भारतीयांना सुरक्षित आणण्यावर भर - जयशंकर

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

भारतीयांना सुरक्षित आणण्यावर भर - जयशंकर

नवी दिल्ली,: अफगाणिस्तानात अडकलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला सुरक्षित मायदेशी आणण्यावर आम्ही भर दिला असल्याची ग्वाही केंद्र सरकारने आज गुरुवारी सर्वपक्षीय बैठकीत दिली.
यावेळी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले की, प्रत्येक भारतीयाचे प्राण आमच्यासाठी महत्त्वाचे आहे आणि ते आम्ही वाचविणार आहोत. अफगाणच्या कोणत्याही भागात अडकलेल्या भारतीयाला शोधून त्याला मायदेशी सुखरूप आणण्याला आम्ही प्राधान्य दिले आहे, अशी माहिती जयशंकर यांनी राजकीय पक्षांच्या नेत्यांना दिली. यावेळी त्यांनी अफगाणमधील स्थितीची आणि तिथे अडकलेल्या भारतीय तसेच इतर देशांच्या नागरिकांच्या सुरक्षित सुटकेसाठी भारत सरकारकडून सुरू असलेल्या मोहिमेची माहिती देखील दिली.

या बैठकीनंतर आयोजित पत्रपरिषदेत जयशंकर यांच्यासोबतच केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनीही सरकारच्या भूमिकेची माहिती दिली. संसद भवन परिसरात ही पत्रपरिषद आयोजित करण्यात आली होती.केवळ भारतीयांनाच नव्हे, तर इतर देशांच्या नागरिकांनाही सुरक्षित भारतात आणण्यावर आमचा भर आहे.इतकेच नव्हे, तर अफगाणिस्तानच्या नागरिकांनाही भारतात आणले जात आहे.भारतीयांच्या सुरक्षेला आम्ही प्राधान्य दिले आहे.त्याचवेळी इतर देशांच्या नागरिकांचा जीव वाचविण्यावरही भर दिला जात आहे, असे या केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केले.
दोहा करार करताना तालिबानने जे वचन जगाला दिले होते, त्या वचनावरून तालिबान मागे हटला आहे. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात दोहा करारावर स्वाक्षरी करताना तालिबानने धार्मिक स्वातंत्र्य आणि अफगाणमध्ये लोकशाही प्रस्थापित करण्याची ग्वाही दिली होती. सोबतच, अफगाणमधील सर्व घटकांचा लोकशाहीत समावेश करण्याचेही वचन दिले होते.आता मात्र तालिबानने दोहा करार मान्य करण्यास नकार दिला आहे, याकडे जयशंकर यांनी लक्ष वेधले. पंतप्रधानांनी बोलावलेल्या आणि सुमारे साडेतीन तास चाललेल्या या सर्वपक्षीय बैठकीला राष्ट्रवादी काँगे‘सचे अध्यक्ष शरद पवार, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खडगे, लोकसभेतील काँगे‘सचे गटनेते अधीररंजन चौधरी, द्रमुकचे नेते टी. आर.बालू, माजी पंतप्रधान आणि जदएसचे नेते एच.डी.देवेगौडा, अपना दलाच्या अनुप्रिया पटेल आदी नेते उपस्थित होते.
याशिवाय, भारताचे अफगाणमधील राजदूत रुद्रेंद्र टंडन आणि विदेश सचिव हर्ष शृंगला हे देखील बैठकीत उपस्थित होते.अफगाणिस्तानच्या कानाकोपर्यात अडकलेल्या सर्व भारतीयांच्या सुरक्षेला सरकारने प्राधान्य द्यावे, असे मत बैठकीत सर्वच राजकीय पक्षांनी व्यक्त केले.सोबतच, आतापर्यंत भारतीयांना व इतर देशांच्या नागरिकांना सुखरूप आणण्यासाठी सरकारने केलेल्या कार्याचे कौतुकही केले.अफगाणमधून भारतीयांना सुरक्षित आणण्यासाठी सरकारच्या प्रत्येक पुढाकाराला आमचा पाठिंबा असल्याचेही सर्व पक्षांनी स्पष्ट केले.