निर्नायकी काँग्रेसचा विरोधकांना फटका

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

निर्नायकी काँग्रेसचा विरोधकांना फटका

काँग्रेसची अवस्था निर्नायकी झाली आहे आणि याचे कारण आहे केंद्रिय पातळीवर काँग्रेसला जोरदार आणि खंबीर असा नेता नाहि. सोनिया गांधी अध्यक्ष आहेत पण त्या हंगामी आहेत आणि राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडल्यापासून काँग्रेसला ठाम असा नेताच नाहि. काँग्रेसची अवस्था म्हणूनच निर्नायकी झाली आहे आणि याचा अपरिहार्य फटका काँग्रेसमध्ये बंड उफाळण्यात बसला आहे. काँग्रेसच्या ताब्यात फक्त  तीन राज्ये आहेत जेथे त्यांचे मुख्यमंत्रि आहेत. पूर्वी हिमाचलपासून दक्षिणेपर्यंत काँग्रेसचाच बोलबाला असायचा. बाकी दोन म्हणजे झारखंड आणि महाराष्ट्रात केवळ काँग्रेस सत्तेत आहे, इतकेच. त्यातही महाराष्ट्रात काँग्रेसला शिवसेना आणि राष्ट्रवादी जराही भाव देत नाहित. ज्या पंजाब, छत्तीसगढ आणि राजस्थान या राज्यांत काँग्रेस सत्तेत आहे, त्या राज्यांना बंडाने ग्रासले आहे. पंजाबात मुख्यमंत्रि अमरिंदर सिंग आणि आता पंजाब काँग्रेसचे अध्यक्षपद देऊन शांत करण्यात आलेले बंडखोर नवज्योत सिंग सिद्धू यांच्यात आडवा विस्तवही जात नाहि. सिद्धू यांना काँग्रेसचे प्रांताध्यक्ष केल्याने पक्षातील गटबाजी आटोक्यात येईल असे वाटून हायकमांडने सुटकेचा श्वास सोडला होता. त्याचा जराही परिणाम झालेला नाहि. सिद्धू यांचे सल्लागार माली आणि प्यारेलाल गर्ग यांना देशविरोधी वक्तव्यांमुळे पद सोडावे लागले. त्यामुळे सिद्धू खवळले आहेत आणि त्यांनी काँग्रेसलाच थेट इषारा दिला आहे. या गटबाजीचा पंजाबात पुढील वर्षी होणार्या निवडणुकीत काँग्रेसला फटका बसणार, यात आता कुणालाही शंका राहिली नाहि. छत्तीसगढमध्ये जरी सध्या मुख्यमंत्रि भूपेश बघेल आणि आरोग्यमंत्रि टी एस सिंगदेव यांच्यातील वैर शमले असल्यासारखे वाटत असले तरीही बघेल यांना कधीही पद सोडावे लागेल, यात काही शंका नाहि. आणि यापैकी कोणताही नेता पद गेल्यावर काँग्रेससाठी डोकेदुखी ठरणार आहे, ही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तेच राजस्थानच्या बाबतीत आहे. गेल्यावर्षी तर काँग्रेसला सचिन पायलट गटाच्या बंडापायी सरकार हातचे गमावण्याची पाळी आली होती. तशी ती कधीही येऊ शकते. त्यामुळे तेथे काँग्रेस कायम गॅसवर आहे. शिवाय खुद्द केंद्रिय नेतृत्वाच्या विरोधात तेवीस नेत्यांनी दंड थोपटले आहेत. परिणामी अगोदरच पाय खोलात चाललेल्या  काँग्रेसची अवस्था आणखी अवघड होणार आहे. याचे एकमेव कारण म्हणजे केंद्रिय नेतृत्वाची पोकळी हेच आहे. काँग्रेसला केंद्रिय पातळीवर कणखर नेता नाहि. वास्तविक काँग्रेसला फुटींचे वावडे नाहि. अगदी काँग्रेस स्थापन झाल्यापासून काँग्रेसमध्ये मवाळ आणि जहाल असे गट होतेच. त्यातून नेहमीच गट फुटून निघण्याचे प्रकार घडले आहेत. त्यानंतर नेहरूंच्या काळातही