चक्रीवादळग्रस्त कोकणाला सरकारने केलेली मदत तुटपुंजी - प्रविण दरेकर

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

चक्रीवादळग्रस्त कोकणाला सरकारने केलेली मदत तुटपुंजी - प्रविण दरेकर

मुंबई: तौक्ते चक्रीवादळग्रस्त कोकणाला सरकारने केलेली मदत अत्यंत तुटपुंजी असून महाविकास आघाडी सरकारने कोकणवासीयांच्या तोंडाला केवळ पानेच पुसली नाही तर त्यांची दिशाभूलही केली, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी सरकारवर केली आहे. राज्य सरकारने कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत चक्रीवादळग्रस्तांसाठी २५२ कोटी रुपयांची मदत जाहीर केली. यावर आज भाजपा कार्यालयात प्रविण दरेकर यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.  

मदतीच्या निर्णयात माणुसकीच दर्शन आणि कोकणवासीयांविषयीची आस्था नाही. सरकारने केवळ औपचारिकता पार पाडली.  मदत जाहीर केल्यास मंत्रालयासमोर उपोषणाला बसेल, असे दरेकर यांनी जाहीर केले होते. त्याबाबत दरेकर म्हणाले, मंत्रिमंडळाच्या बैठकीत तौक्ते चक्रीवादळग्रस्त कोकणाला सरकारने मदत जाहीर केली नाही तर मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर कोकणातील सहकारी आमदारांसोबत उपोषणाला बसेन, असा इशारा मी सरकारला दिला होता. विरोधी पक्षाकडून सातत्याने आलेला दबाव, आग्रही मागणी, देवेंद्रजी आणि माझा झालेला दौरा यामुळे काल सरकारने मदतीचा निर्णय अखेर जाहीर केला असला तरी जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी आहे. ही मदत जाहीर करताना सरकारकडून कोणत्याही प्रकारचं माणुसकीच दर्शन किंवा कोकणवासीयांविषयीची आस्था दिसून आलेली नाही. एक औपचारिकता पूर्ण करावी, अशा प्रकारे सरकारने मदत जाहीर केली आहे

 

मदतीची घोषणा करण्यापूर्वी सरकारकडून वस्तुनिष्ठ अभ्यास झाला नाही

 

शिवसेना नेते संजय राऊत यांनी गुजराथप्रमाणे महाराष्ट्राला मोदी यांनी  हजार कोटी रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी केली होती. त्याचा संदर्भ देऊन दरेकर म्हणाले, एका बाजूला संजय राऊत केंद्राने हजार कोटी द्यावेत, अशी मागणी करतात, अर्थात, त्यांनी कुठल्या अभ्यासानुसार हजार कोटी रुपयांची मागणी केली होती, हे कळायला मार्ग नाही. पण केंद्राने हजार कोटी द्यावेत, अशी अपेक्षा धरताना राज्य सरकारने केवळ २५२ कोटी रुपयांची मदत जाहीर केली. त्यामुळे यांची मागणी आणि मदतीची घोषणा, यात कोणताही वस्तुनिष्ठ अभ्यास नाही, हे सर्व कोकणवासीयांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासारखे असून मदतीची घोषणा निव्वळ फसवी आहे