महाराष्ट्र केसरी अप्पालाल शेख यांचे दीर्घ आजाराने निधन

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

महाराष्ट्र केसरी अप्पालाल शेख यांचे दीर्घ आजाराने निधन

सोलापूर, : प्रसिद्ध पैलवान महाराष्ट्र केसरी अप्पालाल शेख यांचे गुरुवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात तीन मुलं आणि मुलगी असा परिवार आहे.जवळपास वर्षभरापूर्वी त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या.तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.सोलापुरातील एका सहकारी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती कुटुंबियांनी दिली.त्यांच्या निधनाने कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.१९९१ मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अप्पालाल यांना सुवर्ण पदक, तर ९२ साली महाराष्ट्र केसरीचा किताब त्यांनी मिळवला होता.

आप्पालाल यांची कारकीर्द
पैलवान आप्पालाल शेख हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावातील रहिवासी होते.त्यांचे बंधू इस्माईल शेख हे देखील पैलवान होते.इस्माईल यांनी कुस्तीच्या सरावासाठी कोल्हापूर गाठलं.त्यांच्या खाण्यापिण्याची सोय व्हावी म्हणून आप्पालाल देखील कोल्हापूरला गेले.तिथे त्यांना देखील कुस्तीची आवड निर्माण झाली.१९८० मध्ये इस्माईल यांनी महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला.भावाचा वारसा पुढे नेत पुढे १९९२ मध्ये आप्पालाल देखील महाराष्ट्र केसरी झाले.पुढे बल्गेरिया आणि इराण येथे झालेल्या विश्वचषक कुस्ती स्पर्धेसाठी देखील आप्पालाल यांची निवड झाली.त्यात त्यांना यश आले नाही.मात्र, १९९१ मध्ये न्यूझीलंड येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत आप्पालाल यांनी भारतासाठी सुवर्ण पदक देखील पटकावलं.आप्पालाल यांचे पुतण्या मुन्नालाल शेख यांनी देखील २००२ मध्ये महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली.या निमित्ताने एकाच परिवारात तीन-तीन महाराष्ट्र केसरी असण्याची ऐतिहासिक नाेंद आहे.