शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. जवळपास तासभर या दोन्ही नेत्यांची चर्चा झाली असून त्यामध्ये नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याविषयी अद्याप निश्चित माहिती मिळू शकलेली नाही. राज्यातील महाविकासआघाडी सरकार अस्थिर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर काल देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर आज शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. त्यामुळे या भेटीनंतर राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. ही भेट दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेली नसून ती साऊथ ब्लॉकमधील पंतप्रधानांच्या कार्यालयात झाली आहे. त्यामुळे संकेतांनुसार शासकीय कार्यालयात झालेल्या भेटीत राजकीय चर्चा होत नाही. मात्र, दोन्ही नेत्यांची तासभर चर्चा झाल्यामुळे या भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली नसेल, हे मानण्यास राजकीय विश्लेषक तयार नाहीयेत. विशेषत: या भेटीच्या आधीच पियुष गोयल यांची देखील शरद पवारासोबत भेट झाल्यानंतर पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यामुळे त्याविषयी अनेक तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत. नुकतीच पियुष गोयल यांची राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यानंतर पियुष गोयल यांनी देशातील काही प्रमुख नेत्यांसोबतच शरद पवारांची देखील भेट घेतली होती. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली होती. आणि आता शरद पवारांनी पंतप्रधानांसोबत तासभर खलबं केल्यानंतर त्यातून वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहेत. देशात २०१४ पासून शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेकदा भेटी झाल्या आहेत. मात्र, २०१९ मध्ये राज्यात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामधल्या भेटीगाठी अगदीच कमी झाल्या होत्या. त्यामुळे बऱ्याच कालावधीनंतर या दोन्ही नेत्यांची प्रत्यक्ष भेट झाली आहे.

राष्ट्रपतीपदासाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा!

गेल्या काही दिवसांपासून देशाच्या राष्ट्रपतीपदासाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा केली जात आहे. या मुद्द्यावरून स्थानिक भाजपाकडून देखील सातत्याने शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर खोचक शब्दांमध्ये टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांच्या भेटीमध्ये राष्ट्रपतीपदाविषयी देखील चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.