पालघर साधू हत्याकांड : १४ आरोपींना जामीन मंजूर, १८ जणांचे जामीन फेटाळले

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

पालघर साधू हत्याकांड : १४ आरोपींना जामीन मंजूर, १८ जणांचे जामीन फेटाळले

पालघर,: गेल्या वर्षी गडचिंचले येथे जमावाकडून झालेल्या मारहाणीत दोन साधूंसह त्यांच्या कारचालकाची हत्या झाली होती. या प्रकरणी १४ आरोपींना ठाण्याच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला असून अन्य १८ आरोपींचे जामीन फेटाळून लावले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० जुलै रोजी होणार आहे. अतिरिक्त सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश आर.एस. गुप्ता यांच्यासमोर सदर सुनावणी झाली.

 

काय आहे पार्श्र्वभूमी?

 

पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या गडचिंचले येथे वाट चुकलेल्या कल्पवृक्ष गिरी (७०), सुशीलगिरी महाराज (३५) आणि त्यांचा चालक नीलेश तेलगडे (३०) यांची १६ एप्रिल २०२० रोजी जमावाने केलेल्या मारहाणीत निर्घृण हत्या केली होती. मिळालेल्या माहितीनुसारया तिहेरी हत्याप्रकरणी आतापर्यंत २०१ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यापैकी ७५ जणांना मुख्य आरोपी करण्यात आले आहे. त्यापैकी काहींना ठाणे अतिरिक्त सत्र न्यायालयाने १५ हजारांच्या जातमुचलक्यावर आधीच जामीन मंजूर केला होता, तर इतर आरोपींच्या जामिनावरील सुनावणी मंगळवारी झाली. त्यात १४ आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला. याचवेळी न्यायालयासमोर सुनावणीस आलेल्या या घटनेतील अन्य १८ आरोपींचा जामीन नामंजूर करण्यात आला.