राज ठाकरेंचा हल्ला

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

राज ठाकरेंचा हल्ला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दहिहंडीवर राज्य सरकारने बंदी घातल्याच्या निषेधार्थ एक पत्रकार परिषद घेऊन जोरदार हल्ला चढवला. राज्यात बाकी सर्व तर चालू आहे, मग दहिहंडीवरच बंदी का, असा त्यांचा रास्त सवाल आहे. राज ठाकरे हे उगीचच उठून अडाण्यासारखी वक्तव्ये देणारे नेते नाहित. त्यांच्या प्रत्येक वक्तव्यात एक जोरदार आणि बिनतोड मुद्दा असतो. आणि एक खेळीही असते. मुळात राज ठाकरे यांनी दहिहंडीच्या निमित्ताने शिवसेनेला उघडे पाडण्याची आपली खेळी यशस्वीपणे खेळली आहे, इतकेच या निमित्ताने सांगता येईल. आज शिवसेना विरोधात असती आणि भाजप सरकारने किंवा समजा अगदी काँग्रेस सरकारनेही दहिहंडीला बंदी घातली असती तर आज जो युक्तिवाद राज ठाकरे करत आहेत, तोच युक्तिवाद शिवसेनेने केला असता. स्वतः उद्धव ठाकरे यांनीच दहिहंडी आयोजित करण्यास पाठिंबा दिला असता. राजकीय पक्षांची भूमिका त्यांच्या त्या त्या वेळच्या स्थानाप्रमाणे असते. उद्धव ठाकरे आज सत्तेत आहेत म्हणून ते मंदिरे उघडण्यास विरोध करत आहेत. ते विरोधात असते तर मंदिर उघडण्यासाठी तेही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह आंदोलनात सहभागी झाले असते. हा स्थानाचा महिमा आहे. तरीही राज ठाकरे यांच्या म्हणण्यात तथ्य आहे. अर्थात लाटांची भीती आहे. तिसर्या लाटेची भीती राज्य सरकारच्या तज्ञांनी व्यक्त केलेली नाहि तर ती केंद्र सरकारच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे. याबाबतीत मात्र केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे विचित्रपणे एकमत झाले आहे. दोन्ही सरकारांसाठी ते सोयीचे आहे, इतकाच भाग त्यात आहे. लाटांची भीती दाखवून टाळेबंदी जाहिर केली की लोकांना गप्प बसवता येते, लोकांना घरात कोंडून घालता येते आणि सरकारी भलीबुरी कामे बिनबोभाटपणे पार पाडता येतात. नोकरशाहीला तर टाळेबंदी म्हणजे पर्वणीच असते. तिला आपली मनमानी करता येते आणि कार्यालयात कुणीही नसताना येऊन छुपे व्यवहार करता येतात. टाळेबंदीचे लाभ नोकरशहा इतके कुणालाच होत नाहित. त्यामुळे सरकारी अधिकारी तर टाळेबंदी कशी लावता येईल, याची वाटच पहात असतात. राज्यकर्त्यांनाही लोक रस्त्यावर येऊन आंदोलने करू नयेत, म्हणून या टाळेबंदीचा फार उपयोग होतो. आज सामान्य नागरिकांचे अगोदरच हाल सुरू आहेत. पेट्रोल आणि गॅसचे दर भयानक वाढले आहेत आणि महागाईने कंबरडे मोडले आहे. तसे ते नेहमीच मोडलेले असते पण यंदा ते जास्तच मोडले आहे. या परिस्थितीत केंद्र असो की राज्य सरकारे, लोकांचा असंतोष मोडून काढण्यासाठी टाळेबंदीसारखे शस्त्र नाहि. त्यासाठी कोरोनाच्या लाटांची भीती दाखवणे अपरिहार्य आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या म्हणण्यात तथ्य आहेच. परंतु राज ठाकरे यांनी सरकारच्या विरोधात जाऊन दहिहंडी आयोजित करून जे आंदोलन सुरू केले आहे, त्याचा एक फार मोठा राजकीय लाभ मनसेला होणार आहे. मनसे या निमित्ताने राजकीय मुख्य प्रवाहात येऊ पहात आहे. हा तिला मोठाच गेट वे मिळाला आहे. या निमित्ताने राज ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या घराघरात पोहचू शकतील. शिवसेनेला खरा धोका हा भाजपचा नाहि तर मनसेचा आहे. कारण शिवसेनेची मदार ज्या मराठी मतांवर आहे, त्यातील वाटा मनसेच उचलून नेऊ शकते. या निमित्ताने मनसेला शिवसेनेला शह देण्याचे एक प्रभावी साधन मिळाले आहे. या दृष्टिने राज ठाकरे यांनी उत्कृष्ट खेळी केली आहे. कोणताही धार्मिक मुद्दा आला की आपल्याकडे सत्ताधारी पक्ष हे नेहमीच बॅकफूटवर जातात. कारण धार्मिक ध्रुविकरणामुळे मतांची बेगमी फार मोठ्या प्रमाणावर करता येते. शिवसेनेने असेच करून राजकीय मुख्य प्रवाहात येण्याचे काम केले. अगोदर मराठी मुद्दा घेतला, त्याने फारसे काही होत नाहि, हे पाहिल्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा घेतला. त्यानिमित्ताने राष्ट्रीय पातळीवर जाता येईल, हाही हिशोब होता. पण राष्ट्रीय पातळीवर भाजपच्या मदतीशिवाय जाता येणार नाहि, असा विचार करून त्यांनी भाजपशी युती केली. राज ठाकरे यांची नेमकी तीच पावले पडत आहेत, असे लक्षात येईल. राज ठाकरे यांचीही भाजपशी युती करण्याची तयारी झाली आहे, अशी चर्चा आहे. भाजप नेते राज ठाकरे यांनी परप्रांतियांबद्दलची भूमिका अडचणीची आहे, असे सांगत आहेत. पण ती तर भूमिका शिवसेनेचीही होती. मग शिवसेनेबाबत भाजपला २५ वर्षे युती करण्यात अडचण आली नाहि तर आता राज ठाकरे यांच्याबाबतीतही येणारी नाहिच. राज ठाकरे यांनी शिवसेनेला अडचणीत आणले आहे. आणि शिवसेनेला किमान मुंबई आणि पुण्यात आगामी निवडणुकीत जर मोठा फटका बसणार असेल तर तो मनसेमुळेच. मनसे हीच शिवसेनेची मते खाऊ शकते. त्यासाठी राज ठाकरेंचा दहिहंडीला पाठिंबा ही सुरूवात आहे. राज यांच्या आजच्या भूमिकेवरून ते भाजपच्या जास्त जवळ येत चालले आहेत, याचे संकेत मिळत आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला मनसे मदत करेल आणि शिवसेनेला अडचणीत आणण्याची खेळी खेळेल, हे दिसते आहे. राज ठाकरे यांनी त्या दिशेने सुरूवात केली आहे.