पथदिव्यांसह पाणी पुरवठा योजनांच्या वीज जोडण्या तातडीने पूर्ववत करणार

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

पथदिव्यांसह पाणी पुरवठा योजनांच्या वीज जोडण्या तातडीने पूर्ववत करणार

मुंबई, दि. २० : राज्यातील ग्रामपंचायतींच्या पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीज बीलांची तपासणी करुन त्यांचा योग्य मेळ घालण्यासाठी संबंधित विभागांच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी,या समितीने १५ ऑगस्टपर्यंतच्या कालमर्यादेत अहवाल सादर करावा. या समितीचा अहवाल येईपर्यंत ग्रामीण आणि स्थानिक नागरी स्वराज्य संस्था पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांची वीज देयकांची वसुली वीजतोडणी तोपर्यंत थांबवून,यापूर्वी तोडलेल्या वीज जोडण्या तातडीने पूर्ववत करण्याचा महत्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आज घेण्यात आला.
राज्यातील ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांची थकीत वीज देयके ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीज देयकांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील,यांच्यासह यावेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.राज्यातील महापालिका,नगरपालिका आणि ग्रामपंचायतीकडील पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीज देयकांवरील दंड आणि व्याज वगळून उर्वरीत रक्कमेच्या पन्नास टक्के रक्कम स्थानिक स्वराज्य संस्थांनी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून महावितरण कंपनीला अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.त्यानुसार ग्रामविकास विभागाने सदर थकित रक्कम चार हप्त्यात महावितरणला अदा करण्यात आली आहे.या संदर्भात महावितरणकडून तदनंतरच्या देय थकबाकी रकमेची मागणी संबंधित विभागाकडे केली आहे.महावितरणने वीज बिलापोटी यापूर्वी प्राप्त झालेल्या थकबाकी रकमेची तपासणी करुन योग्य मेळ घालण्यासाठी पाणीपुरवठा विभाग,ग्रामविकास विभाग, नगरविकास विभाग,ऊर्जा विभाग आणि महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची अप्पर मुख्य सचिव पाणी पुरवठा स्वच्छता विभाग यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठीत करुन १५ ऑगस्टपर्यंत याबाबतचा सविस्तर अहवाल आवश्यक शिफारसींसह सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. हा राज्यस्तरीय समितीचा अहवाल येईपर्यंत राज्यातील ग्रामीण,स्थानिक नागरी स्वराज्य संस्थांमधील पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांची वीजवसुली, तोडणी तात्पुरत्या स्वरुपात थांबवून तसेच यापूर्वी तोडलेल्या वीजजोडण्या तातडीने पूर्ववत करण्याचा महत्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आज घेण्यात आला.