दिल्ली विमानतळात शिरले पावसाचे पाणी

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

दिल्ली विमानतळात शिरले पावसाचे पाणी

नवी दिल्ली  : राजधानी दिल्लीत शुक्रवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दिल्ली शहरासह इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमातळात पाणी साचले आहे. विमानतळाच्या काही धावपट्ट्या पाण्याखाली गेल्या असून टर्मिनलमध्येही पावसाचे पाणी शिरले आहे. त्यामुळे 4 डोमेस्टीक आणि एका आंतरराष्ट्रीय विमानाचा मार्ग बदलण्यात आला आहे.
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल क्रमांक 3 वर सर्वाधिक पाणी साचले आहे. या घटनेनंतर विमानतळ प्रशासनाकडून दिलगीरी व्यक्त करण्यात आली आहे. तसेच विमानतळाच्या धावपट्टीवरील पाणी काढून टाकण्यासाठी कर्मचाऱ्यांची एक टीम त्याठिकाणी पोहोचली असून धावपट्टीवरील पाणी काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच दिल्लीत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे 4 राष्ट्रीय आणि 1 आंतरराष्ट्रीय विमानाचे मार्ग बदलण्यात आले आहे. संबंधित विमानं जयपूर आणि अहमदाबाद विमानतळाकडे वळवण्यात आल्याची माहितीही विमानतळ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.शिवाय राजधानी दिल्लीत जागोजागी पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. दिल्लीला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहत असल्याने दिल्लीतील तापमानात घट झाली आहे. दिल्लीतील तापमान सरासरी तापमानापेक्षा 3 ते 4 अंशांनी खाली पोहोचले आहे.मुसळधार पावसामुळे दिल्लीतील मोती बाग, आरकेपुरम, महिपालपूर, मधु विहार, खानपूर-देवली, मुनरिकासह अनेक भागात वाहतूक कोंडी झाली आहे. तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं बस आणि ऑटो देखील पावसाच्या पाण्यात अडकून पडल्या आहेत. याशिवाय मेट्रो स्टेशनच्या बाहेर अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं लोक विविध समस्यांना सामोरं जावं लागत आहे.

जीएमआरचा दावा फोल ठरला
दिल्ली विमानतळाचे व्यवस्थापन हे जीएमआर या खासगी संस्थेकडे आहे. दिल्ली विमानतळ हे देशातील सर्वोत्तम विमानतळ असल्याचे बोर्ड जीएमआर कंपनीने लावले आहेत. आता याच विमानतळावर सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचं दिसून आलेय. त्यामुळे उत्तम व्यवस्थापनेचा दावा करणाऱ्या जीएमआर कंपनीचा दावा किती फोल ठरला आहे हे दिसून येत असल्याचा प्रवाशांचा आरोप आहे. अचानक आलेल्या पावसामुळे विमानतळावर पाणी साचलं असून प्रवाशांना झालेल्या तसदीबद्दल खेद व्यक्त करत आहोत असे दिल्ली विमानतळाच्या व्यवस्थापनाने स्पष्ट केले. तसेच थोड्याच वेळात पाणी बाहेर काढण्यात येईल असंही आश्वासन व्यवस्थापनाने दिले आहे.