गटबाजी होती आणि नेते बाहेर पडलेही आहेत. परंतु एक फरक होता. काँग्रेसमध्ये त्या काळात जी फूट पडत होती, तिला वैचारिक आधार होता. वैचारिक मतभेदांमुळे फूट पडत असे. लोकसभेला किंवा विधानसभेला तिकिट दिले नाहि, म्हणून इतक्या क्षुद्र कारणासाठी कुणी पक्ष सोडून जात नव्हते. तरीही काँग्रेस मजबूत होती कारण केंद्रिय नेते सक्षम आणि कणखर होते. इंदिरा गांधी असोत की राजीव गांधी यांच्या काळात काँग्रेसला एखादा नेता बाहेर गेला तरीही फारसा फरक पडत नसे. अर्जुन सिंग, नटवर सिंग, जगजीवनराम, मोरारजी देसाई असे कितीतरी दिग्गज काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी पक्ष काढले किंवा सरळ विरोधी पक्षांत सामिल झाले. काहींनी तर थेट विरोधी विचारांच्या पक्षांशी युती केली. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. तरीही काँग्रेस मजबूतच होती. पण आता काँग्रेसला निर्नायकी अवस्था प्राप्त झाली असल्याने काँग्रेस कमकुवत झाली आहे. राहुल गांधी यांना राजकारणात रहायचे आहे की नाहि आणि त्यांना अध्यक्षपद सांभाळायचे आहे की नाहि, याचा काहीच अंदाज कुणालाच येत नाहि. काँग्रेसमध्ये बंडाचे प्रकार वाढले असून नेता खंबीर नसल्याने हायकमांडला विचारायचे नाहि आणि जुमानायचे तर नाहिच नाहि, ही प्रवृत्ती बळावली आहे. पूर्वी कोणत्याही नेत्याची केंद्रिय नेत्याच्या विरोधात जाण्याची टाप नसायची. पण आज केंद्रिय नेते कमकुवत झाल्याने त्यांचा धाक संपला आहे. शिवाय पक्षाला जिंकून देण्याची त्यांची क्षमताही संपली आहे. काँग्रेसचे हे निर्नायकी असणे भाजपच्या पथ्यावर तर पडले आहेच. परंतु सर्वात जास्त नुकसान विरोधी पक्षांचे झाले आहे. काँग्रेसच्या सहभागाशिवाय भाजप विरोधात मजबूत आघाडी उभी राहू शकत नाहि, हे तर सार्यांनीच मान्य केले आहे. पण काँग्रेसलाच हे मान्य आहे की नाहि, याची शंका वाटते. भाजपविरोधात विरोधी पक्षांना एकत्र आणण्यात काँग्रेसच गंभीर नाहि, असे दिसते. नुकतीच सोनिया गांधी यांनी सर्व विरोधी पक्षांची आभासी बैठक घेऊन मोदीविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले. परंतु त्यांना अगोदर आपले स्वतःचे घर नीट करावे लागेल. काँग्रेस स्वतःच बंडखोरी आणि विद्रोहाने पोखरलेली आहे. ती काय विरोधी पक्षांना एकत्र आणणार, असा प्रश्न विरोधकांना पडला असल्यास नवल नाहि. काँग्रेसची अवस्था नायकाशिवाय पक्ष अशी झाली असल्याने पक्षाच्या वरिष्ठांना बंडाच्या हाका ऐकू येत नाहित. आल्या तरी त्यांना शमवण्याचे सामर्थ्य त्यांच्यात नाहि. असा पक्ष मोदी शहा  यांच्यासारख्या नेत्यांच्या विरोधात स्वतःही लढा देऊ शकणार नाहि आणि इतर विरोधकांना एकत्र आणू शकणार नाहि. काँग्रेसने आपली जबाबदारी ओळखून केंद्रात मजबूत नेता अगोदर शोधला पाहिजे. आणि त्याही अगोदर गांधी घराण्याच्या बाहेर जाऊन नेत्याचा शोध घेतला पाहिजे. अन्यथा विरोधकांना काँग्रेसमुळे फटका बसणार आहे.