भारत बायोटेकचा ब्राझीलसोबतचा कोव्हॅक्सिन करार संपुष्टात

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

भारत बायोटेकचा ब्राझीलसोबतचा कोव्हॅक्सिन करार संपुष्टात

भारत बायोटेकचा ब्राझीलसोबतचा कोव्हॅक्सिन लस करार संपुष्टात आला आहे. कंपनीने २४ नोव्हेंबर २०२० रोजी ब्राझीलच्या प्रेशिया मेडिकामेंटोस आणि एनविस्किया फार्मासिटिकल्स एलएलसी कंपन्यांसोबत करार केला होता. ब्राझीलमध्ये लस खरेदीत भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर कंपनीने हा करार रद्द केल्याचं बोललं जात आहे. प्रेशिया मेडिकामेंटोस कंपनीसोबत ब्राझीलमध्ये भारत बायोटेक भागिदार आहे.”आम्ही तात्काळ सामंजस्य करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतरही कंपनी कोव्हॅक्सिनसाठी नियमांची प्रक्रिया पूर्ण करून मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करेल. औषध नियामक संस्था एएनव्हीआयएसएला सहकार्य करेल.”, असं भारत बायोटेककडून सांगण्यात आलं आहे.

यापूर्वी ब्राझील सरकारने भारतीय लस उत्पादक कंपनी भारत बायोटेकसोबतचा ३२ कोटी डॉलर्सचा लस खरेदी करार स्थगित केला होता. ब्राझीलने भारत बायोटेककडून कोव्हॅक्सिनचे २० मिलियन डोस खरेदी करण्यासाठी करार केला होता. या करारमुळे भ्रष्टाचाराच्या चर्चेला तोंड फुटलं असून, राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो वादात सापडण्याची चिन्हं आहेत. ब्राझीलने भारत बायोटेकसोबत केलेल्या लस खरेदी करारात भ्रष्टचार झाल्याचा आरोप ‘व्हिसलब्लोअर’नी केला आहे. सरकारकडून यावर स्पष्टीकरणही देण्यात आलं, मात्र त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. त्यानंतर आता हा मुद्दा ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयात गेला असून, ब्राझील सरकारने या खरेदी कराराला स्थगिती दिली.

ब्राझील सरकारने भारत बायोटेककडून लस खरेदी करण्यासाठी करार केला होता. भारत बायोटेककडून लस खरेदी हाच मूळ वादाचा विषय ठरला होता. ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांनी भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस खरेदी करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबद्दल राष्ट्राध्यक्षी जाइर बोल्सोनारो यांना माहिती होती, मात्र त्यांनी लस खरेदी करार थांबवला नाही. ज्यामुळे ब्राझीलला महागडी लस खरेदी करावी लागली. ब्राझीलकडे फायझरची लस खरेदी करण्याचा पर्याय होता. पण त्यांनी भारत बायोटेककडून महागडी लस खरेदी केली, असा सवालही उपस्थित केला जात आहे. लस खरेदी कराराबद्दल करण्यात आलेले हे आरोप सिद्ध झाले, तर बोल्सोनारो यांना पद गमवावं लागू शकतं.