मुंबईतील दुर्घटनांबाबत दु:ख व्यक्त करत अजित पवार यांनी केली मोठी घोषणा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुंबईतील दुर्घटनांबाबत दु:ख व्यक्त करत अजित पवार यांनी केली मोठी घोषणा

मुंबई : मुंबईतील चेंबुर व विक्रोळी परिसरात पावसामुळे भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनांबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून दुर्घटनेत मृत्यु पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत.(Mumbai Chembur Landslide) मृतांच्या कुटुंबियांना शासनातर्फे पाच लाख रुपयांची मदत व जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे, अशी माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली. (Deputy Chief Minister Ajit Pawar expresses grief over deaths in Mumbai accidents; Rs 5 lakh assistance to the families of the deceased, free treatment to the injured)

मुंबईतल्या चेंबुरच्या आरसीएफ परीसरातल्या भारतनगरमध्ये व विक्रोळी येथील दुर्घटनेच्या ठिकाणी एनडीआरएफ, अग्निशमन, महापालिका, पोलिस आदी यंत्रणांतर्फे तात्काळ बचाव व मदतकार्य सुरु करण्यात आले. अनेकांना ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर काढण्यात बचावपथकांना यश आले. आपत्कालिन यंत्रणांकडून दुर्घटनास्थळीही तात्काळ बचावकार्य सुरु करण्यात आल्याची माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली. दुर्घटनेतील जखमींवर शासनामार्फत मोफत उपचार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई शहर व राज्यातील अनेक जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्कालिन यंत्रणांनी सतर्क राहून परस्पर समन्वयाने काम करावे. नागरिकांनीही सुरक्षितताविषयक नियम व संदेशांचे पालन करुन काळजी घ्यावी. आपत्कालिन परिस्थितीत तात्काळ पोलिस किंवा नजिकच्या शासकीय यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.