तालिबानी संकट

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

तालिबानी संकट

भारताला एकामागून एक संकटांना सामोरे जावे लागत आहे. कोविडची दुसरी लाट आता कुठे आटोक्यात येत आहे असे वाटले तर तिसर्या लाटेचा धोका आहेच. पण हा आरोग्य यंत्रणेच्या कमकुवत स्थितीमुळे उद्भवलेला धोका आहे. पण आंतरराष्ट्रीय संकट भारताच्या डोक्यावर घोंघावत आहे. त्यासाठी भारताला खूपच सावध रहावे लागणार आहे. तालिबान हा कट्टरपंथी गट अफगाणिस्तानात सक्रिय आणि प्रबळ होत आहे. एकेकाळी अफगाणिस्तान भारत   किंवा अमेरिका यांच्याचसारखा पुढारलेला आणि खुल्या विचारांचा होता. सत्तरच्या दशकात राजा झहिर सत्तेवर असताना अफगाण महिला त्याकाळातही जीन्स आणि टी शर्ट घालून बिनधास्त फिरत असत. मेडिकल शिक्षण घेण्यासाठी इतर देशांत बिनधास्त वस्तीगृहांमध्ये रहात असत आणि डिस्को पार्ट्यांना सुद्धा हजेरी लावत असत. पण अशा सुंदर अफगाणिस्तानला नजर लागली आणि तालिबान तसेच अल कायदा यांचा उदय झाला. कट्टरपंथी गट प्रबळ झाले किंवा सत्तेवर आले की पहिली कुर्हाड पडते ती स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर. भारत किंवा युरोपातील अत्याधुनिक देश, अमेरिका सोडली तर कोणत्याही देशात याचेच प्रत्यंतर येते. अफगाणिस्तानात तालिबान सत्तेवर आल्यानंतर तर अफगाण मुली पडदानशीन झाल्या आणि लोकांच्या फिरण्यावरही गदा आली. अत्याधुनिक पेहराव गेला आणि सारेच अफगाण पायघोळ वेषात दिसू लागले. ओसामा बिन लादेनने अमेरिकेवर हल्ला केला नसता तर ही स्थिती कायम राहिली असती. अमेरिकन सैन्य  अफगाणिस्तानात दाखल झाले. तालिबानचा पाडाव झाला आणि पुन्हा मोकळ्या विचारांचे वारे खेळू लागले. पण आता तालिबान पुन्हा सशक्त होत आहे आणि अमेरिकन सैन्याची माघार हा एक उपचार उरला आहे. पण यापेक्षाही तालिबनाच्या उदयाचा खरा धोका भारताला आहे. तालिबानी उदयामुळे भारतात सीमेवरून घुसखोरी वाढलेली दिसेल आणि पाकिस्तानातील दहशतवादी गटांना भारतावर दहशतवादी हल्ले घडवण्यासाठी भरपूर निधीचा पुरवठा केला जाईल. हे मोठे संकट भारताच्या सीमेवरील प्रदेशावर घोंघावत आहे. जसजसे अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानातून काढता पाय घेत आहे, तसे तालिबानी गट देशाच्या जास्तीत जास्त प्रदेशावर कब्जा करण्याच्या प्रयत्नात आहेत. अफगाण सरकार आणि अफगाणी सैन्यावर विश्वास ठेवण्यात काहीच अर्थ नाहि. कारण तालिबानी कडवट आहेत तसेच शक्तिशाली आहेत. पण अमेरिकन सैन्य त्यांना पराभूत करू शकले कारण तालिबानींकडे अमेरिकेशी लढण्याइतकी बौद्धिक ताकद नाहि. आता तेथे तालिबान सरकार बनवण्याच्या प्रयत्नात आहे. पाकिस्तानचा अपवाद वगळता तालिबानला पाठिंबा कुणीच देणार नाहि. पाकिस्तान पाठिंबा देईल कारण त्यात पाकिस्तानचे दुहेरी हेतू साध्य होतील. पाकिस्तानी दहशतवादी गटांना पैसा मिळेल आणि