गाझीपूर सीमेवरील हाणामारी प्रकरणी भारतीय किसान युनियनच्या २०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल!

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

गाझीपूर सीमेवरील हाणामारी प्रकरणी भारतीय किसान युनियनच्या २०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल!

दिल्ली  : दिल्ली व उत्तर प्रदेशच्या सीमेवर गाझीपूर येथे भाजपचे कार्यकर्ते आणि कृषी कायद्यांविरुद्ध आंदोलन करत असलेल्या आंदोलकांमध्ये काल(बुधवारी) हाणामारी झाली. ज्यामध्ये दोन्ही बाजूचे अनेक कार्यकर्ते जखमी झाले. याप्रकरणी आता पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली असून, भारतीय किसान युनियनच्या २०० कार्यकर्त्यांवर एफआयआर नोंदवला गेला आहे.

पोलिसांनी भाजपा नेता अमित वाल्मिकी यांच्या तक्रारीवरून एफआयआरची नोंद केली आहे. ज्यांच्या स्वागताच्यावेळी हा वाद उफाळला होता. वाल्मिकी यांनी गाझियाबादच्या कौशांबी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार नोंदवली व भारतीय किसान युनियनच्या कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप केला. तक्रार दाखल झाल्यानंतर एफआयआर नोंदवला गेला आहे.

तर, पोलिसांनी करण्यात आलेल्या तक्रारीत भाजपा नेते वाल्मिकी यांनी आरोप केला आहे की, त्यांच्या स्वागत समारंभाच्यावेळी भारतीय किसान युनियनच्या कार्यकर्त्यांनी वाहनांची तोडफोड केली व जातीवाचक भाषेचा वापर केला. तर, शेतकरी संघटनेने याप्रकरणी सांगितले की, केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात मागील ७ महिन्यांपासून सुरू असलेल्या त्यांच्या शांतीपूर्ण आंदोलनास बदनाम करण्यासाठी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हे संपूर्ण षडयंत्र रचलं आहे.

प्रामुख्याने भारतीय किसान युनियनचा समावेश असलेले आंदोलक नोव्हेंबर २०२० पासून तळ ठोकून आहेत, तेथील उड्डाणपुलावरून भाजप कार्यकर्त्यांनी काढलेल्या मिरवणुकीदरम्यान ही चकमक झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दोन्ही बाजू दुपारी १२ वाजताच्या सुमारास दिल्ली- मेरठ एक्सप्रेस वे वर एकमेकांनजीक आल्यानंतर त्यांच्यात चकमक उडाली. यात त्यांनी लाठ्यांचा वापर केल्यामळे काहीजण जखमी झाले.