तालिबानी अरिष्ट

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

तालिबानी अरिष्ट

८० हजाराच्या तालिबानी तुकडीमुळे तीन लाख अफगाण सैन्याला काही मिनिटांत धूळ चारून अफगाणिस्तानाची सत्ता काबिज केली आणि त्यामुळे तेथे सत्ता परिवर्तन झाले. आता तालिबानींचे पक्षपाती मोठ्या गर्वाने एकही काडतूस न झाडता सत्तांतर झाल्याचे सांगत आहेत. मात्र या दाव्यात काही तथ्य नाहि. जोपर्यंत अमेरिकेचे सैन्य काबूलमध्ये होते तोपर्यंत तालिबान्यांचीही हिमत झाली नव्हती. नंतर मात्र तालिबानी मोठ्या शूरपणाचा आव आणत घुसले. याचा अर्थ तालिबान्यांनाही धूळ चारता येते. पण त्यांच्या क्रौर्याच्या कहाण्या सतत रंगवून सांगितल्या जात असल्याने त्यांच्याशी लढण्यासाठी इतर सैन्ये घाबरतात. कारण जे अफगाण सैन्य प्रशिक्षित आणि जिगरबाज वगैरे आहे, असा दावा अमेरिका अगोदर करत होती, ते किती कचकड्याचे आहे, ते अफगाण सैन्यानेच सिद्ध केले. अफगाण अध्यक्ष तर अगोदरच अमेरिकेच्या हातचा बाहुला होता. त्यामुळे तो तालिबानच्या हाती देशाचे भवितव्य, महिलांसाठी अंधारयुग आणि तिजोरीच्या चाव्या सोडून पळून गेला. अशरफ गनी याला अध्यक्षपदी अमेरिकेने निवडण्याचे एकमेव कारण तो हातचा बाहुला होता, हेच होते. त्यामुळे त्याच्याकडून लढण्याची अपेक्षा नव्हतीच. परंतु तीन लाख अफगाण सैन्यापैकी एकालाही तालिबानशी लढण्याची उर्मी येऊ नये, हे जास्त  विषाद निर्माण करणारे आहे. यावरून काय लायकीचे हे सैन्य असेल, त्याचा अंदाज येतो. पण त्याहीपेक्षा चिंताजनक हे आहे की, अफगाणिस्तानातील महिलांच्या वाट्याला तर आता अंधारयुग आले आहे. भलेही काही जण अजूनही तालिबान आता बदललेले आहेत, वगैरे तरफदारी करत आहेत. परंतु हे सारे तालिबान्यांचा मुखवटा आहे. एकदा जगाची मान्यता मिळाली की ते पुन्हा आपल्या जुन्या भयानक दडपशाहीच्या वर्तनावर जाणार, हे निश्चित आहे. तालिबानींसमोर अशरफ गनीने ज्या प्रकारे गुडघे टेकले आणि तो संपत्ती घेऊन पळून गेला, त्यावरून गनी किंवा त्याचे सैन्य तालिबान्यांशी लढण्यासाठी अजिबात तयार नव्हता, हे स्पष्टच होते. अशरफ गनीचे प्रशासन निव्वळ लाचलुचपत  आणि भ्रष्टाचाराने बरबटलेले होते. म्हणून तर तालिबान्यांच्या नुसत्या चाहुलीनेही गनी सारे सामान घेऊन पळून गेला.परंतु यात अफगाणी जनतेचा काहीच  दोष नव्हता. पण अमेरिका आणि अफगाण प्रशासन यांच्या चुकांमुळे आता या अफगाणी जनतेला अक्षरशः नरकयातना भोगाव्या लागणार आहेत. आता तालिबान्यांच्या हाती अफगाणिस्तानचे भविष्य आहे आणि ते भयंकर आहे. आता तेथे महिलांना काय पण पुरूषांनाही फार काही हक्क उरले नाहित. तालिबान्यांची इतकी भयानक दहशत तेथे आहे की तालिबानी येणार म्हटले की कित्येक लोकांनी आपल्या अंगावरचे जीन्स आणि टी शर्ट उतरवून सरळ पारंपरिक कुर्ते लेंगे घातले. ही अवस्था पुरूषांची, तर महिलांची पहायलाच नको. त्यांना तर ओळखीच्या पुरूषाशिवाय बाहेर पडण्याचीही बंदी आहे. पण तालिबान्यांमुळे एकट्या अफगाणिस्तानचे भवितव्य अंधारकोठडीत पडलेले नाहि तर सार्य जगाचेच भवितव्य धोक्यात आले आहे. कारण तालिबान्यांचा विजय हा इतर दहशतवादी गटांना मोठा प्रेरणा देणारा आहे. या अगोदरही हे लिहिले होते. हमास, जैश इ महंमद, लष्कर-ए-तय्यबा अशा ज्या काही एकापेक्षा भयानक दहशतवादी संघटना आहेत, त्यांना तालिबान स्फूर्ती तर देईलच पण त्यांना सारी मदतही देईल. पाकिस्तान आज तालिबानचे संरक्षक म्हणून आनंदात तरंगत असले तरीही पाकिस्तानला तर सर्वात जास्त धोका आहे. पाकिस्तानने आपल्याकडे ज्या दहशतवादी गटांना आश्रय दिला आहे, ते आता जोरात उचल खाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच देशांत आता अतिरेकी गट प्रबळ झाल्याचे दिसेल. आणि आपल्याकडे लेचीपेची सरकार असल्याने त्यांना यशही येताना दिसेल. उद्या सर्वत्र जर अतिरेकी गट प्रबळ होऊन त्यांनी स्वतःकडे सरकार चालवायला घेतले तर मात्र जगाची अवस्था अवघड होणार आहे. सारे अराजकच होऊन जाईल. तालिबानचा जगाला असलेला खरा धोका हा आहे. भारताला तर सर्वाधिक धोका आहे. कारण पाकिस्तान तालिबानचा उपयोग कश्मिरात भारताविरोधात करू शकतो. भारताची ताकद मोठी असल्याने पाकिस्तान किंवा तालिबान फार काही नुकसान करू शकणार नाहित. पण भारताला आता चिनच्या बरोबरीने या बाजूवर सतत लक्ष ठेवावे लागेल. त्यात भारताची शक्ति आणि पैसा नाहक खर्च होणार आहे. तालिबानने अफगाणिस्तावर कबजा करणे हे अनेक अर्थाने अशुभ आहे. खास करून भारताला तर जास्तच अनिष्टकारक आहे.