नरसिंहराव यांचे विसरलेले महत्व

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

नरसिंहराव यांचे विसरलेले महत्व

काँग्रेसचाच परंतु गांधी घराण्याचा सदस्य पंतप्रधान नसला तर काँग्रेसजन अशा नेत्याला कितीही उपयुक्त आणि देशासाठी परिवर्तन घ़डवणारा असला तरीही काँग्रेसजन त्याला उपेक्षेने कसे मारून टाकतात, याचे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव हे उत्तम उदाहरण आहे. काँग्रेसी संस्कृतीत गांधी घराण्याला पूजण्याची परंपरा आहे. ती असण्यात काही गैर नाहि. आपले सारेच पक्ष कुणा नं कुणा व्यक्तिपूजेवरच आधारित असतात. अगदी भाजपही त्याला अपवाद नाहि. बाकी सारे प्रादेशिक पक्ष तर एकेका परिवाराची जहागीरच आहेत. त्यामुळे प्रतिस्पर्धी पक्ष जर व्यक्तिपूजा करण्यात गुंतला असेल तर त्यास आक्षेप घेण्यासाठी कुणालाच नैतिक अधिकार उरलेला नाहि. परंतु काँग्रेसचे नरसिंहराव हे असे पंतप्रधान होते की ज्यांना अपवादात्मक परिस्थितीत पद स्विकारावे लागले आणि त्यांनी देशाची दारे उदारीकरणास खुली केली. त्यामुळे नवमध्यमवर्ग उदयास आला आणि आर्थिक विकासाची फळे संपूर्ण देशाला मिळू लागली. त्यामुळे गरिबी कमी होत गेली नसली तरीही गरिबांचेही उत्पन्न चांगले वाढले होते. राव यांनी देशाची दारे खुल्या व्यवस्थेला उघडी केल्यामुळे भारताच्या विशाल बाजारपेठेकडे जगाचा ओघ वळला. हा तोच काळ होता ज्यामुळे भारतीय बाजारपेठेची इतकी मोहिनी आंतरराष्ट्रीय कंपन्यांना पडली होती की सुस्मिता सेन आणि ऐश्वर्या राय यांच्यासारख्या तरूणी विश्वसुंदरी होऊन गेल्या. भारतीय बाजारपेठेची भुरळ आंतरराष्ट्रीय प्रसाधन कंपन्यांना पडली नसती तर या दोघी विश्वसुंदरीचा किताब मिळवू शकल्या असत्या की नाहि, याची शंकाच आहे. याच काळात अमेरिकेत आणि युरोपात नवमध्यमवर्गाची मुले जाऊन स्थायिक होऊ लागली आणि संगणकाला कमालीचे महत्व आले. यथावकाश ते ओसरले आणि याच काळात अभियांत्रिकी शाखेला सुगीचे दिवस आले. ते इतके की जवळपास सार्या काँग्रेसी नेत्यांना खासगी महाविद्यालये काढून गबर होण्याची वाट सापडली. तसा तर हा मार्ग काँग्रेसी नेत्यांना दिवंगत मुख्यमंत्रि वसंतदादा पाटील यांनी फार पूर्वीच दाखवला होता. परंतु राव यांच्या काळात ही महाविद्यालये भूछत्रांसारखी वाढली. परंतु राव यांना काँग्रेसने अत्यंत उपेक्षेने वागवले. कारण सोनिया गांधी या राजकारणात येण्यास तेव्हा तयार नव्हत्या. त्यामुळे राव यांना पंतप्रधानपद काँग्रेसला द्यावे लागले होते. राव त्यांचे सरकार अल्पमतात असूनही कुशलतेने चालवत होते परंतु त्याचवेळी काँग्रेस पक्षातूनच त्यांच्या पायाखाली सुरूंग पेरण्याचे काम इमानेइतबारे सुरू होते. काँग्रेसने राव यांच्याइतका कोणत्याही नेत्याचा द्वेष केला नसेल. आज माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आर्थिक सुधारणांचे श्रेय दिले जाते. परंतु त्यात त्यांचा वाटा फारच कमी होता. सारे श्रेय राव यांचे होते. परंतु ते सोनिया विरोधी गटात असल्याने त्यांना श्रेय दिले जात नाहि. अर्थात हा काँग्रेसचा पक्षांतर्गत मामला असल्याने त्याबद्दल