रक्तरंजित इतिहास पुन्हा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

रक्तरंजित इतिहास पुन्हा

स्त्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात पुन्हा रक्तरंजित संघर्ष सुरू झाला आहे. हा इतिहासाचा कितवा अध्याय हे सांगता येणार नाहि. परंतु असे दिसते की या भूमीची रक्ताची तहान भागतच नाहि. तिला सातत्याने ठराविक काळाने रक्ताचा नैवेद्य लागतोच. इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्षात कोणतीही बाजू कमी हिसाचारी किंवा आदर्शवादी नाहि. इस्त्रायली लष्करी सैन्य जितके क्रूर आहे तितकेच किंबहुना त्यापेक्षा जास्त क्रूर हमास ही दहशतवादी संघटना आहे. भारतात जेव्हा काँग्रेसचे राज्य होते तेव्हा काँग्रेसला अल्पसंख्यांक मतांची काळजी सतत असायची. म्हणून आंतरराष्ट्रीय प्रश्नावरही भारताची भूमिका येथील अल्पसंख्यांक नाराज होऊ नयेत, अशीच असे. म्हणून पॅलेस्तिनींचा नेता यासिर अराफत भारतात आला तेव्हा तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्वतंत्र पॅलेस्टाईन देशाला मान्यता देऊन टाकली होती. वास्तविक पंडित नेहरूंनी आणलेल्या अलिप्ततावादाच्या धोरणाला त्यांच्या कन्येनेच प्रथम तिलांजली दिली. याचा अर्थ इस्त्रायल खूप साधू आहे,  असा मुळीच नाहि. पॅलेस्तिनींना त्यांच्य हक्काच्या भूमीतून हद्दपार करण्यासाठी इस्त्रायल कोणत्याही थराला जाऊ शकतो. हे त्याने पूर्वीही दाखवले आहे आणि आताही दाखवत आहे. पॅलेस्तिनींचा हक्क मान्य करण्यात इस्त्रायलला अडचणी आहेत. म्हणून इस्त्रायली सैनिक क्रूरपणे पॅलेस्तिनींवर अत्याचार करत असतात. पण त्यांच्या अत्याचारांना हमासच्या दहशतवाद्यांकडून तितक्याच क्रूर अत्याचारांनी उत्तर दिले जाते. मध्यंतरी दोन्ही बाजूंनी शस्त्रसंधी केली होती आणि त्यामुळे या भागात शांतता नांदत होती. परंतु सध्याच्या हिंसाचारामुळे प्रचंड परिश्रम करून मिळवलेल्या शांतता गमावून बसणार आहेत. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात सार्या जगातच अस्वस्थता होती. तेव्हा इस्त्रायल आणि पॅलेस्तिनी यांच्यातील संघर्षही शिगेला पोहचला होता. कित्येक विमान अपहरणे झाली, कित्येक बाँबहल्ले झाले, याची गणनाच करता येणार नाहि. पण इस्त्रायली गुप्तहेर संघटना मोसाद ही एक जबरदस्त संघटना आहे. तिने पॅलस्तिनींना काबूत करण्यात मोठीच भूमिका बजावली होती. तो एक रक्तरंजित पण रोमांचक इतिहास आहे. त्यात जायला नको. पण एकीकडे कोविड महामारीशी लढत असताना हा संघर्षाचा मुद्दा उपस्थित व्हायला नको होता. कारण जग अगोदरच एका संकटाळी लढत आहे.