पंढरपुरात इलेक्शन ड्युटीला गेलेल्या शिक्षकासह कुटुंबातील चौघांचा कोरोनामुळे मृत्यू

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

पंढरपुरात इलेक्शन ड्युटीला गेलेल्या शिक्षकासह कुटुंबातील चौघांचा कोरोनामुळे मृत्यू

सोलापूर : पंढरपूरची पोटनिवडणूक कोरोनाचा संसर्ग वाढण्यासाठी अतिशय पोषक ठरली असून अनेकांना यामुळे प्राण गमवावा लागला. जे या निवडणूक प्रक्रियेत सामील होते त्यांना याचा अधिक फटका बसला असून त्यांच्या संसर्गाने इतरांनाही आपले प्राण गमवावे लागत आहेत.

 

 सांगोला तालुक्यात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला असून केवळ इलेक्शन ड्युटीला आलेल्या शिक्षकासह त्याच्या कुटुंबातील आई, वडील आणि मावशीचा मृत्यू झाला. पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी सांगोला तालुक्यातील घेर्डी येथील प्रमोद माने हे शिक्षक मतदानाच्या ड्युटीला होते. इथून परत गेल्यावर त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यामुळे त्यांची पत्नी, मुलगा, आई, वडील आणि मावशी यांनाही कोरोनाची लागण झाली. प्रमोद माने यांच्यावर सुरुवातीला सांगोला इथे उपचार करण्यात आले. मात्र तब्येत खालावल्याने त्यांच्या डॉक्टर भावाने त्यांना मुंबई इथे हलवले. मात्र प्रयत्नांची शिकस्त करुनही प्रमोद माने यांचे निधन झाले. यानंतर त्यांचे वडील वसंतराव, आई शशिकला आणि मावशी जया घोरपडे यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. सुदैवाने त्यांची पत्नी आणि मुलाने कोरोनावर मात केली. परंतु या निवडणुकीमुळे केवळ शासकीय ड्युटी करणाऱ्या प्रमोद माने यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने माने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला प्रशासन, राजकीय नेत्यांनी फारसे गांभीर्याने घेण्याची मोठी चूक केली आणि त्याच काळात पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीची घोषणा झाली. यावेळी कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून कार्यकर्त्यांच्या आढावा बैठका, मोठ्या नेत्यांचे दौरे नियमितपणे सुरु होते. परिणामी पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीनंतर परिसरात कोरोनाने कहर केला असून रुग्णसंख्या पाचपटीने वाढली आहे. तर गेल्या 20 दिवसांत 125 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला