काँग्रेस धडा शिकणार का?

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

काँग्रेस धडा शिकणार का?

बुडत्या जहाजात बसण्याची कुणालाही हौस नसते. आणि काँग्रेससारख्या पक्षात जेथे केवळ सत्ता उपभोगण्यासाठीच हवशे, नवशे आणि गवशे लोक येत असतात, त्या पक्षात तर अगोदरच गळती सुरू होते. सध्या मात्र काँग्रेसची जी अवस्था सोनिया आणि राहुल मायलेकांनी करून सोडली आहे, त्यामुळे हे बुडते जहाज सोडून लोक जात असले तर त्यांना दोष देता येणार नाहि. जितेन प्रसाद या काँग्रेसशी तीन पिढ्यांपासून निष्ठा असलेल्या नेत्याने काँग्रेस सोडून थेट भाजपचा रस्ता पकडला आहे. पण ते शेवटचे नाहित. कारण त्यांना भवितव्यच नाहि. गेल्या काही काळात काँग्रेसच्या इतक्या काही दिग्गज नेत्यांनी पक्ष सोडला आहे, त्याची यादी केली तरीही हे लोक काँग्रेसच्या सध्याच्या नेतृत्वाला इतके का वैतागले आहेत, ते लक्षात येते. संजय सिंग, रिटा बहुगुणा जोशी, पी सी चाको, राधाकृष्ण विखे पाटील, पेमा खंडू, हिमांत बिस्वसर्मा असे अनेक दिग्गजांनी सोनिया आणि राहुल यांच्या स्वभावाला कंटाळून काँग्रेसचा त्याग केला आहे. तेवीस नेत्यांनी पक्ष नेतृत्वावर आरोप करत पत्र पाठवले तरीही त्यावर सोनिया आणि राहुल यानी काहीही प्रतिक्रिया दिली नाहि. केवळ समिती नेमून मोकळे झाले. सचिन पायलट यांचे बंड शमवण्यासाठी एक समिती नेमली. त्या समितीने सचिन पायलट यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांचा विचार करायचा होता. त्या समितीच्या केवळ दोन बैठका झाल्या. आता सचिन पायलट पुन्हा आपला बाडबिस्तरा उचलून भाजपमध्ये जायच्या तयारीत आहेत. त्यांचे परममित्र ज्योतिरादित्य शिंदे मंत्रिमंडळ विस्तारात मंत्री होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सचिन पायलट यांना आपण आधीच का  भाजपमध्ये गेलो नाहित, याचा पश्चात्ताप होत असेल. काँग्रेसमध्ये नेत्यांना भवितव्य दिसत नाहि. मग लोकांचा पक्षावर विश्वास उडत असेल तर ते साहजिकच आहे. सोनिया आणि राहुल यांची काँग्रेस म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली आहे, असा आरोप काँग्रेसनेतेच खासगीत करत असतात.  अर्थात उघड बोलण्याची त्यांची हिमत नाहिच. आणि याच पक्षाचे नेते मोदी आणि अमित शहा यांच्यावर हुकूमशाहीचा आरोप करत असतात. मुळात काँग्रेसला भविष्य नाहि  कारण भविष्याचा वेध घेऊन निर्णय घेणारे नेतृत्व नाहि. सोनिया, राहुल आणि प्रियंका यांच्यापेक्षा काँग्रेसकडे काहीही जनतेला देण्यासारखे नाहि. आणि हे तिन्ही नेते निवडणुकीत काँग्रेसला यश मिळवून देऊ शकत नाहित, हे वारंवार सिद्ध झाले आहे. गांधी घराण्याची बटिक झालेल्या काँग्रेसला म्हणून तर लोक मते देत नाहित. शेवटी सारा खेळ हा मतांचा आहे. सोनिया आणि राहुल मते मिळवून देऊ शकत नाहित, म्हणून त्यांच्याविरोधात पक्षात बंडाचे आवाजही तीव्र होऊ लागले आहेत. यातून पक्ष सावरण्याची शक्यता फार कमी आहे. खरेतर आज काँग्रेसला सत्तेत पुनरागमन नाहि तरीही चांगल्या जागा मिळवण्याची खूप संधी आहे. मोदी सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरले आहे. विशेषतः कोरोना प्रश्नावर मोदी सरकारला प्रचंड संख्येने होणारे मृत्य रोखता आलेले नाहित. पेट्रोलने शंभरी गाठली आहे. महागाई भयानक वाढली आहे आणि खाद्यतेलाचे दर पावणेदोनशेच्या आसपास गेले आहेत. तरीही काँग्रेसच्या आंदोलनाला यश येत नाहि कारण काँग्रेसची विश्वासार्हता लयाला गेली आहे. सोनिया आणि राहुल यांचे उद्दाम नेतृत्व त्यास कारण आहे. विरोधी पक्ष म्हणून राहुल गांधी एक आरोप मोदींवर ट्विटरवर करतात आणि दिवसभरासाठी गायब होतात. त्यांना वाटते की समाजमाध्यमांवर मोदींवर आरोप केला की आपले विरोधी नेत्याचे कार्य संपते. पुन्हा पक्षाला जोमदार स्थितीत आणायचे तर सतत कार्यकर्त्यांमध्ये मिसळावे लागते, काम करावे लागते आणि बंद खोलीत बसून पक्षकार्य केले जात नाहि. पण राहुल यांना ते समजावून सांगायला कुणीच नाहि. सोनिया तर आजारीच असतात. त्यामुळे त्यांच्याकडून पक्षाला संजीवनी मिळण्याची आशा व्यर्थ आहे.  जे लोक पक्ष सोडून जाऊ पहात आहेत, त्यांना बोलवून चर्चा करून त्यांच्या समस्या दूर करणे हे सोनिया आणि राहुल यांच्या हातात आहे. परंतु ते जाणार्यांना अडवतही नाहित. तरीही सत्तेत येण्याची स्वप्ने पहातात.  शेख चिल्लीच अशी स्वप्ने पाहू शकतो. काँग्रेसची सामान्य जनतेशी नाळच तुटली आहे. नेते वेगळ्याच दुनियेत जगत असतात,कार्यकर्ते वेगळ्याच दुनियेत असतात आणि जनतेला तर काँग्रेसवाले महत्वच देत नाहित. मोदी चुका करण्याची वाट काँग्रेसवाले वाट पहात आहेत. परंतु मोदी चुका करत आहेत आणि अजूनही करतील, पण म्हणून आपसूक सत्तेचा लोण्याचा गोळा काँग्रेसवाल्यांच्या तोंडात पडण्याची अजिबात शक्यता नाहि. काँग्रेसने असल्या स्वप्नांपासून दूर राहून केवळ जनतेत जावे आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा. तरच काँग्रेसला काहीतरी आशा आहे. अन्यथा विरोधी पक्षात बसायचे तर नशिबी आहेच. महाराष्ट्रात योगायोगाने सत्ता मिळाली आहे आणि त्यातही काँग्रेसची अवस्था म्हणजे लिंबूटिंबूसारखी आहे. काँग्रेसला अजिबात महत्व नाहि आणि केवळ लोढणे बनून ते महाविकास आघाडीच्या गळ्यात पडले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे बुडते जहाज सोडून आणखी काही दिग्गज सोडून गेले तर आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाहि.