ममतांही निघाल्या घराणेशाहीकडे

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

ममतांही निघाल्या घराणेशाहीकडे

पत्रकारांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रि ममता बॅनर्जी यांचे खूप कौतुक आहे. पंतप्रधान मोदीना टक्कर देऊ शकणार्या म्हणून त्यांच्याकडे अर्धवट पत्रपंडित आणि मोदी सत्तेतून जावेत म्हणून काहीही करण्यास तयार असलेले राजकीय पक्ष यांना ममतांच्या रूपात मोठी रणरागिणी दिसते. त्यातच भाजपचे कडवे आव्हान मोडून यंदा पश्चिम बंगाल निवडणुकीत दोन जास्त जागा जिंकणार्या ममतांना पत्रकारांनी डोक्यावर घ्यावे, यात काही नवल नाहि. त्यांच्या दृष्टिने ममता या तत्वनिष्ठ वगैरे आहेत. त्यांचे ते मत आहे आणि त्यात काही गैर काही नाहि. कुणी कुणाचे कौतुक करावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु  ममता दीदींनी तृणमूल काँग्रेसच्या अखिल भारतीय सरचिटणीसपदी आपला भाचा अभिषेक बॅनर्जी यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे या पत्रपंडितांची बोलती बंद होईल. मुळात मोदी यांनी सर्वाधिक प्रहार घराणेशाहीवरच केले होते.  त्यांच्या घराणेशाहीच्या आरोपांमुळे तर राहुल गांधी यांना वारंवार पराभव पत्करावा लागतो. परंतु त्यापासून काहीही धडा न घेता ममताही आता त्याच मार्गाने निघाल्या आहेत. या मार्गावर त्यांचे कितीतरी साथीसोबती असतील. तमिळनाडूचे मुख्यमंत्रि स्टॅलिन, राज्याचे मुख्यमंत्रि उद्धव ठाकरे, आंध्रप्रदेशचे वायएसआर जगनमोहन रेड्डी, समाजवादी पार्टीचे नेते अखिलेशसिंह यादव, बिहारमध्ये तेजस्वी यादव, कश्मिरमध्ये फारूख अब्दुल्ला आणि नंतर ओमर अब्दुल्ला असे काही या मार्गावर आहेत. दिल्लीचे अरविंद केजरीवाल आणि शिवराज चौहान, विजय रूपाणी वगैरे अपवाद  आहेत. परंतु घराणेशाहीचा रस्ता ममतांनी का पत्करला असावा, याचे साधे विश्लेषण सांगता येईल. ममतांना आपल्या भाच्याला पक्षाची सूत्रे का सोपवावी वाटली, याचे कारण त्यांचे  एकेकाळचे विश्वासू सुवेंदु अधिकारी यांनी साथ सोडण्यात आहे. सुवेंदूनी साथ सोडल्यामुळे ममता किती अस्वस्थ आहेत, हे यावरून स्पष्ट होते. शिवाय सुवेंदूंनी ममतांना विधानसभा निवडणुकीत हरवलेही आहे. सुवेंदू गेल्यामुळे ममता त्यांच्या जागी तितक्याच लायक व्यक्तिची वर्णी लावण्यासाठी पर्याय शोधत असाव्यात. परंतु त्यांना तो पक्षात सापडला नाहिच. अखेरीस त्यांनी अखेर कुटुंबियांवर विश्वास टाकायचे ठरवले असावे. इतर सर्व घराणेशाहीप्रमाणे या अभिषेक बॅनर्जीचे कर्तृत्व काहीही सिद्ध झालेले नाहि. केवळ ममतांचा भाचा यापलिकडे त्यांची काहीही ओळख नाहि. स्टॅलिन, वायएसआर यांचे कर्तृत्व तरी अफाट आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात पक्ष व्यवस्थित सांभाळला आहे. परंतु अभिषेक यांचे काहीही कर्तृत्व सिद्ध झाले नसतानाच त्यांना इतकी मोठी जबाबदारी दिली आहे. ममता यांना कदाचित केंद्रात मोठी जबाबदारी पार पाडायची असेल. त्या स्वतःला खरोखरच भाजपविरोधी आघाडीच्या प्रमुख नेत्या समजत असाव्यात. त्याबद्दल काहीच आक्षेपार्ह नाहि.  पण त्यांना यश मिळणार आहे का हा खरा प्रश्न आहे. मोदीविरोधी संपूर्ण आघाडी झाली तरीही नेत्यांचा अहंगंड इतका आहे की नेता ठरवण्यातच पाच वर्षे निघून जातील.  सुवेंदु पक्षात असते तर त्यांनाच ममतांनी मोठी जबाबदारी दिली असती. आणि ममता केंद्रात गेल्या असत्या तर सुवेंदुच मुख्यमंत्रि झाले  असते, हेही स्पष्ट आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अभिषेक यांनी प्रमुख भूमिका बजावली, हे खरे आहे. प्रशांत किशोर यांना निवडणूक रणनीतीकार म्हणून आणायची कल्पना त्यांचीच आहे. परंतु खरेतर ममता जास्त जागा जिंकल्या याला खरे कारण अर्थातच बंगालमधील अल्पसंख्यांकांनी एकत्र येऊन ममतांच्या पाठिशी उभे राहिले,हेच आहे. भाजपच्या धोरणांमुळे आपण कधीही बंगालमधून निर्वासित होऊ, या भीतीतून मुस्लिम मतदार ममतांच्या मागे राहिले. त्यांचा विश्वास काँग्रेस आणि डाव्यांवर अजिबात राहिला नाहि, हे ही स्पष्ट झाले आहे. तरीही ममतांनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे. ममतांनी आपला वारसदार निव़डला आहे आणि तो त्यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी हेच आहेत. केवळ काँग्रेसच नव्हे तर संपूर्ण प्रादेशिक पक्ष घराणेशाहीच्या भोवती फिरत आहेत. द्रमुक असो, शिवसेना असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो की आंध्रप्रदेशातील वायएसआर रेड्डी यांची काँग्रेस असो. सारेच पक्ष केवळ आपल्या घराण्यातील लोकांनाच भावी नेता म्हणून निवडत आहेत. यात कार्यकर्त्यांची भूमिका काय हा सनातन प्रश्न पुन्हा उभा रहातोच आहे. कार्यकर्त्यांनी केवळ सतरंज्या उचलायच्या आणि नेतेमंडळी व्यासपीठावर बसली की त्यांच्यासमोर बिसलेरी पाण्याच्या बाटल्या भरून ठेवायच्या, इतकी कार्यकर्त्यांची भूमिका राहिली आहे. नेत्यांनी सांगितले की आंदोलन करायचे आणि केसेस अंगावर घ्यायच्या आणि वर्षानुवर्षे न्यायालयात हेलपाटे घालत रहायचे. नेते मजा करत रहाणार आणि कार्यकर्ते जेलची हवा खात रहाणार, हेच चालत आले आहे आणि पुढेही चालत रहाणार आहे. भाजपचाच केवळ या घराणेशाहीला अपवाद आहे. भाजपच्या काही नेत्यांची मुले वगैरे सत्ताधारी बनली आहेत, परंतु एकूण मोठ्या नेतेपदी भाजपचे तळागाळातून आलेले कार्यकर्तेच आहेत. हा फरक इतर पक्षांत आणि भाजपमध्ये आहे. कदाचित उद्या  भाजपकडे कार्यकर्ते या एका गोष्टीमुळेही आकर्षित होऊ शकतील. सध्या मात्र ज्या ममतांबद्दल पत्रपंडितांना विश्वास वाटत होता, त्यांनी दगा दिला आहे. ममतांनीही लोकशाही मार्गाने जाण्याऐवजी आपला वारसदार म्हणून कुटुंबातील सदस्यच निवडला, हे भारतीय राजकारणाचे अपयश आहे.