तिसऱ्या लाटेशी लढण्यास राज्य सक्षम- अजित पवार

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

तिसऱ्या लाटेशी लढण्यास राज्य सक्षम- अजित पवार

पुणे, : करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्यास राज्य सक्षम असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी
सांगितलं. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज जिल्ह्यातल्या करोना
परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. तिसऱ्या लाटेबद्दल पवारांना विचारणा
केली असता राज्य तिसऱ्या लाटेशी लढण्यास सक्षम असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात लहान मुलांसाठी कोविड
सेंटर्स उभारण्यातं काम सुरु आहे. पुण्यातल्या येरवड्यातही लहान मुलांसाठीचं १०० बेड्स कोविड सेंटर आजपासून
सुरु झालं असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर लसींच्या मागणीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणं सुरु आहे.
पुणे, मुंबई महानगरपालिकांनी लसींसाठी ग्लोबल टेंडर काढलं असल्याचंही त्यांनी सांगितलं.
पुण्यातल्या करोना स्थितीचा आढावा घेतल्यावर त्यांनी जिल्ह्याबद्दलही माहिती दिली. पुण्यात आता पॉझिटिव्ह
रुग्णांची संख्या कमी होत आहे. तर बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पुण्यात आता
सर्व प्रकारचे बेड्स असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्याचबरोबर आता जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन, रेमडेसिविर
यांचा तुटवडा नसल्याचंही त्यांनी सांगितलं. मात्र, ग्रामीण भागातली रुग्णसंख्या अजूनही अपेक्षेप्रमाणे आटोक्यात
आली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
म्युकरमायकोसिसच्या रुग्णांच्या उपचारासाठी लागणाऱी इन्जेक्शन्स मात्र राज्याकडे पुरेशी उपलब्ध नाहीत.
त्यांचा तुटवडा आहे. मात्र, त्यासाठी आम्ही केंद्राकडे पाठपुरावा करत आहोत, असंही त्यांनी सांगितलं. या
इन्जेक्शन्ससाठी थेट उत्पादक कंपन्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र, त्यांना सर्व इन्जेक्शन्स
केंद्राकडे देणं बंधनकारक असल्याने ते थेट देऊ शकत नसल्याची माहितीही पवारांनी यावेळी दिली.