करोनामुळे आरोग्य विभागाकडून शस्त्रक्रियेत ५० टक्के घट!

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

करोनामुळे आरोग्य विभागाकडून शस्त्रक्रियेत ५० टक्के घट!

मुंबई: आरोग्य विभागाची संपूर्ण ताकद करोना रुग्णोपचारात व्यस्त असल्याचा मोठा फटका सामान्य आजारांच्या शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांना बसला आहे. गेल्या वर्षभरात आरोग्य विभागाच्या बहुतेक रुग्णालयांचे रूपांतर करोना उपचार रुग्णालयात करण्यात आल्यामुळे सामान्य रुग्णोपचार शस्त्रक्रियात ५० टक्के घट झाली आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाने आपल्या जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयांपासून ग्रामीण रुग्णालयांपर्यंतच्या आरोग्य व्यवस्थेचे करोना रुग्णोपचारात रूपांतर केले. त्याचबरोबर  डॉक्टर, परिचारिका अन्य आरोग्य वर्ग करोना रुग्णोपचारात वापरण्याचा निर्णय घेतला. याचा मोठा फटका ग्रामीण भागातील विविध आजारांवरील उपचाराची गरज असलेल्या रुग्णांना बसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

यात वेगवेगळ्या शस्त्रक्रियांचे रुग्ण तसेच मधुमेह उच्च रक्तदाब विकारामुळे निर्माण होणाऱ्या विविध आजारांच्या रुग्णांना आरोग्य विभागाच्या रुग्णालयात उपचार मिळू शकलेले नाहीत.

हे प्रमाण २०१९- २० या वर्षांच्या तुलनेत २०२०-२१ मध्ये  निम्मे झालेले दिसून येते. आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयांत मिळून २०१९-२० मध्ये बाह्य़रुग्ण विभागात सहा कोटी ५४ लाख १६ हजार ६५७ रुग्णांनी उपचार घेतले. तर ४८ लाख ८० हजार ५३६ एवढे रुग्ण दाखल झाले होते. दोन लाख ३६ हजार ७६७ मोठय़ा शस्त्रक्रिया केल्या गेल्या, तर याच काळात दोन लाख ९९ हजार ४०६ छोटय़ा शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या.

करोना वर्षांत म्हणजे २०२०-२१ मध्ये बाह्य़ रुग्ण विभागात तीन कोटी २७ लाख ९५ हजार ५४८ रुग्णांवर उपचार केले, तर २६ लाख ३८ हजार २७१ रुग्णांवर दाखल करून उपचार करण्यात आले. मोठय़ा शस्त्रक्रिया फक्त ९६ हजार ८८२ झाल्या, तर एक लाख ७२ हजार ४९४ छोटय़ा शस्त्रक्रिया करण्यात आल्या.