महासंकटाचे सावट

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

महासंकटाचे सावट

महाराष्ट्रावर कोरोनाच्या तिसर्या लाटेचे महासंकट येऊ घातले आहे. राज्याचे मंत्रि राजेंद्र शिंगणे यांनीच हे सांगितले आहे. त्यांना ही नेमकी कुणी माहिती दिली हे माहित होण्याची शक्यता नाहि. कारण महाविकास आघाडीचे नेते सरकार टिकवण्यासाठी मुद्दाम भीतीदायक माहिती पसरवत आहेत, असाही आरोप केला जात आहे. तरीही शिंगणे यांची माहिती खरी असेल तर  मात्र महाराष्ट्रावर महासंकट येऊ घातले आहे. कोविड-१९ ची तिसरी लाट सप्टेंबरमध्ये येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आणि मंत्र्यांनी जी आकडेवारी दिली आहे ती धक्कादायक आहे. एकट्या महाराष्ट्रात तब्बल पन्नास लाख लोकांना लागण होण्याची शक्यता असून त्यापैकी पाच लाख लहान मुले असतील. ही आकडेवारी खरोखरच भयानक आहे आणि प्रत्येक घराघरात रूग्ण असतील. राज्यातील सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष वेगवेगळ्या क्षुल्लक कारणांवरून भांडण करत बसले आहेत. एकीकडे राज्यातील आरोग्य व्यवस्थेची लक्तरे गेल्या दोन कोवि लाटांमध्येच चव्हाट्यावर आली आहेत. आता इतक्या मोठ्या संख्येने रूग्ण दाखल होत असतील तर सरकारी आरोग्य यंत्रणा कितपत पुरी पडणार आहे, हे दिसतेच आहे. पन्नास लाख लोक हळूहळू का होईना पण दाखल झाले तर तेवढे बेड्स तरी आहेत का, हे आधी तपासायला हवे. एक दोन लाख लोकांना कोविडची लागण झाली तर आरोग्य व्यवस्थेची धावपळ उडाली आणि कित्येक लोक केवळ बेडअभावी मरण पावले. आता तर येथे पन्नास लाख रूग्णांचा प्रश्न आहे. त्यातही डेल्टा प्लस व्हेरियंट हा अत्यंत धोकादायक वर्गातील विषाणु असून त्याला कोणत्याही कोविड प्रतिबंधक लसी प्रतिबंध करू शकत नाहित, अशीही माहिती आहे. याचा अर्थ केवळ ईश्वराच्या कृपेवरच यातून कुणी सुटला तर सुटेल. आताच डेल्टा प्लस व्हेरियंट हा तब्बल  १७४ जिल्ह्यांमध्ये पसरला आहे. आणि त्याची संसर्ग करण्याची क्षमता अफाट असल्याने भारतासारख्या एकशे तीस कोटी लोकसंख्येच्या देशात किती संहार होईल, याची कल्पना करणेही शक्य नाहि. महाराष्ट्रालाच सर्वाधिक धोका का आहे, याचे स्पष्टीकरण केंद्रिय आरोग्य सचिव लव्ह अग्रवाल यांनी दिले आहे. महाराष्ट्रात रूग्णांची संख्या आजही सर्वाधिक आहे आणि जेव्हा असे रूग्ण संख्येने जास्त असतात तेव्हा विषाणुच्या उत्परिवर्तनाला(म्युटेशन) संधीही अधिक असते. त्यामुळे महाराष्ट्रावर सर्वाधिक विपरित परिणाम होणार आहे. याचा अर्थ असा की महाराष्ट्र हा सर्वाधिक कमकुवत घटक म्हणून समोर आला आहे. देशात एकूणच साक्षरतेचे प्रमाण कमी आहे आणि महाराष्ट्रही त्याला अपवाद नाहि. त्यामुळे मास्क वापरणे, सॅनिटायझरने हात धुणे आणि शारिरिक