त्यात हे नवीन संकट जगाला नसता घोर लावणारे आहे. जेरूसलेम ही पवित्र भूमी तिन्ही धर्मांसाठी म्हणजे ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिमांसाठी आहे. ज्यूंसाठी हे पवित्र स्थळ आहे कारण ही भूमी त्यांच्यासाठी पूर्वजांची आणि अध्यात्मिक भूमी आहे. दहाव्या शतकापासून ते येथे आहेत. ख्रिश्चनांच्या दृष्टिने हे शहर अत्यंत महत्वाचे आहे कारण येशू ख्रिस्ताचे बालपण येथेच गेले आणि अनेक वर्षे तो येथेच होता. इस्लामी परंपरेतही हे शहर अत्यंत पवित्र समजले जाते कारण प्रेषित पैगंबर यांनी या शहराला भेट दिली होती. यामुळे तिन्ही धर्मांसाठी महत्वाच्या असलेल्या या शहरासाठी झगडे होणार, हे तर झालेच. परंतु पॅलेस्टाईनच्या भूमीवर इस्त्रायलने कब्जा केला आहे, असे पॅलेस्तिनी मानतात. जर्मनीने छळ सुरू केल्यावर ज्यू पुन्हा याच भूमीत आले आणि त्यांनी स्वतंत्र राष्ट्र स्थापन केले. तेव्हापासून ही भूमी कायम आंतरराष्ट्रीय रक्तलांच्छित संघर्षाची रणभूमी बनली आहे. सध्याही जो संघर्ष सुरू आहे, तो याच पर्वाचा पुढील अध्याय आहे. इस्त्रायलला अमेरिकेचा कायमच पाठिंबा राहिला आहे आणि त्याला बरीच कारणे आहेत. कारण ज्यू ही जमात अत्यंत हुषार आणि धनाढ्य व्यापारी जमात आहे. अमेरिकेत त्यांचे प्रचंड व्यवसाय आहेत. त्यामुळे अमेरिकेला त्यांना पाठिंबा द्यावा लागतो. अर्थात हेच एक कारण आहे, असे नव्हे. अमेरिका आणि इस्त्रायलची मैत्री फार जुनी आहे. इस्त्रायलच्या अवतीभोवती सारी शत्रु राष्ट्रे असताना हे एक लहानसे राष्ट्र सर्वांना तोंड देऊन उभे आहे, असे नव्हे तर कमालीचे प्रगत आहे. परंतु सर्वात वाईट परिस्थिती आज पॅलेस्तिनींची आहे. ते आपल्याच भूमीत बेघर आहेत. एकीकडे कोविडचे संकट असताना त्यांना सुरक्षित  आसराही नाहि. त्यांना कायरोला जाण्याशिवाय पर्याय नाहि. अनेक देश आज कोविडशी लढत असताना आणि प्रचंड मनुष्यहानी होत असताना, इस्त्रायल, वेस्ट बँक आणि गाझा यात वाढता हिंसाचार ही निश्चितच चिंतेची गोष्ट आहे. आतापर्यंत एकशे एकोणीस लोक यात ठार झाले आहेत.  इस्त्रायली हल्ल्यांना हमासने उत्तर देण्यास सुरूवात केली असून तेल अव्हीव्ह मध्ये अनेक इमारतींवर रॉकेट्स डागली जात आहेत. हिंसा भडकणार आहे आणि इस्त्रायली सैनिकही पूर्ण युद्ध करण्यास तयार होत आहे. तसे झाले तर पुन्हा हा परिसर युद्धभूमी बनेल. कोविड आणि युद्ध या चक्रात अडकलेल्या नागरिकांचे हाल कुत्राही खाणार नाहि. यापूर्वी जसे पॅलेस्तिनींचे सामूहिक स्थलांतर घडवून आणले गेले, तसेच आताही होऊ शकते आणि इस्त्रायल एक नवीन राज्य स्थापन करू शकतो. जेरूसलेमला अमेरिकेने इस्त्रायलची राजधानी म्हणून मान्यता दिल्याने हा संघर्ष आणखीच चिघळला आहे. पॅलेस्तिनींच्या प्रदेशात इस्त्रायलींच्या वसाहती वाढल्या आहेत आणि यामुळेच युद्धभूमी तयार होण्याची चिन्हे आहेत. परंतु यात अंतिम नुकसान पॅलेस्तिनींचेच आहे. त्यांना जगात स्वतःचा असा देशच  उरणार नाहि. कश्मिरी पंडितांचे हाल जे झाले, तेच हाल कदाचित पॅलेस्तिनींचे होऊ शकतील. मध्यपूर्वेत जे होत आहे, ते निश्चितच चांगले लक्षण नाहि.