तालिबानच्या दहशतवादी गटांची भीती दाखवत अमेरिकेकडून जास्तीत जास्त मदत पदरात पाडून घेता येईल. अर्थात हे होईलच, असे नाहि. पण ही एक शक्यता आहे आणि  तीच भारतासाठी खरी डोकेदुखी आहे. अफगाणिस्तानमध्ये रशियाने सर्वात प्रथम घुसखोरी केली आणि त्यांच्या सैन्याशी लढण्यासाठी म्हणून खरेतर तालिबानची स्थापना झाली होती. पण रशिया आता तालिबानला मदत करणार नाहि पण अफगाण सैन्यालाही मदत करणार नाहि. अमेरिकेच्या अनुभवावरून रशिया शहाणा झाला आहे आणि तो फक्त हवाई हल्ले करून तालिबानींना जेरीस आणेल. परंतु अफगाण भूमीवर पाऊल ठेवणार नाहि. तालिबानचा सर्वात जास्त संताप भारतावर आहे. कारण भारतीय कंपन्यांनी युद्धाने उध्वस्त झालेल्या अफगाणिस्तानात पुनर्रचनेचे काम जोमाने हाती घेतले आहे. तालिबानचे प्रथम लक्ष्य भारताला त्रास देणे असेल आणि पाकिस्तानचा त्यात फायदा असल्याने पाकिस्तान तालिबानला पैसे सोडून इतर प्रकारची मदत जरूर देईल. खरेतर जी भूमिका रशियाची असेल तीच प्रत्येक देशाची असेल. त्यामुळे भारतानेही अशीच भूमिका घेऊन अफगाण भूमीवरून शक्य तितके लवकर काढता पाय घेण्याची गरज आहे. भारतासाठी एकच दिलासा आहे.  ते म्हणजे आपल्या शत्रुला जर नुकसानाची भीती वाटत असेल तर तो दुसर्या शत्रुला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करेल. चिनच्या बाबतीत हे सांगता येईल. चिनला तालिबानचा धोका आपल्यापेक्षाही जास्त आहे. तालिबान चिनमधील बंडखोर उघ्युर चळवळीला बळकट करण्याचा प्रयत्न करतील आणि चिनला तालिबानविरोधात कारवाई करावीच लागेल. तसेच तालिबानी पाकिस्तानातील चिनी गुंतवणुकीवर हल्ला करू शकतात. एका अर्थाने पाकिस्तानसाठीही तालिबान ही डोकेदुखी आहे. पाकिस्तानसाठी तालिबान हा मैत्रिपूर्ण गट असला तरीही पाकिस्तान जितकी तालिबानशी  जवळीक साधू पाहिल, तितकी त्याची आंतरराष्ट्रीय मदत कमी कमी होत जाईल. आज पाकिस्तानाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे आणि हे पाकिस्तानला मुळीच परवडणार नाहि. पण पाकिस्तानची कोंडी अशी विचित्र झाली आहे की त्याने तालिबानला झटकून टाकले तर तालिबानी पाकिस्तानी मालमत्तांवर सतत हल्ले करून विध्वंस घडवून आणतील. अर्थात पाकिस्तानचे जे होईल ते होईल. परंतु तालिबानला नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. कारण अस्थिर अफगाणिस्तानमुळे सारेच शेजारी  देश संकटात येणार आहेत. तालिबानशी लढण्यासाठी आता कोणताच देश प्रत्यक्ष सैन्य काबूलच्या भूमीवर उतरवणार  नाहि. अमेरिकेने यातू हात पोळून घेतले आहेत. तालिबानला काबूत आणायचे असेल तर त्याला बाहेरून मिळणारी मदत बंद केली पाहिजे आणि अफूचा व्यापार उध्वस्त केला पाहिजे. पहिले काम आंतरराष्ट्रीय समुदाय करेल तर दुसरे काम अफगाण सरकार आणि सैन्य करू शकेल. तालिबानी संकटाला नेस्तनाबूत करणे ही आता तातडीची गरज बनली आहे.