आम आदमी पार्टीने उत्तराखंडमधील मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची केली घोषणा!

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

आम आदमी पार्टीने उत्तराखंडमधील मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची केली घोषणा!

उत्तराखंडमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आता विविध राजकीय पक्षांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. आम आदमी पार्टीने देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला असून, दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल हे उत्तराखंडमध्ये दाखल झालेले आहेत. तसेच, त्यांनी या ठिकाणी आगामी विधासभा निवडणुकीसाठी आपचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असणार, याबाबत घोषणा देखील केली. त्यानुसार निवृत्त कर्नल अजय कोटियाल हे आगामी आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असणार आहेत.

केजरीवाल म्हणाले की, आज मी दोन मोठ्या घोषणा करण्यासाठी आलो आहे. ज्या उत्तराखंडच्या विकासासाठी अतिशय महत्वपूर्ण असतील. मी गर्वाने जाहीर करू इच्छित आहे की, आगामी निवडणुकीत आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार हे कर्नल अजय कोटियाल असतील. तसेच, केजरीवाल यांनी हे देखील सांगितले की, आम्ही सर्वेच्या माध्यमातून कर्नल कोटियाल यांच्या उमेदवारीबाबत लोकांचे मत जाणून घेतले. त्यावर लोकांनी सांगितले की आता आम्हाला देशभक्त फौजी हवा आहे. म्हणून कर्नल कोटियाल यांचे नाव मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारासाठी निश्चित करण्यात आले. हा निर्णय उत्तराखंडच्या लोकांनी घेतला आहे. अजय कोटियाल यांनी सैन्यात राहून देशाची सेवा केली आहे. जेव्हा उत्तराखंडचे काही नेते येथील लोकांना लुटत होते, तेव्हा कोटियाल हे सीमेवर देशाचे रक्षण करत होते.

काही वर्षांपूर्वी केदारनाथवर आपत्ती कोसळली होती. तेव्हा या व्यक्तीने केदारनाथचे पुनर्निर्माण केले होते. आता ते उत्तराखंडचे नविनर्माण करतील. उत्तराखंडला आम्ही देवभूमी म्हणतो, या ठिकाणी हिंदुंची अनेक तीर्थस्थळं आहेत, जगभरातून या ठिकाणी हिंदू येतात. त्यांच्यासोबत मिळून आम्ही उत्तराखंडला संपूर्ण जगासाठी आध्यात्मिक राजधानी बनवू. यामुळे तरूणांना रोजगार देखील मिळतील. असंही केजरीवाल यांनी बोलून दाखवलं.