मत व्यक्त करण्याचे काहीच कारण नाहि. परंतु राव यांनी देशात इतके महत्वाचे बदल घडवून आणले तरीही त्यांना राजघाटावर समाधीसाठी जागा मिळू दिली नाहि. बाकी काँग्रेसच्या सार्या दिवंगत पंतप्रधानांची तेथे समाधी आहे. राव यांचे शव हैदराबादला त्यांच्या रहात्या गावी नेऊन तेथे अंत्यसंस्कार करण्यात आले. राव यांच्याइतका हुषार पंतप्रधान काँग्रेसला क्वचितच मिळाला असेल. नरसिंहराव हे भाषाकोविद तर होतेच परंतु चौदा भाषांमध्ये ते विचार करू शकत असत. लाचारी हीच क्षमता मानल्या जाणार्या काँग्रेसमध्ये राव यांची उपेक्षा व्हावी, यात काहीच आश्चर्य नाहि. सार्याच पक्षांमध्ये आता ही जीहुजुरीची लागण इतकी पसरली आहे की डावे पक्ष सोडले तर कोणताही पक्ष अपवाद नाहि. मनमोहन सिंग यांना आर्थिक सुधारणांचे श्रेय दिले जात असले तरीही अर्थमंत्रि म्हणून राव यांची पहिली पसंती मनमोहन नव्हतेच. त्यांना रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आय जी पटेल हे अर्थमंत्रि म्हणून हवे होते. परंतु पटेल यांनी नकार दिल्याने मनमोहन यांचे भाग्य उजळले. तेव्हाच्या बिकट आर्थिक परिस्थितीत तसाच कणखर अर्थमंत्रि हवा होता. मनमोहन सिंग यांना कणखर त्यांचे मित्रही मानणार नाहित. परंतु त्यांच्यात नोकरशहाची एक वरिष्ठांचे हुकूम पाळण्याची ईश्वरदत्त देणगी आहे. त्यामुळे मनमोहन यांनी आपली जबाबदारी पूर्णपणे चांगली निभावली. जेव्हा भारताची आर्थिक स्थिती अत्यंत खराब झाली होती आणि सोने बँक ऑफ लंडनमध्ये तारण ठेवावे लागले होते, तेव्हा राव यांनी उदारीकरणाला देशाची दारे मोकळी करण्याचा निर्णय घेऊन देशात आमूलाग्र बदल घडवला. लगेच भारतातील कार्सची संख्या वाढली तसेच घरांच्या किमती वाढल्या. मोजक्याच लोकांकडे कार असायच्या. ही परिस्थिती बदलून घरोघरी कार दिसू लागल्या. इंजिनियर्सना महत्व आले आणि भारतीय बौद्धिक संपदा आपली बुद्धी अमेरिकन कंपन्यांसाठी सेवा करू लागली. मुलाने किंवा मुलीने इंजिनियर होणे हे आईबापांच्या सर्वोच्च आनंदाचे लक्षण ठरले. नंतर त्याचा फुगाही फुटला आणि तोही खूप लवकर. पण राव यांनीच भारताला चांगले दिवस दाखवले. परंतु काँग्रेसवाले त्यांना श्रेय देत नाहित. गांधी घराण्याच्या बाहेरील पहिला पंतप्रधान(तसे नेहरूंचे निधन झाल्यावर काही काळ गुलझारीलाल नंदा आणि नंतर लालबहादूर शास्त्री काही काळ होते) म्हणून  राव यांची उपेक्षा करण्यात आली. अर्थात राव यांची कारकिर्द निर्दोष होती असे मुळीच नाहि. गृहमंत्रि म्हणून शीखविरोधी दंगलींमध्ये त्यांची भूमिका आजही संशयास्पद मानली जाते. राव यांच्याच काळात बाबरी मशिद पाडली गेली आणि देशाच्या धर्मनिरपेक्ष चौकटीला जो धक्का बसला त्यातून आजही देश सावरू शकला नाहि. राव यांच्यामुळे अल्पसंख्यांक काँग्रेसपासून दूर गेले, अशी भावना काँग्रेसमध्ये आहे. त्यामुळे राव यांची जयंती सोमवारी साजरी होत असताना काँग्रेसच्या एकाही नेत्याने त्यांचा उल्लेखही केला नाहि. मग त्यांना श्रद्धांजली वाहणे तर दूरच राहिले. राव यांनी देशामध्ये परिवर्तन घडवून आणले परंतु काँग्रेसने त्यांना कधीच आदराने वागवले नाहि.