचे सारे डावपेच हाणून पाडणारा हुषार मुख्यमंत्रिच हवा, हे भाजपला वाटत असल्यास त्यात काही गैर नाहि. गुजरातेत काँग्रेस आणि भाजपच्या विधानसभेतील जागांमध्ये फारसे अंतर नाहि. काँग्रेस तेथे ७७ जागांवर आहे तर भाजपला ९९ जागा आहेत. पण काँग्रेसपेक्षा भाजपला चिंता आहे ती आम आदमी पक्षाची. आप पक्षाने गुजरातेत चांगला जोर दाखवायला सुरूवात केली आहे. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना कंटाळलेले लोक आपचा पर्याय स्विकारण्याची शक्यता आहे. यामुळेच भाजपने मुख्यमंत्रि बदलून लोकांना एक चांगला पर्याय देण्याची खेळी खेळली आहे. एक तर नव्या मुख्यमंत्र्याला एक वर्षच झाले असल्याने आणि त्याच्या खर्या खोट्य़ा प्रकरणांची चर्चा जाहिर झालेलीच नसते. त्यामुळे विरोधकांनाही नव्या उमेदवारावर हल्ला करण्याला काही दारूगोळाच मिळत नाहि. हा एक फायदा आहे. तसेच प्रस्थापित विरोधी लाटेचाही तोटा मुख्यमंत्रिच बदलल्याने कमी प्रमाणात होतो. आपल्याकडे व्यक्तिसापेक्ष मते असतात. पक्षाने कसा कारभार केला किंवा कोणत्या चुका केल्या आणि कोणती चांगली कामे केली, यावर फार क्वचित विचार केला जातो. मुख्यमंत्रि किंवा पंतप्रधानाने कसा कारभार केला, याभोवतीच राजकारण फिरत असते. यालाच व्यक्तिकेंद्री राजकारण म्हटले जाते. त्यामुळे आता भाजपच्या पाच वर्षांतील कारभाराची चिकित्सा होणार नाहि. भाजपला हा फायदा होणार आहे. भाजपने अनेक राज्यांत अशाच खेळ्या केल्या आहेत. हिमाचल प्रदेशात तर भाजपला दोन मुख्यमंत्रि बदलावे लागले. तिरथ सिंह रावत यांना रूपानी यांच्याप्रमाणेच सौम्य प्रतिमा असल्याने बदलले तर दुसर्या रावतांच्या बाबतीत घटनात्मक पेचप्रसंग कारण ठरला. त्यामुळे आता पुष्कर धामी यांना मुख्यमंत्रिपद दिले आहे. कर्नाटकातही भाजपने एस आर बोम्मई यांच्या मुलाला मुख्यमंत्रिपद देऊन प्रस्थापित विरोधी लाटेची धग कमी केली आहे. गुजरातेत आता मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच तीव्र झाली असली तरीही सर्वात अग्रक्रम मनसुख मंडाविया आणि नितीन पटेल यांच्यापैकी कुणाला तरी दिला जाण्याची शक्यता आहे. भाजप कितीही आपण शिस्तबद्ध पक्ष असल्याचे सांगत असला तरीही काँग्रेसपेक्षा तो जराही वेगळा नाहि. अंतर्गत राजकारण आणि कुरबुरी त्याही पक्षात चालत असतातच. काँग्रेसमध्ये त्या उघड चालतात तर भाजपमध्ये लपूनछपून, इतकाच फरक आहे. नितीन पटेल आणि रूपानी यांच्यात आडवा विस्तव जात नव्हता. तर नव्याने गुजरातचे भाजपचे अध्यक्ष झालेले सी आर पाटील यांच्या नेमणुकीपासूनच रूपानी यांचा त्यांच्याशी संघर्ष होता. या कारणांमुळे भाजपने वादाचे मूळ कारणच उपटून काढले आहे. मात्र नव्या मुख्यमंत्र्याला जसे अल्प कारकिर्दीचे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. त्याला फारसे काही करायला मिळणारच नाहि. त्यात निवडणूक जाहिर झाली की आचारसंहिताच लागू होते. त्यामुळे गुजरातेत जो कुणी नवा मुख्यमंत्रि होईल त्याला फक्त आठ महिने मिळतील. त्यात तो काय करू शकेल, हे कुणीच सांगू शकणार नाहि. त्यात कोविडचा प्रश्न नीट हाताळला नाहि, हा भाजप सरकारवरील डाग त्याला पुसून काढावा लागेल. पण हे करण्यासाठी त्याच्याकडे वेळच कुठे आहे. गुजरातेतही इतर देशाप्रमाणेच अनेकांच्या नोकर्या जाऊन लोक बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे सरकारविरोधात प्रचंड असंतोष आहे. त्याची धग कमी करण्यासाठीही रूपानी यांना हटवले आहे. पण आता नव्या मुख्यमंत्र्याला सरकारबद्दल विश्वास निर्माण करावा लागणार आहे. गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्याला काटेरी मुकूट घालूनच सिंहासनावर बसावे लागणार आहे. खुद्द पंतप्रधानांची प्रतिष्ठा राखण्याची फार मोठी जबाबदारी त्याला पेलावी लागणार आहे.