अंतर राखणे याबाबतीत लोकांना काहीच गांभिर्य नाहि. कोविडच्या तिसर्या लाटेपेक्षाही लोकांचे कोविडला न जुमानण्याचे वर्तन अधिक चिंताजनक आहे. महाराष्ट्रातील कोरोना अजूनही संपलेला तर नाहिच, परंतु रायगड, रत्नागिरी, पुणे वगैरे जिल्ह्यांमध्ये अजूनही कोविड पॉझिटिव्हिटी दर हा पाच टक्क्यांपेक्षा अधिक आहे. ही जास्त चिंतेची गोष्ट आहे. राज्यात का कोरोना आटोक्यात येत नाहि, याचे उत्तर लोकांच्या बेशिस्त वर्तनात तर आहेच, परंतु राजकीय पक्षांच्या बेजबाबदार वर्तनातही आहे. राजकीय पक्ष मग ते काँग्रेस असो की शिवसेना असो की राष्ट्रवादी, वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करत आहेत आणि गर्दी जमवत आहेत. त्यातून किती प्रमाणात कोरोना पसरला असेल, याची काहीच अद्ययावत माहिती सरकारकडे नाहि. राजकीय पक्षांच्या मुजोरीपुढे आरोग्य यंत्रणाही हतबल आहे. हेच केंद्र सरकारने पश्चिम बंगालमध्ये केले आणि तेथेही कोरोना रूग्णांची  संख्या वाढवली. आता महाराष्ट्राला तर आणखी एक धोका आहे आणि तो म्हणजे डेल्टा प्लस व्हेरियंटचा. राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे सर्वाधिक रूग्ण आहेत आणि यात एका ऐंशी वर्षाच्या महिलेचा बळीही गेला आहे. हेच धोक्याचे चिन्ह आहे. एप्रिलमध्येच महाराष्ट्रात डेल्टा प्लसचा रूग्ण सापडला होता. याचा अर्थ काही काळापासून हा विषाणु राज्यात सक्रिय आहे. राज्यात अनलॉक प्रक्रिया जशी खुली होत गेली तसे लोकांनी पुन्हा बेशिस्त वर्तन सुरू केले. राजकीय पक्ष त्यांना उपदेशही करू शकत नाहित कारण राजकीय पक्षांनीही तेच केले आहे. त्यामुळे कोण कुणाला शिस्तबद्ध वर्तनाचे धडे देणार, हा प्रश्न आहे. पन्नास लाख रूग्ण जेव्हा राज्यात दाखल होतील तेव्हा आरोग्य यंत्रणेचे तर बारा वाजलेले असतील आणि ऑक्सिजन बेड्स, ऑक्सिजन सिलिंडर आणि रेमडिसीवीर या औषधांसाठी अक्षरशः लोकांमध्ये युद्धे होतील. यात राजकीय पक्षही मागे रहाणार नाहित. एवढे भीषण संकट आल्यावर परदेशात पळून जाण्याची संधीही राजकीय नेत्यांना नाहि. कारण फक्त नऊ देशांत भारतीयांना प्रवास करण्याची परवानगी आहे. आणि जेव्हा राज्य कोविडच्या तिसर्या लाटेची शिकार होईल, तेव्हा ते देशही भारतीयांना प्रवेशबंदी करतील, यात काही शंका नाहि. असे होईलच, असे नाहि पण ही शक्यता आहे आणि ती भयानक आहे. याचा अर्थ देशातील प्रत्येक नागरिक आज मृत्युच्या सावटात आहे. आणि डेल्टा प्लसचा संसर्ग अत्यंत जलद होत असल्याने देशातील लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात मृत्युच्या हद्दीत आहे. यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे लोकांनी बेजबाबदार वर्तन सोडून कोविड प्रतिबंधक वर्तनाची त्रिसूर्त्रीचे पालन निष्ठेने करणे हाच आहे.