पदोन्नती आरक्षण रद्द : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर नितीन राऊत यांनी दिली प्रतिक्रिया

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

पदोन्नती आरक्षण रद्द : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर नितीन राऊत यांनी दिली प्रतिक्रिया

मुंबई  : पदोन्नती आरक्षणासंदर्भात आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, नितीन राऊत, वर्षा गायकवाडी आदी मंत्र्यांची उपस्थिती होती. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले आहे. बैठक पार पडल्यानंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून, लवकरच यावर तोडगा निघेल. तसेच, मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.

माध्यमांशी बोलताना ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले, “पदोन्नती आरक्षण या विषयी बैठकीत सकारात्मक सांगोपांग चर्चा झाली आहे आणि निश्चितच यावर तोडगा निघेल, अशी मला खात्री आहे. सरकाकर देखील याबाबत सकारात्मक आहे. सर्वांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे आणि त्यामुळे आता काही अडचण येणार नाही. लवकरच यावर तोडगा काढला जाईल.”

तसेच, “ मे रोजी काढण्यात आलेल्या अध्यादेशाबाबतच चर्चा होती. चर्चा झाली असून सरकारच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जी भूमिका मांडली, त्यावर सर्वांनी अभ्यास करायचं ठरवलं. कायदेशीरबाबी अनेक आहेत. प्रशासकीय बाबी आहेत. सकारात्मक निर्णय होईल, असं सर्वांनी मत व्यक्त केलं आहे.” असंही राऊत यांनी सांगितलं. याचबरोबर, “आम्ही विषय लावून धरला यात काही वाद नाही. तीन पक्षाचं सरकार आहे हे सर्वांना माहिती आहे आणि निर्णय घेण्यासाठी तिन्ही पक्षाच्या नेत्यांना तो विषय समजावून सांगणे त्यावर मार्गदर्शन घेणे. हे सर्व विषय त्यामध्ये असतात. आज आम्ही यावर सखोल चर्चा केली सर्व बाबी समजून घेतल्या आहेत. आता केवळ निर्णयापर्यंत पोहचायचं आहे, दरम्यानच्या काळात मुंबई उच्च न्यायालयात रीट याचिका कुणीतरी दाखल केलेली असून, त्याच्या सुनावणीची २१ जून तारीख आहे. त्यामुळे थोडा पेच निर्माण झालेला आहे. यासंबंधी कायदेशीर अभ्यास करून योग्य तो निर्णय घेतला जाईल तो निर्णय सकारत्मक असेल.” असं नितीन राऊत यांनी यावेळी बोलून दाखवलं.